You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुकाराम मुंढे यांचं भाजपला काटशह देण्यासाठी नागपुरात पोस्टिंग?
नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याने नवी चर्चा सुरु झाली आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महानगर पालिकेत गेल्या पंधरावर्षांपासून भाजपची सत्ता आहे. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांचं महापालिकेच्या कामकाजाकडे थेट लक्ष असतं.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या गेल्या तेरा वर्षांच्या काळात तुकाराम मुंडे यांच्या १२ वेळा बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे शिस्तप्रिय आणि तडफदार असा लौकिक असलेल्या मुंडे यांना नागपूर महानगर पालिकेत आयुक्त म्हणून पाठविण्यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय हेतू आहे यावर चर्चा सुरु झाली आहे.
"महाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकेच्याआयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली, महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्राशसकीय शिस्त लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रशासकीय नेतृत्वाचा ठसा उमटवला. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरी केली. यापुढे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल आणि नागपूर शहराचा विकास जोमाने होण्यास होईल," अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
काँग्रेसला आनंद
तर तुकाराम मुंडे यांच्या सारखा तडफदार अधिकारी पालिकेत आयुक्त म्हणून आल्यामुळे महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांतील भाजपच्या आशीवार्दाने झालेले घोटाळे बाहेर येतील, असं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी म्हटलंय.
"आमचं सरकार असतांना २००३ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी टी. चंद्रशेखर यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून आणले होते तेव्हा नागपूर शहराचा संपूर्ण विकास झाला होता," असंही मुत्तेमवार म्हणाले.
आता कर्तव्यदक्ष तुकाराम मुंडे महापालिका आयुक्त म्हणून येत असल्यामुळे आनंद असल्याचं मुत्तेमवार म्हणाले.
मुळात गेली पंधरा वर्षं भाजपची सत्ता असतांना महापालिकेच्या कामातून नागपूर ही खऱ्या अर्थाने उपराजधानी झाली नाही अशी ओरड होती.
महापालिकेत सर्वकाही अलबेल?
नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाल्यावर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर महापालिकेला केंद्र सरकार आणि राज्य सरकराच्या योजनांतून मोठी रक्कम पायाभूत सुविधेसाठी मिळाली. यातून शहरभरात सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, इलेक्ट्रिक सिटी बसेसे मिळाल्या.
पण गेल्या वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेचे 2 प्रकल्प महामेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडे अंमलबजावणी साठी हस्तांतरित केल्याने महापालिकेत सर्व काही आलबेल आहे असे दिसत नसल्याची टीका विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही केली आहे.
त्यातच गेल्या वर्षात कर्मचाऱ्यांना पगार द्यायला महापालिकेने उशीर केला होता. शिवाय महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे विकास कामांचे बांधकाम करणारे कंत्राटदारही बिल मिळत नसल्याने संपावर गेले होते. महापालिकेचं मुख्य उत्पन्न जकात आणि एलबीटी हे जीएसटी नंतर बंद झाल्यामुळे राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याने हा त्रास झाला अशी सारवासारव महापालिकेन केली होती.
नागपूर महापालिकेची नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात 5 टक्के भागिदारी आहे. याचे ४३४ कोटी महापालिकेचा महामेट्रो रेल कार्पोरेशनला द्यायचे आहेत, पण महापालिकेजवळ निधी नसल्याने महापालिकेच्या जागा महामट्रोला देण्यात आल्या आहेत.
शिवाय मेट्रो धावणाऱ्या नागपुरात महापालिकेची बससेवा काही योग्य नाही, त्यामुळे पुण्यासारखं नागपुरातील महापालिकेची बससेवा तुकाराम मुंडे सुधारवणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
तुकाराम मुंढे यांची नागपूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी मागणी 27 मार्च 2017ला भाजप नागपूर शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीसांना भेटून लेखी निवेदन देण्यात आलं होतं. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच तुकाराम मुंडे यांना पाठविल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.
राज्यात विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेल्या मुंढे यांची कार्यपद्धती चर्चेत असते. अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून राजकारण्यांबरोबर त्यांचा संघर्ष झाला आहे. नाशिक तसंच नवी मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय राजकारणी मुंढे यांच्याविरोधात एकवटले होते.
राजकारण्यांना नकोसे होणाऱ्या मुंढेंच्या समर्थनार्थ सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलनंही केली आहेत. त्यांनी नवी मुंबईत सुरू केलेल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला सामान्य नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
'मुंढेंनी भान ठेवावे'
"आदर्शाच्या संकल्पना सर्वसामान्यांना नेहमीच भूरळ घालत आल्या आहेत. सामान्यांच्या मनात घट्ट रुतून बसलेली ही सुपरमॅन साच्यातील इमेज अधिक बळकट कशी होईल याची पद्धतशीर काळजी घेणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. प्रशासकीय बदलाच्या नावाखाली त्यांच्या जेवड्या बदल्या झाल्या तेवढी लोकचर्चा त्यांच्या वाट्याला आली. त्यांची शिस्त, कर्तव्यकठोरता आणि बेदरकारपणा या वैशिष्ट्यांची सतत चर्चा होत आली आहे. राजकीय नेत्यांना त्यांच्या कार्यशैलीत सवंगता दिसते. सामान्यांना त्यांची सचोटी भावते," असं मत महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी व्यक्त केलं.
"तुकाराम मुंडे यांचा नागपूर जिल्हापरिषदेचा कार्यकाळ यापूर्वी गाजला होता. नागपूर महापालिकेतील सर्वच घटकांना कार्यालयीन संकेतांमधील कर्मठता या निमित्ताने कळावी अशी आशा आहे. आपण व्यवस्थेतील घटक आहोत, सुपरमॅन नाही याचे भान मुंढे यांनीही ठेवायला हवे. राजकीय नेते व्यवस्थेचा भाग असतात. त्यांचा दुस्वास न करता सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुंडे यांनी केला तर उपराजधानीतील त्यांची कारकिर्द नक्कीच यशस्वी ठरेल," असं अपराजित पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)