You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे आणि शरद पवार : एकमेकांना साथ आणि कौतुक करणे ही गरज की राजकारण?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
"कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे," असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं 'हॅट्स ऑफ' म्हणून कौतुक केलं आहे.
ऊसतोड कामगारांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचं कौतुक करणारं ट्वीट केलं.
विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेसुद्धा उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात पंकजा यांनी शरद पवार यांच्याबद्दल सकारात्मक उद्गार काढण्याची ही दुसरी वेळ आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावरून केलेल्या भाषणात पंकजा यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्यांबद्दल बोलताना शरद पवार यांचा उल्लेख केला होता. शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर ते कसे प्रश्न सोडवायला मदत करतात, असं पंकजा यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांचा उल्लेख त्यांनी 'शरदचंद्र पवार' असा केला होता.
पंकजा मुंडे यांचे चुलतभाऊ धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मंत्रीही आहेत. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी माझेही संबंध जवळचे आहेत आणि तुमचे प्रश्न सोडवायला मीसुद्धा मदत करुच शकते, असा विश्वास ऊसतोड कामगारांमध्ये निर्माण करून पंकजा आपलं नेतृत्व बळकट करू पाहत आहेत का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय.
दुसरीकडे पंकजा यांची पक्षांतर्गत कोंडी होत असल्यामुळे त्या शरद पवारांशी जवळीक दाखवत भाजपवरच दबाव आणू पाहण्याचाही प्रयत्न करत आहेत का? कारण एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाचा सर्वांत मोठा ओबीसी चेहरा म्हणून पंकजांचं नाव समोर येत असताना भाजपकडून त्यांना सुरेश धस, भागवत कराड यांच्या रुपानं पर्यायी नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
नेमकं काय झालं?
ऊसतोड कामगारांच्या संपासंबंधी पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पक्षातला हा अंतर्विरोध प्रकर्षानं समोर आला. सुरेश धस हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
मार्च 2017मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती.
या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला. मात्र यावेळी पंकजा यांनी धस यांना आपल्याबाजूने वळवत सत्ता राखली होती. त्यानंतर सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेवरही निवडून आले.
सुरेश धस हे पंकजा यांचे अतिशय विश्वासू मानले जाऊ लागले. पण याच सुरेश धस यांनी पंकजा यांच्याविरोधी भूमिका घेतली. ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करून कामगारांना ऊसतोडीसाठी निघण्याचं आवाहन मुंडेंनी केलं.
मात्र पंकजा यांच्या आवाहनानंतर सुरेश धस यांनी म्हटलं की, "जोपर्यंत दीडशे टक्के दरवाढ होणार नाही तोपर्यंत एकही मजूर कामावर जाणार नाही. कुणी काही वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर पुढे काय होईल हे सांगता येणार नाही." असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला. विशेष म्हणजे धस यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या बैठकीत बोलावण्यात आलं नव्हतं.
सुरेश धस यांनी म्हटलं, "गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना तसंच माझ्यासहित 11 संघटनांच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ करण्यात यावी, मुकादमांचं कमिशन साडे 18 टक्क्कांवरून 37 टक्के करण्यात यावं तसंच वाहतूकदारांची दरवाढ करून ती दरवाढ 50 टक्के करण्यात यावी."
"साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून द्यावी," अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं.
त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या संपाचं निमित्त करून भाजप पंकजा यांची कोंडी करत आहे का आणि शरद पवारांशी जवळीक साधत पंकजा आपल्या पक्षाला 'स्ट्राँग मेसेज' देत आहेत का?
याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी म्हटलं, "पंकजा मुंडे यांची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून भाजपकडून कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतंय. सुरेश धस, भागवत कराड यांसारख्यांना चांगलं स्थान देऊन त्यांची कोंडी केली जात असल्याचं दिसतंय.
"त्यात भाजपने गेल्या चार वर्षांत मराठा समाजाच्याभोवती फिरणारं राजकारण केलं. यामुळे ओबीसी समाज बऱ्यापैकी त्यांच्यावर नाराज झाल्याचं चित्र आहे. अशावेळी ओबीसी समाजाला जवळ करण्याचे शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत."
