भारत चीन तणाव: कैलास पर्वतावर भारतीय सैन्याचा ताबा? - फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी हिंदी

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीनमधील तणाव अजूनही कायम आहे. याचदरम्यान लडाखमधील वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल माहिती सोशल मीडियावर फिरू लागलीय.

गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय की, भारतीय सैन्याने कैलास पर्वत आणि मानसरोवर ताबा मिळवला आहे.

रोज ही माहिती सोशल मीडियावरून पसरवली जात आहे. या माहितीसोबत एक फोटोही शेअर केला जात आहे. भारतीय सैन्य कैलास पर्वतावर तिरंगा फडकवत असल्याचं या फोटोत दिसतं, कैलास पर्वत भारताच्या ताब्यात आल्यानंतरचा फोटो, असा दावा करण्यात येतोय.

हा फोटो निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांच्या ट्विटर हँडलरून शेअर करण्यात आलाय, भारतीय सैन्य कैलास पर्वताच्या दिशेनं जात असल्याचा दावा बक्षींनी केलाय. या ट्वीटला तीन हजारहून अधिक जणांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय.

कैलास पर्वतावर भारतानं नियंत्रण मिलळवण्याची पसरणारी माहिती इथेच थांबली नाही. कारण यानंतर सोशल मीडियावर एबीपी न्यूजच्या बातमीची स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात झाली.

सत्य काय आहे?

सर्वात आधी त्या फोटोचं सत्य पाहू, या फोटोत कैलास पर्वतावर जाऊन भारतीय सैनिकांनी तिरंगा फडकवला आहे.

गूगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून आम्ही या फोटोची सत्यता पडताळली असता, तिरंगा फडकवणारे सैन्य वेगवेगळ्या ठिकाणांवरचे दिसून येतात. त्यांच्य मागे कैलास पर्वत नाही.

इंडिया टुडेच्या वेबसाईटवर 26 जानेवारी 2020 रोजी बनवण्यात आलेल्या फोटो गॅलरीत हा फोटो वापरण्यात आला होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये कशाप्रकारे 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, असं त्यात सांगितलं होतं.

रिव्हर्स इमेज सर्चवेळी एका फेसबुक पेजवरून या 9 सैनिकांचा फोटो शेअर करण्यात आलाय. 17 जूनला हा फोटो त्या पेजवरून शेअर करण्यात आला होता.

येंडेक्स सर्च पोर्टलद्वारे ज्यावेळी आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केलं, तेव्हा हाच फोटो 17 ऑगस्ट 2020 रोजी एका यूट्यूब व्हीडिओमध्ये दिसून आला.

कैलास पर्वतावर तिरंगा फडकवणाऱ्या कथित सैनिकांचा फोटो आणि या फोटोत बँकग्राऊंड वगळता सर्व काही सारखं दिसून येतं.

दुसरीकडे, एका खासगी वृत्तवाहिनीचे स्क्रीनशॉट शेअर करत दावा केला जातोय की, भारतीय सैन्याने कैलास पर्वतावर ताबा मिळवलाय.

दिल्ली विद्यापीठातील भूगोलचे प्राध्यापक आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले, भारती सीमेच्या आत कैलास पर्वताची रांगच नाही.

ते पुढे सांगतात, "पश्चिम तिबेटच्या ट्रान्स हिमायलात कैलास पर्वत आहे. कैलास रेंजमध्ये कैलास पर्वत आहे, जो लडाख रेंज संपल्यानंतर सुरु होतो. लडाखमध्ये केवळ हायर हिमालयाची लडाख रेंज आहे, जी पश्चिम तिबेटपर्यंत जात संपते आणि तिथून कैलास रेंज सुरू होते."

भारतीय सैन्य आता नेमकं कुठं आहे?

भारत आणि चीनमध्ये एप्रिलपासून LAC वर वाद सुरू आहे. त्यानंतर 15 जून रोजी भारत आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक झडप सुद्धा झाली. यात भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले.

या घटनेत चीनच्या सैनिकांच्या जीवितहानीबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आली नाही. मात्र, चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या दाव्यानुसार, 15 जूनला चीनचं काहीच नुकसान झालं नाही.

त्यानंतर 29-30 ऑगस्टच्या रात्री दोन्ही देशात पुन्हा तणाव निर्माण झाला होता. मात्र, दोन्ही देशांनी चिथावण्याचा आरोप एकमेकांवर केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितंल की, चीनने LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आणि आतल्या बाजूस मोठ्या संख्येनं सैन्य तैनात केलं आहे.

त्यानंतर गुरुवारी राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले की, भारत लडाखमध्ये आव्हानाला तोंड देतोय, यात काहीच शंका नाही. मात्र, भारत या आव्हानाचा सामना करेल.

लोकसभा आणि राज्यसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमा क्षेत्रातील भौगोलिक बदलावर कुठलेच विधान केले नाही. यातून हेच स्पष्ट होतं की, भारताने कुठल्याच नव्या जागेवर ताबा मिळवला नाहीय.

बीबीसी हिंदीच्या फॅक्ट चेकच्या पडताळणीत असं आढळलं की, 'कैलास पर्वताबाबत पसरवला जाणारा फोटो बनावट आहे आणि भारतीय सैन्याने कैलास पर्वातावर ताबा मिळवलेला नाही.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)