भारत-चीन वाद: राजनाथ सिंह यांची माहिती आणि काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा

चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि आसपासच्या परिसरात सैनिकांच्या तुकड्या आणि हत्यारं तैनात केली आहेत, अशी माहिती देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

सीमेवर भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या घडामोडींवर संसदेत माहिती देताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं, "पूर्व लडाख आणि गोगरा, कोंगका ला आणि पँगाँग लेकच्या उत्तर तसंच दक्षिण भागात हालचाली दिसून येत आहेत. LAC वर काही ठिकाणी चीननं मोठ्या प्रमाणावर सैनिक आणि हत्यारं तैनात केली आहेत. आपलं लष्करही या आव्हानाला सामोरं जायला तयार आहे."

चीनच्या या कारवाईला प्रत्युत्तर देताना आपल्या सेनेनंही आवश्यक ती तैनाती केली असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं, "LAC वर तणाव वाढत असल्यामुळे दोन्ही देशाच्या सैनिक कमांडर्सची 6 जून 2020 ला बैठक झाली. डिसएन्गेजमेंट करण्यावर सहमतीही झाली. LAC चा स्वीकार केला जाईल आणि जैसे थे परिस्थिती बदलेल अशी कारवाई होणार नाही, ही गोष्टही या बैठकीत मान्य झाली होती."

"या सहमतीचं उल्लंघन करून चीननं 15 जूनला गलवानमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण केली. आपल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले. चीनलाही या झटापटीत नुकसान सहन करावं लागलं."

काँग्रेसनं संरक्षण मंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत सरकारला काही प्रश्न विचारले.

राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं की, संरक्षण मंत्र्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होतंय की मोदींनी देशाची दिशाभूल केली आहे. देश नेहमीच लष्कराच्या पाठिशी उभा आहे. पण मोदीजी तुम्ही लष्कराच्या बाजूने कधी उभं राहणार?

पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही एक ट्वीट करून म्हटलं की, देश लष्करासोबत एकजूट होऊन उभा आहे. पण चीनने आपल्या भूमीत घुसखोरी करण्याचं दुःसाहस कसं केलं? मोदीजींनी याबद्दल देशाची दिशाभूल का केली?

जून महिन्यात भारत-चीन दरम्यान काय झालं?

15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी जवानांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका कर्नलसह 20 जवान शहीद झाले. या चकमकीत चिनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचं सांगितलं जात होतं.

या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला.

2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले, तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला.

भारताचे आघाडीचे सुरक्षा विश्लेषक अजय शुक्ला यांनी त्यावेळी चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतल्याचं म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)