अटल बोगद्याबाबत लेह-लडाखच्या जनतेच्या काय आहेत भावना?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रिंचेन एंगमो चुमिकचन
- Role, बीबीसीसाठी लेहहून
शेरिंग दोरजे 83 वर्षांचे झालेत. या वयात त्यांना इतर काही आठवत असो-नसो एक गोष्ट मात्र पक्की स्मरणात आहे. 1998 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी झालेली भेट त्यांना आजही जशीच्या तशी आठवते.
हिमाचल प्रदेशच्या लाहौलमध्ये राहणारे विद्वान आणि इतिहासकार दोरजे एका विशेष मागणीसाठी वाजपेयी यांची भेट घेणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाचे सदस्य होते.
दोरजे कुल्लूमध्ये बसून फोनवरून सांगत होते की त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांकडे कुठल्याही ऋतूत सुरू राहील, असा बोगदा बनवण्याची मागणी केली होती.
त्या दिवसाविषयी सांगताना दोरजे म्हणाले, "आमची प्रमुख मागणी बोगद्यासंबंधी होती. लद्दाखला या बोगद्याशी जोडण्याविषयीसुद्धा आम्ही बोललो आणि दुसरी मागणी वर्षातून सहा महिने पूर्णपणे बंद असणाऱ्या लाहौलबाबत होती. हा बोगदा तयार करून आम्हाला आमच्या समस्येवर तोडगा हवा होता."
हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास हिवाळ्यात बर्फामुळे पूर्णपणे बंद होत असल्याने इथल्या नयनरम्य अशा लाहौल व्हॅलीचा वर्षातून 5 ते 6 महिने जगाशी संपर्क तुटतो.
'अटल बिहारी वाजपेयींकडून सकारात्मक प्रतिक्रिया'
अटल बिहारी वाजपेयी यांचं मनाली प्रेम सर्वश्रृत आहे. 2000 साली त्यांनी मनालीला लेहशी जोडण्याऱ्या प्रकल्पाची घोषणा केली होती.
पुढे 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्याला त्यांचंच नाव दिलं. त्यापूर्वी हा बोगदा रोहतांग बोगदा म्हणून ओळखला जायचा.
दोरजे सांगतात की आम्ही तिघे अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायला गेलो होतो. आमच्याबरोबर ताशी दावा होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रशिक्षण शिबिरादरम्यान त्यांची आणि अटल बिहारी वाजपेयी यांची मैत्री झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
दोरजे यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही ताशी दावा यांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी तयार केलं. आम्ही 'लाहौल संघी जनजाती सेवा समिती'च्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायला दिल्लीला गेलो. त्यांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद दिला."
ते सांगतात, "आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलो ते 1998 साली. हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यापूर्वीच तो बनवायला हवा होता, असं ते म्हणाले. 1999 साली जेव्हा आम्ही त्यांना दुसऱ्यांदा भेटलो तोपर्यंत कारगिर युद्ध संपलं होतं.
एव्हाना त्यांना आम्ही पहिल्या बैठकीत लडाखचा उल्लेख का केला होता, याची जाणीव झाली होती. त्यांना या गोष्टीचा आनंद होता आणि आश्चर्यही वाटत होतं की आम्हाला कारगिरविषयी माहिती कशी होती. त्यामुळे या भेटीनंतर त्यांनी तात्काळ बोगद्यासाठी होकार दिला होता."
अटल बोगदा जगातला सर्वात मोठा महामार्ग बोगदा म्हणून ओळखला जातो.
सीमा रस्ते संघटनेचं म्हणणं आहे की 9 किमी लांबीचा रस्ता संपूर्ण वर्षभर मनाली आणि लेहला जोडतो. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह यातलं अंतर तब्बल 46 किमीने कमी होईल आणि वेळेचीही बचत होईल.
भारत-चीन यांच्यातल्या तणावामुळे लेहच्या स्थानिकांना युद्धाची भीती सतावते आहे. हे लोक या बोगद्यामुळे खुश आहेत.
या कामातलं मुख्य आव्हान कोणतं?
लेहचे एक डीलर सी. एस. राठोड म्हणतात, "हा बोगदा खुला झाल्याने लडाखचं भविष्य उज्ज्वल होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. दोन्ही बाजूंचा विचार केला तर तब्बल 96 किमीचं अंतर कमी होईल. यामुळे वाहतुकीचा खर्चही कमी होईल. पूर्वी लेहला जाण्यासाठी एका ट्रकला तीन ते चार दिवस लागायचे. मात्र, या बोगद्यामुळे दोन दिवसात ट्रक लेहला पोहोचू शकेल."

मात्र, लेहमधलेच आणखी एक डीलर स्टेंजिन फंटोक या बोगद्याबाबत साशंक आहेत.
