रिया चक्रवर्ती: टीव्हीवरची मुलाखत आणि द्वेषाचा महापूर : ब्लॉग

    • Author, दिव्या आर्या
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनत्री रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर तिला मरण यावं अशा आशयाच्या अनेक पोस्ट पडल्या.

एका सभ्य समाजात असं मानलं जात की कुणाचाही मृत्यू चिंतू नये आणि असं कुणी करत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी कमालीचा द्वेष किंवा संताप आहे. ही अतिशयोक्ती नाही तर ही बेसिक गोष्ट आहे. ही सामान्य मानवी मूल्यं आहेत. याच मूल्यांमुळे तुम्हाला माणूसपण मिळतं. काही कारण नसताना तुम्ही एखाद्याचा मृत्यू किंवा त्याने आत्महत्या करावी, असं का चिंताल?

एखाद्या व्यक्तीला मृत्यू यावा, यासाठी प्रार्थना करत असल्याचं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा आत्महत्या करावी, असा सल्ला देणाऱ्याकडे तसंच काही ठोस कारण असेल.

मात्र, या प्रकरणात ठोस कारणाऐवजी जे दिसतंय ते भयंकर आणि तेवढंच भीतीदायकही आहे. ते एका सभ्य समाजाच्या पायालाच धक्का देणारं आहे. गुन्हा सिद्ध झाला नसतानाही केवळ संशयाच्या आधारावर निकाल सुनावण्याची अनेक भारतीय टीव्ही चॅनल्सना घाई असते.

याच घाईने लोकांची सारासार विचारबुद्धी खुंटीला टांगली आहे. गिधाडांचा असा समाज तयार करण्याचं काम सुरू आहे जिथे असा समज दृढ होतोय की न्याय करणं हे मीडिया आणि जमावाचं काम आहे. तपास संस्था फक्त फॉलोअप करतील.

मीडिया ट्रायलचं सर्वांत भयंकर उदाहरण अशी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची इतिहासात नोंद होईल, यात शंका नाही.

आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हा गुन्हा आहे. मात्र, सोशल मीडियाच्या जगात कायदे आणि भावना दोन्हींच्या व्याख्या कदाचित बदलतात.

संयमाला काही अर्थ नाही. उत्तरदायित्वाची भीती नाही आणि जबाबदारीची जाण कॉम्प्युटर किंवा फोनची स्क्रीन ऑफ झाल्याबरोबर गायब होते.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा मीडियाला मुलाखत देताना रियाने म्हटलं की गेल्या काही महिन्यात त्यांच्यावर जे 'निराधार' आणि 'खोटे' आरोप करण्यात आले त्यामुळे त्या स्वतः आणि त्यांचं कुटुंब इतक्या मानसिक तणावात आहेत की त्यांना आत्महत्या करावी वाटते.

मुलाखतीत एका ठिकाणी ती म्हणते की रोज-रोजच्या 'जाचा'पेक्षा आम्हा सर्वांना एका रांगेत उभं करून गोळ्या का नाही घालत?

'आत्महत्येपूर्वी पत्र लिहायला विसरू नको'

रिया चक्रवर्ती दोषी आहे की निर्दोष, तिच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत की खरे, हे तपासात निष्पन्न होईल. गुन्ह्याची शिक्षाही त्यावरच ठरेल. मात्र, तपास यंत्रणा आपलं काम करत असताना टीव्ही आणि सोशल मीडियावर जी ट्रायल सुरू आहे त्याचा तिच्यावर इतका दबाव आहे की आपल्याला आत्महत्या करावी वाटते, या तिच्या म्हणण्यालाही नाटकीपणा म्हणत 'तुला कोण थांबवतं आहे', 'आम्ही तर वाट बघतोय', 'सुसाईड लेटर लिहायला विसरू नको' असं टाळ्या वाजवत, मोठमोठ्याने हसून लिहिणाऱ्यांविषयी काय सांगतं?

