You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी : रिपब्लिक टीव्हीच्या कार्यकारी संपादकांसह 4 जणांवर गुन्हा दाखल
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीच्या चारहून अधिक जणांवर मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक निरंजन नारायण स्वामी, अँकर शिवानी गुप्ता, रिपोर्टर सागरिका मित्रा, शावन सेन, न्यूजरूम इंचार्ज आणि इतर काहीजणांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिली आहे.
22 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता प्रक्षेपित झालेल्या 'बेस्ट स्टोरी टूनाईट' या कार्यक्रमाबाबत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
दरम्यान रिपब्लिक टीव्हीच्याविरोधात मुंबई पोलिसांनी याआधी कथितरित्या टीआरपीमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केलेला आहे.
प्रथमदर्शनी तरी वरील प्रकरण हे टीआरपी प्रकरणापेक्षा वेगळं असल्याचं दिसून येत आहे.
अर्णब गोस्वामी यांनी याचिका दाखल करण्यासाठी हायकोर्टात जावं- सर्वोच्च न्यायालय
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी TRP संबंधित आरोपांबाबत याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात न येता मुंबई हायकोर्टात जावं, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने 15 ऑक्टोबर रोजी दिली होती.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने रिपब्लिक टीव्हीने दाखल केलेल्या याचिकेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यास नकार दिला. आपण उच्च न्यायालयाच्या कामकाजावर विश्वास ठेवावा, सध्या कोरोनाची साथ आहे आणि हायकोर्ट सुरू आहे, असं सांगत अर्णब यांनी मुंबई उच्च न्यायालयातच जावं, असं कोर्टाने म्हटलं.
तसंच TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. रिपब्लिक टीव्हीने दाखल केलेली याचिका रद्द करावी, अशी मागणी या प्रतिज्ञापत्रात आहे. सुप्रीम कोर्ट लवकरच याप्रकरणी सुनावणी करणार आहे.
रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं होतं. तसंच, 'फक्त मराठी' आणि 'बॉक्स मराठी'च्या अकाऊंटट्सनाही समन्स बजावलं होतं
याचसोबत, लिंटास कंपनीच्या शशी सिन्हा आणि मॅडिसन कंपनीच्या सॅम बलसारा यांनाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत, अशी माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली होती.
हंसा एजन्सीचे माजी कर्मचारी दिनेश विश्वकर्मा आणि विनय त्रिपाठी हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. शिवाय, इतर चॅनल्सबाबत माहिती मागण्यासाठी BARC ला मुंबई पोलिासंकडून पत्र लिहिले जाणार आहे.
पैसे देऊन टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स (TRP) वाढवण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात FIR दाखल केली आहे. रिपब्लिक टीव्हीने TRP साठी पैसे देऊन फेरफार केल्याचा दावा पोलिसांनी केला. ही माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी काल (8 ऑक्टोबर) विशेष पत्रकार परिषदही घेतली.
मात्र, त्यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांच्या FIT मध्ये इंडिया टुडेचं नावं FIR असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं. याबाबत आता मुंबई पोलिसांनी खुलासा केला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना मुंबई क्राइम ब्रांचचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले, "TRP साठी पैसे दिल्या प्रकरणी दाखल FIR मध्ये इंडिया टुडेचं नाव आहे. मात्र अटक आरोपी किंवा कोणत्याही साक्षीदाराने याबाबत ठोस माहिती दिलेली नाही. याउलट या प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार खासकरून रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचं नाव घेत आहेत. मुंबई पोलीस याचा सर्व दिशेने तपास करत आहेत."
'इंडिया टुडे'च्या नावावरून गोंधळ का झाला?
TRP संदर्भातील मुंबई पोलिसांच्या FIR मध्ये इंडिया टुडेचं नाव दिसल्यानं सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.
"मुख्य आरोपी विशाल भंडारी 83 अकाउंट मॅनेज करत होता. यातील 10 अकाऊंट त्यांने पैसे देऊन मॅनेज केले होते. ज्या 10 घरांना पैसे देण्यात आले होते, त्यांनी पैसे घेतल्याच मान्य केलं," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
तसंच, मुंबई पोलिसांनी इंडिया टुडेच्या उल्लेखाबद्दल सांगितलं की, "हंसा एजन्सीने FIR मध्ये इंडिया टुडेचं नाव घेतलं. त्याअंतर्गत चौकशीमध्ये याबाबत माहिती समोर आली होती. त्यामुळे FIR मध्ये इंडिया टुडेचं नाव आहे. पण आमच्या चौकशीत इंडिया टुडेविरोधात कोणताही पुरावा समोर आलेला नाही."
"आमच्या चौकशीत रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी चॅनलबाबत पुरावे समोर आले आहेत. आरोपी किंवा साक्षीदाराने आम्हाला इंडिया टुडेबाबत माहिती दिली नाही," असं मुंबई पोलिस म्हणाले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी टीव्ही चॅनल्सचा TRP मोजणाऱ्या BARC या एजन्सीला पत्र पाठवून रिपब्लिक टीव्हीचा संशयास्पद वाटणारा व्हुअरशिप डेटा देण्याची सूचना केली आहे.
त्याचसोबत या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल भंडारी ज्या घरांसाठी रिलेशनशिप मॅनेजर होता. त्या घरांची लिस्ट देण्यास सांगितलं आहे.
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)