ते म्हणतात, "या बोगद्यामुळे काय फायदा होईल, हे आत्ताच सांगण कठीण आहे. कारण सिझन संपला आहे. त्यामुळे या बोगद्याचा किती फायदा होतो हे कदाचित पुढच्या वर्षीच सांगता येईल."
ते पुढे म्हणतात, "बोगदा सुरू झाला तरी ट्रकसाठी बरालाचा पास मुख्य आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी आमचे ट्रक बरालाचाला अडकले होते. बरेचदा ट्रक पाच-सहा महिन्यांसाठी तिथेच सोडून द्यावे लागतात. यामुळे खूप नुकसान होतं."
लेह-लडाखच्या अडचणी दूर करण्यासाठी अटल बोगदा पुरेसा नाही, असं फंटोकच नाही तर इतरही अनेकांना वाटतं.
लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद, लेहचे माजी मुख्य कार्यकारी काउंसीलर रिगजिन स्पालबर म्हणतात, "अटल बोगद्याचा लडाखच्या लोकांना विशेष फायदा होणार नाही. कारण बर्फवृष्टीमुळे बरालाचा, लाचुंगला, तांगलंगला आणि सेरचू पास संपूर्ण हिवाळाभर बंद असतात."
बरालाचा, लाचुंगला, तांगलांगला पास लडाखसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या पासच्या माध्यमातूनच लडाख अटल बोगद्याशी जोडलेला आहे आणि त्यानंतर मनालीशी.
हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे हे पास बंद झाल्यानंतर लोकांना अटल बोगद्यापर्यंत जाताच येणार नाही. भारतीय लष्करानेही अनेकदा सांगितलं आहे की लडाखला देशाच्या इतर भागाशी जोडण्यासाठी प्रत्येक ऋतूनुसार एक वेगळा बोगदा बनवण्याची गरज आहे.

फोटो स्रोत, LOBZANG NEEMA
निवृत्त कर्नल लोबजंग नीमा यांनी बीबीसीला सांगितलं, "रोहतांग पास एक धोकादायक पास मानला जातो आणि हा बोगदा तयार झाल्यास अनेक अपघात टळू शकतील. मात्र, लद्दाकसाठी रोगतांग पासपेक्षा तांगलंगला, लाचुंगला आणि बरालाचा पास जास्त अडचणीचे आहेत."
धोकादायक रस्ते, उंचच उंच पास, बर्फवृष्टी आणि हिमस्खलन यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी या बोगद्यामुळे कमी होणार आहे.
अटल बोगद्याचा दक्षिणेकडचं प्रवेशद्वार मनालीपासून 25 किमी दूर 3060 मीटर उंचावर आहे तर उत्तरेकडचं प्रवेशद्वार लाहौल व्हॅलीतील तेलींग गावाजवळ 3071 मीटर उंचावर आहे.
लाहौलच्या लोकांना वाटतं की बोगदा तयार झाल्यावर इथे पर्यटकांची संख्या वाढेल. यातून नोकरी आणि कामाच्या नव्या संधी निर्माण होतील. नवीन हॉटेल उघडतील. त्यामुळे नोकरीच्या संधी मिळतील आणि लोकांचं स्थलांतर थांबेल.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रायबल टुडेचे संपादक श्याम चंद आझाद बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कनेक्टिविटीव्यतिरिक्त अटल बोगद्यामुळे लाहौल-स्पितीत पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. लाहौलच्या लोकांसाठी ही 10 महिन्यांसाठीची मदत ठरेल.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खूप जास्त बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे हा बोगदा वर्षभर उपयोगात येईल, असं म्हणता येणार नाही. त्यामुळे वर्षातून केवळ दोनच महिने हा बोगदा बंद असेल, असं मानायला हरकत नाही."
ते म्हणाले, "लाहौलमध्ये हिवाळी पर्यटनासाठी बराच वाव आहे आणि माउंटेनिअरिंग इंस्टिट्युटने पाठवलेल्या प्रस्तावामुळे पंतप्रधान विंटर स्पोर्ट्सबाबत काही घोषणा करतील, अशी आशा आम्हाला आहे."
असं असलं तरी जमीन, संस्कृती आणि ओळख याबाबत काहींनी काळजीही व्यक्त केली आहे.
प्रकल्पाचे मुख्य इंजिनिअर सांगतात की हा बोगदा 6 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, प्रत्यक्षात 10 वर्षं लागली.
लाहौलचे इतिहासकार शेरिंग दोरजे म्हणतात, "बोगदा तयार होण्यासाठी इतका काळ लागला, याचं थोडं वाईट वाटतं. वयोमानाने शक्य नाही. नाहीतर या बोगद्यासाठी नक्कीच धावपळ केली असती."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