मुलाखतीत रियाच्या हावभावावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचंच उदाहरण बघा. 'ती कॅज्युअल आणि कॉन्फिडंट वाटते.' 'पॅनिक अटॅक आणि अँक्झायटीविषयी बोलते, पण तसं दिसत मात्र नाही.' 'तिला अजिबात दुःख नाही.' 'ती आपलं हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती'.

डोळ्यात अश्रू आहेत की नाही, यावरून रियाला दुःख झालं आहे की नाही, हे ठरवणं हे अतिशय फिट आणि उत्साही सुशांतकडे पाहून तो डिप्रेशनमध्ये होता की नाही हे ठरवण्यासारखंच आहे.

रिया खोटं बोलतेय हे तिच्या कपडे आणि हावभावांवरून ठरवणं, तिचा मृत्यू व्हावा अशी इच्छा व्यक्त करणं, इतका द्वेष येतो कुठून? आणि या द्वेषाला खतपाणी कोण घालतं?

सुशांत सिंह राजपूत डिप्रेशनमध्ये होता हे समोर आल्यावर सहानुभूती दाखवणारे आणि बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर टीका करणारे, आता मात्र स्वतःच रक्तपिपासू जमावाचं रूप धारण करत आहेत.

रियाचं म्हणणं आहे की सुशांत आणि तिचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, मीडियातला एक मोठा गट आणि सोशल मीडियावरचा एक मोठा जमाव त्या नात्यात रियाच्या म्हणजेच 'बाहेरच्या स्त्रीच्या' भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांसोबतच्या संबंधात कटुता आल्याने आणि सुशांतची दुबळी बाजू जगासमोर आणल्याने लोकांना ती अधिक मोठी खलनायिका वाटू लागली आहे. तिच्या स्वतःच्या कुटुंबाने 'लिव्ह इन' रिलेशन स्वीकारूनही समाजातला एक मोठा गट हे नातं स्वीकारायला तयार नाही.

'अँटी नॅशनल मीडिया'

एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूवर मीडियाने प्रश्न उपस्थित करणं आणि प्रकरणाशी संबंधित सर्व बाजू लोकांसमोर आणणं गरजेचं आहे.

मात्र, रिया चक्रवर्तीची मुलाखत घेणाऱ्या चॅनलला दुसरी बाजू दाखवल्यामुळे 'बिकाऊ', 'खोटारडे' आणि 'अँटी नॅशनल' म्हटलं जातंय. इतकंच नाही तर मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना रियाचे बॉयफ्रेंडही म्हणण्यात आलं.

रियाची कसून झाडाझडती घेतली नाही आणि तिला तिची बाजू मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं, असेही आरोप होत आहेत .

खरंतर गेल्या दोन महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या वा नसणाऱ्या किंवा निगडीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना आरोप करण्यासाठी मीडियाने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

आता त्या आरोपांना उत्तर देण्यात आलं आणि ते एका विशिष्ट गटाला रुचलं नाही. यावर अत्यंत गलिच्छ पद्धतीने आरडाओरड करून आवाज दाबण्याचं, तावूनसुलाखून घेतलेलं जुनचं शस्त्र पुन्हा उगारण्यात आलं.

मुलाखतीत रिया बहुतेकवेळा शांत होती. काही वेळा तिला रडू आलं, पण मुलाखत थांबली नाही.

तिने सर्व आरोप शांतपणे आणि पूर्ण ऐकले आणि अजिबात विचलित न होता थेट उत्तरं दिली.

रियाच्या हावभावांवर हे माझं वैयक्तिक मत असू शकतं. काहींना तिच्या संयमात खोटारडेपणा जाणवला, अगदी तसंच.

मात्र, एकदा ती आक्रमक झाली आणि त्याचा एकच अर्थ होता जो या क्षणाला त्यांच्याविषयी काहीही लिहिणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. ती म्हणाली, "उद्या काही झालं तर कोण जबाबदार असेल? मला एक फेअर ट्रायलही मिळणार नाही का?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)