डोळे पुढे सांगतात, "हा पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग आहे. एकनाथ खडसेंसारखा नेता राष्ट्रवादीत आल्यानंतर पंकजा मुंडेंनाही जवळ येऊ दिलं जातंय. जेणेकरून राज्यातल्या ओबीसी समाजाचे नेते भाजपकडून त्यांच्याकडे ओढले जातील. त्यात जिल्ह्याच्या राजकारणात पंकजांची कोंडी होत असल्यानेही आणि भाजप त्यांना पर्याय शोधत असल्याने त्यासुद्धा शरद पवारांचं कौतुक करताना दिसतायत."
नेतृत्वाची लढाई?
दसरा मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडे यांनी बराच भर हा ऊसतोड कामगारांच्या समस्यांवर दिला होता. "आपल्या पाठीराख्यांची म्हणजे वंजारी समाजातल्या ऊसतोड कामगारांची एकजूट राहावी, यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे," असं त्या उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाल्या.
मी आहे तिथंच आहे, असंही त्यांनी म्हटलं. म्हणेज भाजपनं केंद्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली असली तरी माझं राजकारण हे महाराष्ट्रातलं आहे, मराठवाड्यातलं आहे, त्यामुळे मी इथंच राहणार आहे, हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता.
म्हणजेच पंकजा या ऊसतोड कामगारांना मीच तुमची नेता हे सांगत असताना पक्षातून सुरेश धस यांचा पर्याय पुढे आला, तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या भागात भागवत कराड यांच्यासारखा नेताही भाजपने पुढे आणला. त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली.
पण आता भाजपमध्ये ओबीसी चेहरा कोण? या बातमीच्या निमित्तानं भागवत कराड हे पंकजांसाठी पर्याय ठरू शकतात का, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना विचारला होता.
त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, "भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ओबीसी नेते ही ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलीकडे काही फारशी उडी मारली नाही."
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनीही म्हटलं होतं की, "गिरीश महाजन किंवा भागवत कराडांकडे पर्याय म्हणून पाहिले तरी ते सकारात्मकदृष्ट्या पर्याय दिले नाहीत, तर पक्षातल्याच नेत्यांना आव्हान देण्यासाठी यांना मोठं केलं गेलं. त्यामुळे यांना आपण पर्याय तरी कसं म्हणणार?"
पक्षीय राजकारणातलं हेच आव्हान पेलण्यासाठी आता पंकजाही शरद पवारांचा आधार घेत आहेत का?
'शरद पवारांचा पाठिंबा ही जमेची बाजू'
याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी म्हटलं, "पंकजा या शरद पवारांच्या जवळ जात पक्षाला निश्चितच संदेश देत आहेत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांचे या सरकारसोबत चांगले संबंध आहेत. शिवाय शरद पवारांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचं चित्र या ऊसतोड कामगारांच्या बैठकीच्या निमित्तानं पहायलाही मिळालं."
"यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचे संबंध खूप कडवट होते. मुंडे यांनी पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यांचं राजकारण पवारविरोधावर बेतलं होतं. या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाचा स्वतः मुंडे आणि शरद पवारांनीही खूप त्रास झाला. या सगळ्या भूतकाळाचा विचार करता पंकजा यांना शरद पवारांचा सकारात्मक पाठिंबा मिळणं ही सध्याच्या त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिनं खूप जमेची बाजू आहे," उन्हाळे सांगतात.
पुढे उन्हाळे सांगतात, "आता ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न आणि सुरेश धस यांच्याबद्दल बोलायचं तर धस यांचं नेतृत्व ऊसतोड कामगारांमध्ये किती प्रस्थापित आहे हा प्रश्न आहे. शिवाय, पंकजा मुंडे यांच्या यासंबंधीच्या मागण्या या मान्य करण्यासारख्या आहेत, याच्या उलट धस हे कायम बार्गेन करणारे नेते आहेत. त्यामुळेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा यांना शरद पवारांनी महत्त्व दिलं."
भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणाबद्दलही संजीव उन्हाळे यांनी भाष्य केलं.
"पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडेचा वारसा आहे. कितीही झालं तरी मुंडेंना मानणारा वंजारी समाजातला एक वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. केवळ खासदारकी दिली म्हणून भागवत कराड हे ओबीसींचे नेते ठरू शकत नाहीत," असं संजीव उन्हाळे यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)