You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर पालिकेतून बदली, सदस्य सचिवपदी नियुक्ती
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे.
त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूर महानगर पालिकेचा कार्यभार सांभाळतील. अपर सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढून ही माहिती दिली होती.
आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेच आपल्याला पाहिजेत अशा घोषणा काल नागपुरातील नागरिकांनी दिल्या होत्या. आज मुंढे यांनी फक्त थॅंक्यू म्हणणणं पुरेसं ठरणार नाही अशा शब्दांत ट्वीट करून नागपुरकरांचे आभार मानले आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
तुकाराम मुंढे यांच्यासाठी पद उन्नत करून त्यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकताच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती.
नागपूरमधील कारकीर्द
नागपूर महानगर पालिका आयुक्त असताना त्यांच्या कारकीर्दीची बरीच चर्चा झाली. त्यांचा महापौरांबरोबरही वाद झाला होता.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला होता. या वादात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतल्यामुळे या वादाची बरीच चर्चा झाली होती.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रं हाती घेतल्याचं तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
नागपूर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारनं फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती केली. तुकाराम मुंढेंनी कार्यभार हाती घेतल्यापासून अनेकदा त्यांचे आणि महापौर संदीप जोशी यांच्यामधील मतभेद समोर आले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं मुंढे शिस्तप्रिय अधिकारी आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी आहे.
कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक कडक पावले उचलली. जर नियमांचं पालन केलं नाही तर कडक कर्फ्यू लावावा लागेल असं त्यांनी सुनावलं होतं.
मुंढे यांची सुरुवातीची कारकीर्द
प्रशिक्षण झाल्यानंतर सहायक सोलापूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली नियमांवर बोट ठेवून काम करणं ही त्यांची खासियत आहे. ही ओळख त्यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच निर्माण केली आहे. कायदा काय म्हणतो त्याप्रमाणे यांचं काम सुरू असतं त्यामुळे सुरुवातीपासून सरकारने त्यांची बदली करायला, त्यांना योग्य पोस्टिंग न देण्याची सुरुवात केली.
2008 मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यावेळी शिक्षकांना त्यांनी खूप शिस्त लावली IAS मध्ये येण्याआधी ते स्वत: शिक्षक होते हा त्याचा परिणाम असावा.
अनेक शिक्षकांना निलंबित केलं. त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या शिक्षकांना शिस्त लागली, नागपूर जिल्हा परिषदेला ISO प्रमाणपत्र मिळालं. पण मुंढेवर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी तो फेटाळला. 26/11 च्या हल्ल्यानंतर विलासरावांनी राजीनामा दिला आणि काही दिवसातच मुंढेचीही बदली झाली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)