UPSC: 4 ऑक्टोबरला होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलणं शक्य नाही, आयोगाची कोर्टाला माहिती

चार ऑक्टोबरला होणारी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली जाऊ शकत नाही, असं केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं आहे.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं UPSC ला मंगळवारपर्यंत (29 सप्टेंबर) प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे UPSC कडून घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिसेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीदरम्यान UPSC च्या वकिलांनी म्हटलं की, सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा आधी 30 सप्टेंबरला होणार होती. त्यानंतर ती 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा पुढे ढकलणं शक्य नाही.

सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा 2020 च्या आयोजनाविरोधात UPSC च्या 20 उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती.

'ही सात तास चालणारी ऑफलाइन परीक्षा आहे. सहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील आणि देशातील 72 परीक्षा केंद्रांवर याचं आयोजन करण्यात य़ेणार आहे. त्यामुळे या परीक्षेचं आयोजन हे कोरोना संसर्गाचं कारण ठरू शकत,' असं याचिकेत म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)