कोरोना व्हायरस: पुण्यात संसर्ग खरंच आटोक्यात येतोय?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, पुण्याहून बीबीसी मराठीसाठी

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे जिल्हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

या काळात पुणे शहरात दररोज सरासरी दीड ते दोन हजार रुग्ण वाढत होते. त्यातच बेड मिळण्यासाठी देखील अनेक रुग्णांना अडचणी निर्माण होत होत्या.

एक महिन्यानंतर या परिस्थितीमध्ये आता हळूहळू सुधारणा होत असून पुणे शहरात दररोज सरासरी सातशे रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पिंपरी चिंचवड भागात आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना आटोक्यात येतोय का? या प्रश्नाचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला.

साधारण गणेशोत्सवानंतर पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. या काळात बाजारापेठांमध्ये गर्दी झाल्याने तसेच नागरिकांनी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्याने कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली होती.

12 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह चाचणी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 28 टक्के इतके होते, तर याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रमाण 20 टक्क्यांवर आलं होतं. महिन्याभरानंतर 11 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत खाली आले, तर पिंपरी चिंचवडमधलं प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत खाली आलं होतं.

कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे?

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याबाबत बीबीसीने इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी म्हटलं, "साथीच्या रोगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर मधल्या काळात रुग्णसंख्या ही कमी होत असते. यामध्ये रोगजंतू काहीकाळ कमी अॅक्टिव्ह राहतात. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसते. याकाळात नागरिकांनी आणि शासनाने अधिक सजग राहण्याची गरज आहे. काळजी न घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती, परंतु गणेशोत्सवात दुकाने, बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली."

"सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. यातून कोरोना विषाणूची मारकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातल्या हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधल्या नागरिकांपैकी 51 टक्के नागरिकांमध्ये अॅन्टिबॉडीज सापडल्याचं जूनमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेमधून समोर आले होते.

"या भागातील नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याची शक्यता आहे. यामुळे देखील रुग्णसंख्या कमी होऊ शकते. नागरिकसुद्धा आता मास्क वापरताना दिसत आहेत,'' असं मत डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केले.

'...तर येऊ शकते दुसरी लाट'

संसर्ग आटोक्यात आला असला, तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का? या प्रश्नावर भोंडवे यांनी म्हटलं, ''आता दसरा तसेच दिवाळी हे सण आहेत. या काळात नागरिकांनी पुन्हा दुकानांमध्ये, बाजारपेठांमध्ये गर्दी केली, सोशल डिस्टंन्सिंग पाळलं नाही, मास्कचा वापर केला नाही तर दिवाळीनंतर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.

"जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे थंडीच्या काळात रुग्णसंख्या ही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जरी आकडे कमी होत असले तरी साथ नियंत्रणात आली आहे असे म्हणता येणार नाही. त्यासाठी पुढील काही आठवडे रुग्णसंख्या सातत्याने कमी होण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. कोरोनाच्या रुग्णाला लवकर उपचार मिळाल्यास तो लवकर बरा होतो,'' भोंडवे सांगतात.

चाचण्यांची संख्या कमी झाली?

सप्टेंबर महिन्यामध्ये दिवसाला साधारण 6 ते 7 हजार चाचण्या होत होत्या. ते प्रमाण आता 4 ते 5 हजारांवर आले आहे. याबाबत बीबीसीने पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्याशी संपर्क केला.

वावरे यांनी म्हटलं, ''कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण कमी झाल्याने चाचण्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सप्टेंबर महिन्यात साधारण 30 टक्के इतका पॉझिटिव्ह येण्याचा रेट होता, तो आता 15 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे लवकर निदान होत असल्याने तसेच डॉक्टरांना कोरोनाच्या रुग्णावर कसे उपचार करावेत याची 'लाईन ऑफ ट्रिटमेंट' कळाल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे, तसेच आता डॉक्टरांकडून उपचाराचा प्रोटोकॉल फॉलो केला जातोय."

"आम्ही रुग्णांची लवकर चाचणी करुन त्यांना उपचार देत आहोत. ज्यांना इतर व्याधी आहेत अशा नागरिकांना शोधून त्यांची चाचणी करुन त्यांना उपचार देण्यात येत आहेत. या सगळ्यामुळे कोरोनाचा पुढील प्रसार रोखण्यास मदत होत आहे. मृत्युदर देखील आता कमी झाला आहे.

''मात्र तरीही नागरिकांनी कोरोनाबाबतची खबरादारी घ्यायलाच हवी. डिसेंबर जानेवारीमध्ये दुसरी लाट येऊ शकते सध्या जरी रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी पुढे ती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही,' असंही वावरे यांनी नमूद केलं.

पुण्याची आकडेवारी काय सांगते?

पुण्याची आकडेवारी पाहिली तर 12 सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1909 इतके नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या दिवशी 6626 इतक्या चाचण्या करण्यात आल्या, तर 41 नागरिकांचा मृत्यू झाला होता. पिंपरी चिंचवडमध्ये याच दिवशी 1363 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, तर 6554 इतक्या चाचण्या झाल्या होत्या. या दिवशी 16 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

एका महिन्यानंतर या आकड्यांमध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येत आहे. 11 ऑक्टोबर रोजी पुण्यात 697 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर या दिवशी 4788 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. या दिवशी 23 नागरिकांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये 490 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 4097 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. 7 नागरिकांचा या दिवशी मृत्यू झाला.

11 ऑक्टोबरच्या पुणे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या 154230 इतकी झाली आहे, तर 12898 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 3978 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवसाची पिंपरी चिंचवडची एकूण रुग्णसंख्या

83785 इतकी झाली असून 4204 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 1432 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)