You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महेंद्रसिंह धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली.
इतकंच नाही तर एकानं सोशल मीडियावर थेट धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. आरोपीनं धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते.
यानंतर रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2. कोणताही धर्म सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : हर्षवर्धन
कोणाताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. ते संडे संवाद कार्यक्रमात बोलत होते. टाईम्स ऑफ इंडियांनं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "आपण सण-उत्सवांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी पाळण्याकडे दुर्लक्ष केलं, तर कोरोना पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रुप धारण करू शकतो. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही याला माझी काळजी समजा अथवा माझा सल्ला मात्र हे सत्य आहे."
ते पुढे म्हणाले, "कोणत्याही धर्मात कोणताही धर्मगुरू लोकांना जीव धोक्यात घालून सण-उत्सव साजरा करण्यास सांगत नाही. कोणताही देव त्यांच्या पुजेअर्चेसाठी जीव धोक्यात टाकण्यास सांगत नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास सांगत नाही."
3. हाथरसप्रकरणी सीबीआय तपासावर विश्वास नाही - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचं दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणं सोपं होईल."
सीबीआय तपासासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये."
दरम्यान हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयनं सुरू केली असून याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.
4. महिलेवर सामूहिक बलात्कार करून मुलासह नदीत फेकले
बिहारमधील बक्सर येथे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिलं आहे. ज्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही लोक महिलेला वाचवण्यासाठी धावून गेले. नंतर या महिलेला नदीतून बाहेर काढण्यात आलं.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
5. मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील- संजय राऊत
सुशांतसिंह राजपूत प्रकरणादरम्यान मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक परदेशातील होते, असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "ट्विटर, व्हॉट्सअॅप आता नवीन विद्यापीठं आणि लढण्याची रणांगणं झाली आहेत. हाथरस आणि सुशांत प्रकरणात ते स्पष्ट दिसलं. कंगना या नटीनं मुंबईस पाकिस्तान म्हटलं आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील होते. हे सर्व ठरवून झालं. सुशांत प्रकरणातील 80 हजार फेक अकाउंटपैकी ते नंबर असायला हरकत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)