कंगना राणावतचं उद्धव ठाकरेंची तुलना रावणाशी करणारं ट्वीट #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. कंगना राणावतनं केली उद्धव ठाकरे यांची रावणाशी तुलना

कंगना राणावतनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना रावणाशी करणारा एक फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

या फोटोत कंगनाला झाशीच्या राणीच्या रुपात दाखवलं आहे.

ट्वीट करत तिनं म्हटलंय, "अनेक मीम्स माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. पण, माझे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवलेल्या या मीम्समुळे मी भावनिक झाले. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन."

कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद सध्या पेटला आहे. याची सुरुवात कंगनानं मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना अशीही नावं दिल्याचं बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, कंगना राणावत रविवारी 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवनावर संध्याकाळी साडेचार वाजता कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे.

2. अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?- एकनाथ खडसे

माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का?असाही प्रश्न खडसेंनी विचारला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता.

3. सोनिया गांधी वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला रवाना

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी शनिवारी (12 सप्टेंबर) अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. इकॉनॉमिक्स टाइम्सनं ही बातमी दिलीय.

सोनिया यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल गांधी आहेत आणि हे रूटीन मेडिकल चेक-अप असल्याचं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सोनिया गांधी अमेरिकेला जाऊ शकल्या नव्हत्या, असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.

सोनिया गांधी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परत येतील, असं बातमीत म्हटलं आहे.

4. छगन भुजबळ होम क्वारंटाइन

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हेदेखील होम क्वारंटाइन झाले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणं आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे..

5. लॉकडाऊन काळात पीएफमधून हजारो कोटी रुपये काढले

भविष्य निर्वाह निधी मंडळाने गेल्या पाच महिन्यांत 35 हजार 445 कोटी रुपयांची प्रकरणे निकालात काढली आहेत. सकाळनं ही बातमी दिली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या 5 महिन्यात 32 टक्के अधिक कर्ज निकाली काढण्यात आलं आहे, तर निधी वाटपाच्या रकमेत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लॉकडाऊनच्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात 94.41 लाख कर्मचाऱ्यांनी पीएफ मधून पैसे काढण्यासाठी अर्ज केले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)