You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
TRP प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, 'पैसे वाटणाऱ्या' दोघांना अटक
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
पैसे देऊन TRP वाढवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा अशी या दोन आरोपींची नावं आहेत. TRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई क्राइम ब्रांचकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हंसा या रिसर्च एजन्सीचे माजी कर्मचारी आहेत.
रामजी आणि दिनेश दोघेही काही वर्षांपूर्वी 'हंसा'साठी काम करत होते. रामजीला वरळी भागातून तर दिनेशला मुंबई एअरपोर्टवरून अटक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
TRP घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विशाल भंडारी आणि उमेश मिश्रा यांच्या चौकशीत दिनेशचं नाव समोर आलं होतं. TRP वाढवण्यासाठी दिनेश विशालला पैसे देत असल्याचं चौकशीत पुढे आलं होतं. त्यामुळे मुंबई पोलीस दिनेशच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर केलं जाईल.
मुंबई पोलिसांनी TRP घोटाळ्यात अर्णव गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पुरावे हाती लागल्याचा दावा केला होता. आरोपी आणि साक्षीदारांनी चौकशीत रिपब्लिक टीव्हीचं नाव घेतल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे एक्झिक्युटिव्ह एडीटर, चिफ फायनान्सस ऑफिसर आणि डिस्ट्रीब्युशन प्रमुखांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पैसे देऊन TRP वाढवण्याप्रकरणी मुंबई पोलीस रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनल्सची चौकशी करत आहेत.
मंगळवारी, उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकरणी एक FIR दाखल केली आहे. याची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीची मुंबई पोलिसांना मुभा, पण...
कथित TRP घोटाळ्याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची चौकशी करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र, अर्णब गोस्वामी यांना चौकशीला बोलावण्यासाठी समन्स पाठवावं, असे आदेश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी TRP प्रकरणी दाखल केलेली FIR रद्द करावी आणि हे प्रकरण चौकशीसाठी CBI कडे द्यावं, अशी मागणी करणारी याचिका ARG Outlier Media Pvt Ltd ने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.
याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना TRP प्रकरणासंबंधीची कागदपत्र 4 नोव्हेंबरला एका बंद लिफाफ्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 नोव्हेंबरला होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी पैसे देऊन TRP रेटिंग वाढवल्याप्रकरणी FIR दाखल केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की, "अटक करण्यात आलेल्या आरोपींनी रिपब्लिक टीव्हीने TRP रेटिंग वाढवण्यासाठी पैसे दिल्याचं चौकशीत कबूल केलं आहे."
रिपब्लिक टीव्हीसोबत 'फक्त मराठी' आणि 'बॉक्स सिनेमा' या चॅनल्सनेही TRP वाढवण्यासाठी पैसे दिले असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
मुंबई हायकोर्टाने न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सोमवारी सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामींना अटक करण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली.
त्यावर कोर्टाने म्हंटलं, "सद्य स्थितीत अर्णब गोस्वामी या प्रकरणात आरोपी नाहीत. तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांची चौकशी करायची असेल. तर, ज्या प्रकारे इतर 7 लोकांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं होतं त्याचप्रकारे अर्णब गोस्वामींना चौकशीसाठी समन्स पाठवावा लागेल."
याचिकाकर्त्यांचे वकील हरिष साळवे यांनीदेखील कोर्टात अर्णब गोस्वामी यांना समन्स बजावण्यात आलं तर ते तपास अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करतील असं कोर्टात सांगितलं.
सुनावणी दरम्यान "आम्हाला तपासाची कागदपत्र पहावी लागतील. त्याचसोबत पुढील तारखेपर्यंत तपास कशा पद्धतीने करण्यात आला आहे, हे पहावं लागेल," असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर TRP प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचं नाव विनाकारण घेतल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची याचिका फेटाळताना बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
कोर्टात सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले "ही याचिका सद्यस्थितीत प्रिमॅच्युअर आहे. या प्रकरणात गोस्वामी अजूनही आरोपी नाहीत. आपल्या फायद्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यात तीन चॅनल्स सहभागी असल्याचं समोर आलं आहे. मग, हे पुढे येऊन FIR रद्द करण्याची मागणी कसे करू शकतात?"
काही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पैसे देऊन TRP रेटिंगमध्ये गडबड केल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती.
त्यावेळी "Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग बनावट पद्धतीने वाढवल्याचं केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार करू," असं परमबीर सिंह म्हणाले होते.
मुंबईत टीव्ही चॅनेलबाबत TRP रॅकेट चालवलं जात असल्याचा संशय आहे, पैसे देऊन TRP रेटिंग वाढवण्यात येत होती. घरोघरी चॅनेल सुरू ठेवण्यासाठी 500 रुपये देण्यात आले, याबाबत तपास सुरू आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं होतं.
मात्र, या पत्रकार परिषदेनंतर रिपल्बिक टीव्हीने मुंबई पोलिसांचे आरोप फेटाळून लावले होते. त्याचसोबत FIR मध्ये रिपब्लिक टीव्हीचं नाव नसल्याचा दावा केला होता.
त्यानंतर बीबीसीशी बोलताना मुंबई क्राइम ब्रांचचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले होते, "FIR मध्ये इंडिया टूडेचं नाव आहे. मात्र, चौकशी दरम्यान कोणत्याही आरोपीने किंवा साक्षीदाराने हे आरोप सिद्ध केले नाहीत किंवा याबाबत माहिती दिली नाही. याउलट, आरोपी आणि साक्षीदारांनी खासकरून रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचं नाव घेतलं. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे."
या प्रकरणी चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. तर, रिपब्लिक टीव्हीचे अधिकाऱ्यांच्या समन्स पाठवून चौकशी करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)