You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाड दुर्घटना: 'बिल्डरला भर चौकात फाशी द्या,' नातेवाईक गमावलेल्या बशीर यांची उद्विग्नता
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी महाडमधल्या दुर्घटनेचं वार्तांकन केलं. पत्त्यासारखी कोसळलेली इमारत, आप्तांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारे रहिवासी, कोसळणाऱ्या पावसातले बचाव पथकाचे प्रयत्न आणि यासगळ्यावर असणारं कोरोनाचं सावट. महाडमधला आशा-निराशेच्या क्षणांचा हा अनुभव.
महाडमध्ये बिल्डींग पडल्याची बातमी संध्याकाळी 7 च्या सुमारास न्यूज चॅनेलवर धडकू लागली. कोणी 70-80 लोक अडकल्याची भीती व्यक्त करत होतं तर कोणी 100 हून अधिक लोक असल्याचं सांगत होतं. एकूणच सगळं चित्र भीषण होतं.
पत्त्यासारख्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होऊ लागले. महाडमधल्या लोकांशी बोलताना ही घटना खूप मोठी असल्याचा अंदाज ते व्यक्त करत होते. मृतांचा आकडा किती मोठा असेल याचा वेगवेगळे अंदाज लावले जात होते.
एनडीआरएफच्या चार टीम पोहचल्याचं अधिकार्यांनी सांगितलं. बचाव पथकाने त्यांचं काम सुरू केलं असलं तरी पावसाचा मोठा अडथळा जाणवत होता.. दोन जणांचा मृत्यूचा आकडा रात्रीपर्यंत कळला होता. हे सगळं टीव्हीवर दिसत होतं. दुसऱ्या दिवशी वार्तांकन करण्यासाठी मी आणि माझा सहकारी तिथे पोहोचलो तेव्हा मात्र परिस्थिती आणखी बिकट असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांचे बॅरिकेड्स असले तरी घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत आम्ही पोहचलो. लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. मृतांचा आकडा सकाळपर्यंत दोन होता. 'त्या' इमारतीतल्या लोकांना बाजूच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हलवलं होतं.
आजूबाजूच्या फक्त बघायला आलेल्या लोकांमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात होते. दुर्घटना मोठी होती तरीही कोव्हिड काळात जगतोय याची वारंवार जाणीव करून द्यावी लागते, हे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
आम्ही बातमीसाठी व्हिज्युअल्स घेत होतो. अडकलेल्या लोकांचे नातेवाईक त्या ढिगाऱ्याखालून आपलं कोणी आता बाहेर निघतंय का? निघालं तरी ती व्यक्ती जिवंत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थितांच्या मनात होते. घड्याळाचे काटे सरकत होते.
"अम्मी आप कहॉं हो...?"
इमारतीला लागून असलेल्या घराच्या कट्ट्यावर साधारण चाळिशीतला एक माणूस घाबरलेल्या अवस्थेत बसला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते, कपडे अस्ताव्यस्त झाले होते. चेहराभर चिंतेचे भाव पसरले होते.
त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला समजावत होते. 'पण तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात' हे वाक्य माझ्या कानावर पडलं आणि मी त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे गेले. बशीर पारकर असं त्या व्यक्तीचं नाव होतं.
ते सांगत होते, "माझं आणि माझ्या मेहुणीचं कुटुंब एकत्र राहत होतं. लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांपूर्वी मी माझं कुटुंब म्हणजे पत्नी आणि मुलांना घेऊन माझ्या गावी गेलो. माझ्या भाच्यांची ऑनलाईन शाळा होती म्हणून ती इथेच थांबली. आमची मुलं रोज व्हीडिओ कॉलवर गप्पा मारायची. काल सकाळचा व्हीडिओ कॉल आला तो शेवटचाच..!"
बशीरच्या मेहुणीचं पूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं होतं.. बशीर यांचा संसारही उध्वस्त झाला होता. पण लोक बशीर यांना तुमचं तरी कुटुंब वाचलं यासाठी धीर देत होते. बशीरची मानसिक अवस्था त्यांच्या चेहर्यावरून कळत होती. रडत रडत बोलताना बशीर यांचा संताप अनावर झाला.
