IPL 2020: यशस्वी जैस्वाल एकेकाळी पाणीपुरी विकायचा, आता आयपीएलमधला उदयोन्मुख खेळाडू आहे

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Jan Kruger-ICC

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वालने महेंद्रसिंग धोनीला केलेला नमस्कार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. परिस्थितीशी संघर्ष करत आयपीएल पदार्पण करणाऱ्या यशस्वीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.

मंगळवारी राजस्थान आणि चेन्नई मॅच होती. मॅचपूर्वी टॉससाठी चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि राजस्थानचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ पिचपर्यंत गेले. टॉस झाला आणि दोन्ही कॅप्टन्स परतू लागले. धोनीला पाहून प्रत्येकजण हाय फाईव्ह देऊ लागला. न्यू नॉर्मलनुसार हातांच्या मुठी पंचसारख्या करून नमस्कार चमत्कार होतात.

तिथे राजस्थानकडून पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल होता. उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय. गेल्या वर्षी U19 वर्ल्डकपला मॅन ऑफ द सीरिज होता. राजस्थाननने त्याला संधी दिली आहे.

धोनी समोर आल्यावर यशस्वीच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण मोठ्या प्लेयरला भेटल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात दिसत होतं. सगळे हाय फाईव्ह देत होते. धोनीला पाहून यशस्वीने गुरुजींना करतात तसा रीतसर हात जोडून नमस्कार केला, धोनीने नीट पाहिलं आणि छानसं स्माईल दिलं. धोनी चाळिशीत आलाय. यशस्वी विशीत आहे.

धोनीने करिअरमध्ये असंख्य पोरांना संधी दिलेय, त्यांच्या कठीण काळात ठामपणे मागे उभा राहिलाय, खेळत असताना सल्ला दिलाय. असे असंख्य यशस्वी धोनीने पाहिलेत. यशस्वीसाठी ही सुरुवात आहे. या टप्प्यावरून हरवून जाणारेही खूप आहेत. मोठ्ठा पल्ला गाठायचाय पण अजूनतरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो स्थित्यंतराचा क्षण होता. एकीकडे सूर्यास्त जवळ आहे, एकीकडे झुंजूमूंजू होतंय.

सोशल मीडियावर यशस्वीच्या या नमस्काराची भरपूर चर्चा रंगली.

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, यशस्वीने धोनीला नमस्कार केला तो क्षण

यशस्वी जैस्वालने मंगळवारी राजस्थानसाठी पदार्पण केलं. एक खणखणीत चौकार लगावून यशस्वीने चुणूक दाखवली. मात्र एका उसळत्या बॉलवर पूल करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. पहिल्या मॅचमध्ये 6 रन्स करून तो तंबूत परतला.

आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने असंख्य युवा खेळाडूंना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळतं. मोठ्या खेळाडूंबरोबर वावरण्याचा, सराव करण्याचा अनुभव मिळतो. काहींना टीम इंडियाचे दरवाजे उघडतात. काहींचा प्रवास भरकटतोही. यशस्वीच्या नावातच यश आहे. आता कुठे सुरुवात झालेय, पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता.

गेल्या वर्षी U19 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरीनंतर यशस्वी जैस्वालचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी बीबीसीशी संवाद साधला होता.

"यशस्वी अकरा वर्षांचा असेल तेव्हा मी पहिल्यांदा त्याला खेळताना पाहिलं. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याचा जगण्याचाच संघर्ष तीव्र आहे. त्याच्याकडे मुंबईत राहण्यासाठी घर नव्हतं, ना खाण्यासाठी पैसे होते. मुंबईतल्या एका क्लबमध्ये गार्डबरोबर तंबूत राहत असे. दिवसभर क्रिकेट खेळत असे, संध्याकाळी पाणीपुरी विकण्याचं काम करत असे. त्या लहान वयात तो उत्तर प्रदेशातलं भदोही हे गाव सोडून स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत आला होता".

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

"तो काळ त्याच्यासाठी अवघड होता. घराची आठवण येणं साहजिक. एकप्रकारे त्याने त्याचं बालपण गमावलं होतं. पण त्याला काहीतरी करून दाखवायचं होतं. माझा प्रवासही असाच काहीसा होता. मीही लहान वयात गोरखपूरहून मुंबईला आलो होतो. यशस्वी ज्या सगळयातून जात होता त्या सगळ्यातून मीही गेलो होतो. त्याच्या अडचणी मी समजू शकत होतो.

"घरून अगदी कमी पैसे येत होते. इथे काय चाललंय हे तो घरी सांगू शकत नव्हता. इथली परिस्थिती कळली तर घरचे परत बोलावून घेण्याची भीती मनात होती. तेव्हा मी ठरवलं की या मुलाला बळ द्यायचं. याला मदत करायला हवी. याला ट्रेनिंग मिळायला हवं. याला खेळाकरता जे काही लागेल ते पुरवायला हवं. तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे," ज्वाला सिंह सांगतात.

