जसवंत सिंह... ज्यांना अटलबिहारी वाजपेयींचे 'हनुमान' म्हटलं जायचं...

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताचं परराष्ट्र, अर्थ आणि संरक्षण मंत्रिपद भूषवणाऱ्या जसवंत सिंह याचं आज (27 सप्टेंबर) निधन झालं.

1998 च्या आण्विक चाचणीनंतर जगासमोर भारताची बाजू मांडून जगाचे गैरसमज दूर करणं, हे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांच्यासमोर आव्हान होतं. जसवंत सिंह यांनी ही भूमिका उत्तमरित्या वठवली होती.

जसवंत सिंह आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्र मंत्री स्ट्रोब टालबॉट यांच्यात दोन वर्षांत सात देशांमध्ये भेटी झाल्या. संवाद कायम राहण्यासाठी एकदा तर ते ख्रिसमसच्या दिवशी सकाळी भेटले होते. नंतर टालबॉट यांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला.

आपल्या 'एंगेजिंग इंडिया डिप्लोमसी, डेमोक्रसी अँड द बॉम्ब' या पुस्तकात ते लिहितात, "जसवंत सिंह मला जगभरात भेटलेल्या प्रभावी व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची सत्यनिष्ठा पर्वताप्रमाणे आहे. त्यांनी नेहमीच माझ्याशी अतिशय स्पष्टपणे संवाद साधला."

भारताची बाजू इतक्या चांगल्या पद्धतीने माझ्यासमोर कुणीच मांडली नाही. त्यांच्याच प्रयत्नामुळे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा भारत दौरा होऊ शकला.

पण, 2004 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री स्ट्रोब यांच्याऐवजी मेडलिन ऑलब्राईट यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असं त्यांनी म्हटलं होतं.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

जसवंत सिंह यांचा जन्म 3 जानेवारी 1938 ला बारमेर जिल्ह्यातील जसोल गावात झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून न येणाऱ्या मोजक्या नेत्यांच्या यादीत जसवंत सिंह यांचा नाव होतं.

त्यांचं शिक्षण अजमेरच्या सुप्रसिद्ध मेयो कॉलेजमधून झालं. जसवंत सिंह इंग्रजी भाषेवरील आपल्या प्रभुत्वामुळे लोकप्रिय होते. पण त्यांच्या महाविद्यालयीन वयात त्यांना इंग्रजी येत नव्हती. त्यांनी याबाबत आपली आत्मकथा 'अ कॉल टू ऑनर' मध्ये लिहिलं आहे.

इंग्रजी न येणं माझ्यासाठी लज्जास्पद होतं. पण ही भाषा शिकण्यासाठी इतर कुणाची मदत घेणं मला पटत नव्हतं. त्यामुळेच मीच ही भाषा शिकून यात पारंगत व्हायचं, हा निर्णय घेतला."

वाजपेयी यांचे निकटवर्तीय

जसवंत सिंह यांना जवळून ओळखणाऱ्या लोकांना नक्कीच त्यांच्याबददल माहित असेल. जसवंत सिंह खूपच सुसंस्कृत, ज्ञानी आणि स्पष्ट स्वभावाचे होते.

बोलण्याची कला त्यांच्याकडे होती. ते अत्यंत विचारपूर्वक बोलत असत.

त्यांना अनेकवेळा भेटलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला सांगतात, "त्यांच्यासारखे शालीन आणि सुसंस्कृत व्यक्ती राजकारणात खूप कमी होते. लष्करातील कारकीर्द सोडल्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत लष्करी नियमांचा कधीच त्याग केला नाही.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे विश्वासू असल्यामुळे ते त्यांच्या खूप जवळ होते.

लोकनेते बनू शकले नाहीत

जसवंत सिंह यांच्या राजकीय आयुष्यात एक कमतरता होती. ते आपल्या जीवनात लोकांचे नेते म्हणून कधीच नावलौकिक मिळवू शकले नाहीत.

त्यांनी आपला मतदारसंघ तयार करण्याची कलासुद्धा शिकली नाही. 1989 मध्ये त्यांनी जोधपूर, 1991 आणि 1996 ला चित्तौडगड आणि 2009 ला दार्जिलिंगमध्ये विजय मिळवला पण त्यांच्या मतदारांमध्ये नाराजी असायची. विजय मिळवल्यानंतर ते मतदारसंघाकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार तिथल्या नागरिकांची असायची.

जसवंत सिंहांना ते जमेल तरी कसं? ते नेहमी आपले नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे संकटमोचक म्हणून कामात असायचे. कधी जयललिता यांची मनधरणी करणं, तर कधी जनरल मुशर्रफ यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी रणनिती बनवणं, या कामात ते व्यस्त असत.

यामुळेच जसवंत सिंह यांना अटल बिहारींचा 'हनुमान' असं संबोधलं जायचं.

कंदहार विमान अपहरण प्रकरणावरून टीकेचा भडीमार

जसवंत सिंह यांच्यावर सर्वात जास्त टीका कंधार प्रकरणावेळी झाली. 1999 मध्ये कंदहार विमान अपहरणानंतर तीन दहशतवाद्यांनी त्यांनी आपल्या विमानातूनच कंदहारला नेलं. पण आपल्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच आपण असं केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

त्यांनी आपल्या 'कॉल टू ऑनर' या आत्मचरित्रात लिहिलं, "कंदहारमध्ये उपस्थित आमचे तीन अधिकारी अजित डोवाल, सीडी सहाय आणि विवेक काटजू यांनी म्हटलं होतं मोठा निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्तीलाच कंदहारला पाठवून द्या."

"सुरुवातीला हदशतवादी 40 जणांच्या सुटकेची मागणी करत होते. पण आम्ही 3 जणांना सोडण्यास तयार झालो. पुढच्या वेळी तिथूनच निर्णय घेण्याची गरज असल्यामुळे मी कंधारला जाण्यास तयार झालो."

जसवंत सिंह यांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव राहिलेले विवेक काटजू सांगतात, "या प्रकरणात जसवंत सिंह यांच्यावर टीका झाली. हा त्यांच्यासोबतचा अन्याय आहे. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा एकट्याचा नव्हता. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती.

"अडकलेल्या भारतीय कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे परत आणणं, हा प्रमुख उद्देश होता. टीकाकारांनी याचा विचार केला नाही," असं काटजू यांना वाटत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)