"मॅडम या बिल्डरना भर चौकात फाशी दिली पाहिजे. आम्ही 2017 ला पै-पै जोडून फ्लॅट घेतलाय. चार वर्षांत इमारत पडली आणि आमची माणसं गेली. त्यांना पण कळू दे घर संसार उद्ध्वस्त झाल्यावर काय होतं ते.!" बशीरच्या डोळ्यांतून पाणी आणि संताप एकत्र वाहत होता.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
आम्ही बशीर यांच्याशी बोलून 'त्या' इमारतीतल्या बचावलेल्या लोकांना जिथे ठेवलं होतं तिथे गेलो. तिथे फौजिया मुकादम नावाची एक महिला रडत रडत माळ जपत होती. "अल्ला मेरे बेटे को बचाना" म्हणत होती. फौजियाला दोन मुलं. एक 18 वर्षांचा आणि एक बारा वर्षाचा...
त्या सांगू लागल्या, "6.30 च्या सुमारास इमारत पडायला लागली, तेव्हा माझा मोठा मुलगा माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला 'अम्मी भागो बिल्डिंग गिर रही है, तेव्हा आम्ही पाचव्या मजल्यावरून पळायला लागलो. दोन्ही मुलं माझ्याबरोबर होती. आम्ही खाली आल्यावर अचानक जिन्याचा भाग कोसळला.
"माती उडाल्यामुळे काहीच दिसत नव्हतं आम्ही बाहेर पडत होतो. पण माझा मोठा मुलगा 'अम्मी आप कहॉं गयी' म्हणून पुन्हा आत शोधू लागला. मी ओरडत होते 'बाहेर चल' पण माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहचला नाही. मी आणि माझा लहान मुलगा आम्ही दोघं बाहेर आलो. पण मोठा मुलगा अडकला. त्याला आत घ्यायला जाण्यासाठी मागे बघितलं तर पूर्ण बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली होती. काहीच दिसत नव्हतं. तो आतच राहिला…" हे सांगताना फौजीयांना रडू आवरलं नाही.
"मेरे बेटे के लिये दुवा करो मॅडम" असं म्हणत फौजिया पुन्हा माळ जपू लागल्या. बशीर आणि फौजियासारखी अनेक कुटुंब या बिल्डींगच्या ढिगार्याखाली उद्ध्वस्त झाली होती.
आणि टाळ्या वाजू लागल्या...
रिमझिम पाऊस सुरू झाला होता. आम्ही फौजियांशी बोलून पुन्हा बचावाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी गेलो. पावसामुळे बचावकार्याचा वेग मंदावत होता.. तितक्यात एक अधिकारी म्हणाला, "आता कोणी जिवंत निघण्याची शक्यता नाही. सगळे मृतदेहच मिळतील." कलेक्टर निधी यांनी फक्त मान हलवली. आम्ही बातम्या करत होतो. मृतदेह निघत होते. हा आपला कोणी आहे का, हे पाहण्यासाठी नातेवाईक धावत पुढे येत होते. अॅम्ब्युलन्स मृतदेह घेऊन निघत होत्या.
अचानक एनडीआरएफची जवानांचा आवाज आला... "गणपती बाप्पा मोरया..! अल्ला हो अकबर" सगळे जवान टाळ्या वाजवू लागले. एक लहान मुलगा 18 तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत सापडला होता. चिंतेच्या वातावरणात लोकांच्या चेहर्यावर आशा दिसू लागली. लोक टाळ्या वाजवत होते. त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं.
दुर्देवाने त्या चिमुरड्याची आई वाचू शकली नाही. त्यामुळे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या चिमुरड्याची बातमी सगळ्या जगभर पसरली. पण त्या मुलाचं मातृछत्र त्या भुसभुशीत इमारतीने हिरावलं.
अंधार पडला होता. रेस्क्यू ऑपरेशन 20 तासांहून अधिक काळ सुरू होतं. काही वेळाने 60 वर्षांच्या एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर सर्व मृतदेह सापडले. रात्री 10 पर्यंत बचावकार्य सुरू होतं. 13 जणांचा मृत्यू झाला. 9 जण जखमी झाले. आपल्या माणसांना गमावून उध्वस्त झालेला संसार उभारण्याचा प्रश्न तिथल्या लोकांच्या चेहर्यावर ठळकपणे दिसू लागला होता.
इमारतीप्रमाणे तिथल्या राहिवशांच्या मनात आता प्रश्नांचा ढिगारा साठला होता. सगळा संसार उभं करायचं एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यात कोरोनाचं संकट आहेच.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)