You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : मुंबई मेट्रोतून प्रवास करण्यासाठीचे नियम कोणते आहेत?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोव्हिड-19 च्या काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मेट्रोची सेवा सोमवारपासून (19 ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहे.
मध्य आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या मेट्रो सेवेमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाकाळात आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे.
असा असेल मेट्रोचा प्रवास
- सकाळी 8.30 वाजता पहिली आणि रात्री 8.30 वाजता शेवटची ट्रेन सुटेल
- ट्रेनमध्ये एक सीट सोडून प्रवाशांना बसण्याची परवानगी
- ट्रेनमध्ये उभं राहण्यासाठी निश्चित जागा असणार
- प्लॅटफॉर्मवर आखून दिलेल्या ठिकाणी प्रवाशांना उभं रहावं लागणार
- दर 6.30 मिनिटांनी येणार ट्रेन
एकावेळी किती प्रवासी?
कोव्हिड-19 आधी मुंबई मेट्रोतून एका ट्रेनमध्ये 1350 प्रवासी प्रवास करायचे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी फक्त 300 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय.
मेट्रोच्या दिवसाला धावणाऱ्या 400 फेऱ्या सद्यस्थितीत 200 वर आणण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात प्रवाशांची संख्या आणि सुरक्षा यावर विचार करून फेऱ्या वाढवण्यात येतील, अशी माहिती मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रत्येक प्रवाशाची तपासणी
स्टेशनवर आल्यांनंतर प्रत्येक प्रवाशाची हेल्थ डेस्कला तपासणी होणार आहे. लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणं असतील तर प्रवास करू दिला जाणार नाही.
मेट्रोतून प्रवास करताना मास्क घालणं आवश्यक आहे.
प्लॅस्टिक कॉइनच्या ऐवजी पेपर तिकीट
मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट म्हणून प्लॅस्टिक कॉइन दिले जायचे. मात्र हे प्लॅस्टिक कॉइन एका प्रवाशानंतर दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येतात. कोरोनाचा संसर्ग एकमेकांच्या वस्तू हाताळल्याने पसरण्याची भीती जास्त असते. त्यामुळे प्लॅस्टिकच्या कॉइन ऐवजी मेट्रोतून प्रवासासाठी पेपर तिकीट दिलं जाणार आहे.
या पेपर तिकीटावर एक कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना स्टेशनमध्ये जाण्याची परवानगी मिळेल. त्याचसोबत संसर्ग टाळण्यासाठी स्टेशनवर बारकोड स्कॅनकरून मोबाईल तिकीट घ्यावं असं आवाहन मेट्रोतर्फे मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
याबाबत बोलताना मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अभय मिश्रा सांगतात, "कोव्हिड-19 च्या काळात प्रवासाची पद्धत बदलली आहे. प्रवास करताना आपल्याला आणि आपल्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रवाशांना योग्य पद्धतीने वागावं लागेल. लोकांचा प्रवासादरम्यान कमीत-कमी स्पर्श व्हावा त्यासाठी मोबाईल तिकीटावर आमचा भर राहील. जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल."
पासधारक प्रवाशांसाठी खास सोय
कोव्हिड-19 च्या आधी मुंबई मेट्रोने लाखो प्रवासी दररोज प्रवास करायचे. ज्यात मोठ्या संख्येने लोकांकडे पास होते. मेट्रो अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे पास वाया जाणार नाहीत.
याबाबत माहिती देताना अभय मिश्रा सांगतात, "पासधारकांना काळजी करायची गरज नाही. ज्यांच्याकडे पासमध्ये पैसे असतील त्यांनी मेट्रो स्टेशवर कस्टमर केअरला संपर्क करावा. त्यांच्या पासचं योग्य व्हिरिफिकेशन (तपासणी) केल्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल. प्रवाशांचं नुसकान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे."
साफसफाई आणि सॅनिटायझेशन
कोव्हिड-19 चा संसर्ग पसरू नये यासाठी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण म्हत्त्वाचं आहे. मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अभय मिश्रा यांच्या माहितीनुसार-
- प्रत्येत ट्रीपनंतर मेट्रो ट्रेनच निर्जंतुकीकरण केलं जाणार
- ट्रेनमध्ये फॉगिंग करण्यात येणार
- बसण्याची जागा, हॅन्डल, उभं राहताना पकडण्यासाठी असलेले बार यांचं दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण होणार
- प्रवाशांचा ज्या गोष्टींशी वारंवार संपर्क येतो अशा गोष्टी सातत्याने स्वच्छ केल्या जाणार
मेट्रो मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, सोशल डिस्टंसिंगच पालन करून ट्रेन सेवा सुरू होत असल्याने प्रवाशां काळजी घ्यावी लागेल. मेट्रो एसी असल्याने मोठ्या स्टेशवर थांबल्यानंतर बाहेरची ताजी हवा आत यावी यासाठी दरवाजे 180 सेकंद उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)