गेल्या वर्षी U19 वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वीची बॅट तळपली होती. त्यानंतर ज्वाला सिंह यांनी यशस्वीच्या प्रवासाबद्दल बीबीसीशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, "एक चूक पिछाडीवर नेऊ शकते. मेहनत करणारे असंख्य खेळाडू आहेत. परंतु कितीजण यशस्वी वाटचाल करतात?"

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

"U19 स्पर्धेतली दिमाखदार कामगिरी यशस्वीच्या कारकीर्दीतला निर्णायक टप्पा ठरणार का? नक्कीच ठरू शकतो. परंतु यात अडकून चालणार नाही. एका मॅचमध्ये शानदार कामगिरी करून भागत नाही. सातत्याने चांगलं खेळायला हवं. खेळातल्या चुका कमी करायला हव्यात. प्रतिस्पर्धी बॉलर्सचा अभ्यास करायला हवा. चांगली इनिंग्ज खेळली तर तिचं कोडकौतुक फार दिवस करत बसू नये. धावांची भूक जागृत ठेवायला हवी. यासाठी मी यशस्वीला अनेक उदाहरणं दिली", असं ज्वाला सांगतात.

यशस्वीने आर्थिकदृष्ट्या कठीण काळ पाहिला. त्या काळात आर्थिक मदत मिळाली का? यावर ज्वाला सिंह 'नाही' असं उत्तर देतात.

ते सांगतात, "क्रिकेट खेळण्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत घ्यायला मी तयार आहे असं यशस्वीने मला सांगितलं. त्याचं बोलणं मला भावलं. मीही असाच झगडत संघर्ष करत आगेकूच केली. म्हणूनच मी ठरवलं, जिथे मी माझं क्रिकेट थांबवलं, त्याच ठिकाणाहून यशस्वीचं क्रिकेट पुढे न्यायचं. त्याला खेळताना पाहून मीच खेळतोय असं मला वाटतं. कारण त्याची खेळण्याची शैली माझ्यासारखीच आहे".

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Jan Kruger-ICC

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल U19 वर्ल्ड कप स्पर्धेत मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

यशस्वीबरोबरच्या पहिल्या भेटींबाबत ज्वाला सांगतात, "आम्ही भेटलो तेव्हा त्याचा जगण्याचा संघर्ष हळूहळू संपत आला होता. त्याची परिस्थिती सुधारत होती. मला स्वत:ला उभं राहण्यासाठी जेवढे टक्केटोणपे खावे लागले तेवढा संघर्ष सुदैवाने यशस्वीला करावा लागला नाही.

"त्याचं खाणंपिणं, राहणं, कोचिंग सगळ्याची जबाबदारी मी घेतली. त्याला ट्रेनिंगसाठी इंग्लंडलाही पाठवलं. यशस्वीला पाहून माझ्या घरचे त्याला म्हणतात, तुला खेळण्यासाठी जे जे हवं आहे ते मिळालं. ज्वालाला त्याच्या उमेदीच्या काळात हे मिळालं असतं तर तोही मोठा झाला असता."

मुंबईतल्या स्थानिक क्रिकेटमधली चांगली कामगिरी, U19 वर्ल्डकपमधलं प्रदर्शन यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने 2 कोटी 40 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केलं. या पैशाचं यशस्वीच्या लेखी किती महत्त्व यावर ज्वाला सांगतात, "कोणताही खेळाडू किंवा लष्करात कार्यरत व्यक्तीच्या तुम्ही घरी जाल तर भिंतींवर, कॅबिनेटमध्ये पदकं, ट्रॉफीज, सन्मानचिन्ह दिसतील. तिजोरीतले पैसे तुम्हाला दिसणार नाहीत.

"क्रिकेटपटूसाठी क्रिकेट हे असं असायला हवं. खेळातलं कर्तृत्व त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. पैसे आवश्यक आहेत कारण त्यातून सरावासाठी, सुधारणेसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता होते. आमचं उद्दिष्ट हेच आहे की आयपीएलमध्ये जाऊन सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार यशस्वीने पटकवावा".

यशस्वी जैस्वाल, मुंबई, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Jan Kruger-ICC

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

यशस्वीच्या आतापर्यंतच्या प्रवासातल्या महत्त्वाच्या खेळी

  • 2015 मध्ये गाईल्स शिल्ड स्पर्धेत 319 रन्सची मॅरेथॉन खेळी आणि 13 विकेट्स.
  • 2018 U19 आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक रन्स
  • 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या युथ टेस्टमध्ये 173 रन्सची खेळी
  • इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 294 रन्स
  • 16 ऑक्टोबर 2019 रोजी विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना झारखंडविरुद्ध 154 बॉलमध्ये 203 धावांची धुवांधार खेळी. 17व्या वर्षी ही खेळी करत लिस्ट ए क्रिकेटमधला सगळ्यात लहान वयाचा द्विशतकवीर होण्याचा मान पटकावला. या खेळीत 17 फोर आणि 12 सिक्सेसचा समावेश.
  • 2019-20 विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अव्वल पाचमध्ये.
  • गेलया वर्षी झालेल्या U19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक रन्स. मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)