You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई लोकलः महिलांना प्रवासाची परवानगी द्या, महाराष्ट्र सरकारची मागणी
कोरोना काळात मुंबई आणि परिसरातील लोकल ट्रेनमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. पण आता सर्वच महिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे विभागानंही महाराष्ट्र सरकारचं पत्र स्वीकारलं आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "महाराष्ट्र सरकारनं 16 ऑक्टोबर रोजी पत्र लिहून विनंती केली की, 17 ऑक्टोबरपासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. महाराष्ट्र सरकारनं काही निश्चित वेळा सुद्धा सांगितल्या आहेत."
"मात्र, सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे याबाबत असा एका दिवसात निर्णय घेता येणार नाही. आम्ही सरकारची विनंती नाकारली नाहीय. पण सरकारसोबत बैठक घेऊन, किती लोक प्रवास करू शकतील, किती गाड्या सोडाव्या लागतील, याबाबत चर्चा करू. त्यानंतर निर्णय घेऊ," असं शिवाजी सुतार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्र सरकारनं पत्रात काय म्हटलंय?
या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम विभागातील विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे.
लोकल रेल्वेमध्ये सर्व महिलांना 17 ऑक्टोबरपासून प्रवासाची परवानगी देण्यात यावी. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी सात वाजेपासून रात्री लोकलसेवा बंद होईपर्यंत महिलांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी मिळावी. त्यांना प्रवासादरम्यान क्यू आर कोड विचारण्यात येऊ नये. वैध तिकीट काढून सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी.
या काळात अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असलेली लोकल प्रवासाची परवानगी दिवसभर कायम असावी. तसंच या काळात रेल्वेंच्या फेऱ्याही वाढवण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)