You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत वीज गायब : रुग्णालयांमध्ये काय आहे स्थिती?
कोव्हिड काळात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याची सध्या चर्चा सुरु आहे. सध्यातरी मुंबई आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये स्थिती सामान्य असल्याची माहिती मिळत आहे.
हॉस्पिटल्सचा वीज पुरवठा तातडीनं पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये सांगितलं आहे.
" मुंबईच्या पालिका रुग्णालयात 24/7 पॉवर बॅकअप असतो. जंबो रुग्णालयातील पॉवर बॅकअप सुरू करण्यात आले आहेत. तसंच पालिका रुग्णालयातील रुग्णांना काहीही त्रास झाला नाही," अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.
मुंबईतील सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयात म्हणजेच जेजे रुग्णालयात सर्व सुरळीत सुरू असल्याचं अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
मुंबईतल्या कोव्हिड सेंटरमधली परिस्थिती सुरळीत आहे, तसंच तिथं पुरेसा पॉवर बॅकअप असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने बॅक अपवर काम सुरू होतं. आता वीज पुन्हा आली आहे, असं डॉ. गौतम भन्साळी यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
नायर रुग्णालयातील ICU आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या. पण OPD सेवा काही काळ बाधित झाली होती, पण आता मात्र ती पूर्ववत झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका निवासी डॉक्टरने बीबीसीला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "नायर रूग्णालयात वीज नसल्याने ओपीडी सेवा प्रभावित झाल्या. ICU आणि इतर अत्यावश्यक कामं योग्य सुरू होती. पण, पीपीई घालून कोव्हीड वॉर्डमध्ये काम करताना थोडा त्रास सहन करावा लागला. पणरुग्ण व्यवस्थेवर याचा काहीही परिणाम झाला नाही. कोव्हिडग्रस्त रुग्णांचे उपचार योग्य सुरू होते."
मुख्यमंत्र्यांचे आदेश
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे.
मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत.
अतिरिक्त डिझेल मागवा - पालिका आयुक्त
मुंबईतील रुग्णालयांनी डिझेल जनरेटर किमान 8 तास चालतील एवढ्या डिझेल पुरवठ्याची व्यवस्था करून ठेवावी, तसंच रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित व्हायला नको, विशेषतः ICUचा याची काळजी घ्यावी, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
तसंच आपत्ती निवारण यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
ज्या रुग्णालयांना मदतीची गरज आहे त्यांनी आपत्ती निवारण यंत्रणेशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)