You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा इशारा, 'टाचणी' तयार आहे...'
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, 'टाचणी' तयार आहे, योग्य वेळ येऊ द्या'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळव्याच्या भाषणात भाजपचे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांचे नाव न घेता खिल्ली उडवली. यानंतर आता आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर ट्वीट करत निशाणा साधला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.
नितेश राणे म्हणाले, "बिहारच्या आगोदरच पक्षप्रमुखांनी 'vaccine' घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज. किती आव. 'टाचणी' तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊ द्या." असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
बिहारमध्ये मोफत लस देण्यावरून उद्धव ठाकरे आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी काही जणांना गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं असा टोला लगावला. पुढे ते म्हणाले, "एक बेडूक आणि त्याची दोन पोरं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारत असतात."
2. तुमच्या जवळ 'हे' प्रमाणपत्र आहे का? अन्यथा भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड
केंद्र सरकारने सुधारित मोटर वाहन कायदा लागू केल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचेही नियम बदलण्यात आले. तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी गाडी असल्यास तुमच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तुमच्या गाडीचा PUC केला नसल्यास तुम्हाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे PUC प्रमाणपत्र आता अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. न्यूज18 लोकमतने ही बातमी दिली आहे.
तुमच्या गाडीच्या PUC प्रमाणपत्राची मुदत कधीपर्यंत आहे? हे तपासून वेळोवेळी तुम्हाला प्रमाणपत्र रिन्यू करावे लागणार आहे.
नवीन मोटर वाहन कायदा नुकताच दिल्लीत लागू झाला. यापूर्वी PUC नसल्यास 1 रुपये इतका दंड घेण्यात येत होता. पण नवीन कायद्यानुसार हा दंड दहा पट वाढणार आहे.
3. कोरोनाची लस मोफत देणार - केंद्रीय मंत्री प्रताप सांरगी
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बिहारच्या जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर भाजपवर प्रचंड टीका झाली. आता केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी यांनी कोरोनाची लस सर्वांसाठी मोफत असेल अशी घोषणा केली आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.
बालासोर येथे 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी घेतलेल्या सभेनंतर प्रताप सारंगी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली असून प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे 500 रुपये इतका खर्च आहे.
4. मोहन भागवातांना सत्य माहिती आहे पण ते घाबरतात - राहुल गांधी
दसऱ्यानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर स्वयंसेवकांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी चीनच्या घुसखोरीचा उल्लेख केला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले, "मोहन भागवत यांना सत्य माहिती आहे. पण त्याचा सामना करण्याची त्यांना भीती वाटते. चीनने आपली जमीन बळकावली आहे हे सत्य आहे आणि केंद्र सरकार आणि आरएसएसने ते होऊ दिले."
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मोहन भागवत यांनी देश-विदेशातील विविध मुद्यांवर भाष्य केले.
ते म्हणाले, "चीनने आपल्या लष्करी ताकदीच्या गर्वात आपल्या सीमांवर आक्रमण केलं. सगळ्या जगासोबत चीन असंच करत आहे. भारताने यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चीन भांबावला आहे. भारत ठामपणे उभा राहिला. लष्करी आणि आर्थिक दृष्टीकोनातून तणावात आल्यानंतर चीन ताळ्यावर आला आहे.
5. टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला ड्रग्स प्रकरणात अटक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
प्रीतिका चौहानला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली. या दोघांनाही 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रीतिकाने जामीनासाठी अर्ज केला असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. तसंच एनसीबीला दिलेला जबाब तिने फिरवला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)