You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नाही- एम्स
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसल्याचा अहवाल एम्सने दिला आहे.
सुशांतचा मृत्यू पंख्याला लटकून आत्महत्या केल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे असं एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
गळफासाशिवाय कोणत्याही खुणा त्याच्या अंगावर नव्हत्या तसेच विरोध केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
कोणत्याही प्रकारचा नशा आणणारा पदार्थ सापडला नसल्याचं बाँबे फॉरेंसिक सायन्स लॅब आणि एम्स टॉक्सीलॉजी लॅबच्या तपासात स्पष्ट झालं आहे असंही डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.
सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एका न्यायवैद्यक पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यात सात डॉक्टरांचा समावेश होता. या पथकाने आपले निष्कर्ष सीबीआयला पाठवले आहेत. सीबीआय सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे.
सुशांत सिंग राजपूत मुळचा बिहारमधील पाटण्याचा. त्याचं कुटुंब बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातलं. आईच्या निधनानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या आवडीमुळे तो आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकला नव्हता.
त्यानंतर त्याच्या कुटुंबानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. 2008 साली किस देस मे मेरा दिल नावाच्या मालिकेतून त्याची छोट्या पडद्यावर एंट्री झाली. 2009 साली पवित्र रिश्ता मालिकेत मानव देशमुख ही भूमिका त्याला मिळाली आणि त्याच्या अभिनयातील करिअरला खरी गती मिळाली.
त्याने साकारलेला मानव देशमुख घराघरात पोहोचला. जरा नचके दिखा आणि झलक दिखला जा या डान्स शोमधून त्यानं आपलं नृत्यकौशल्य सर्वांसमोर सादर केलं. तेव्हापासूनच त्याच्या अभिनयाच्या आणि नृत्यकौशल्याची चुणूक सर्वांना दिसून आली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)