महेंद्रसिंग धोनीः या 5 कारणांमुळे धोनीनं स्वीकारली असावी निवृत्ती

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आज महेंद्र सिंग धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडिया आणि सर्वत्र चर्चा होत आहे. त्याने आज निवृत्ती का जाहीर केली असावी याबद्दल अनेक मतं व्यक्त होत आहेत. त्यापैकी काही शक्यता अशा आहेत.

  • धोनी आता 39 वर्षांचा आहे. गेलं वर्षभराहून अधिक काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 10 जुलै 2019 रोजी वन डे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. वन डे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये लागणारा वेग आणि चपळाई सरावानं वाढते. पण धोनीला पुरेसा सराव मिळालेला नाही.
  • कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे भारतातलं क्रिकेट सध्या बंदच आहे. टीम इंडिया आंतरराष्ट्रीय दौरा कधी करेल किंवा भारतात एखादा सामना कधी खेळेल हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे पुढची संधी कधी मिळेल हे माहीत नाही.
  • 'न्यू नॉर्मल' क्रिकेट नेमकं कसं असेल, हेही इतक्यात सांगता येणार नाही. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झालं असलं, तरी भारतीय टीमचा पुढच्या दौऱ्यांचा कार्यक्रम अजून निश्चित नाही. कदाचित क्वारंटाईनचा काळ पाहता दौरे आणखी लांबतील म्हणजे तुम्हाला घरापासून जास्त काळ लांब राहावं लागेल. हा निर्णय घेणं खेळाडूंसाठी सोपं नसेल.धोनी हा सचिन आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना?
  • पुढचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे, तोवर आपण फिट असू की नाही, याची धोनीला खात्री देता येणार नाही. मग अशा परिस्थितीत जितके सामने टीमच्या वाट्याला येतील तितक्या सामन्यांत युवा खेळाडूंना संधी मिळावी असा विचार तो करू शकतो.
  • पुढचा विकेटकीपर कोण? टी20 विश्वचषकापर्यंत भारताला धोनीच्या जागी विकेटकीपर म्हणून सर्वोत्तम पर्याय शोधावा लागेल. साधारण वर्षभरानं ही स्पर्धा होणार आहे, तोवर धोनी चाळीशीचा झाला असेल. आत्ता निवृत्ती घेतली, तर भारताला त्याच्या जागी विकेटकीपर म्हणून युवा खेळाडूंना पुरेशी संधी देता येईल.

काहीशी धोनीसारखीच परिस्थिती रैनाच्याही बाबतीत आहे. रैना जुलै 2018 नंतर आंतरराष्ट्रीय वन डे किंवा ट्वेन्टी20 क्रिकेट खेळलेला नाही. तो अखेरचा कसोटी सामना 2015 मध्ये खेळला होता. रैनाचं वयही 33 आहे.

या पार्श्वभूमीवर धोनी आणि रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, त्याचं आश्चर्य वाटत नाही. पण खेळाची चाहती आणि पत्रकार म्हणून या दोघांना निळ्या जर्सीत अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळायला हवी होती असं वाटतं. म्हणजे चाहत्यांनाही त्यांना सन्मानानं निरोप देता आला असता. पण आता कोरोना व्हायरसनं हिरावून घेतलेली ही आणखी एक गोष्ट ठरली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)