नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव कशामुळे झाला?

    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून

राज्यातील 6 जिल्हा परिषदांपैकी 5 जिल्हा परिषदा भाजपने गमावल्या, पण यांतील सर्वाधिक चर्चा आहे ती नागपूर जिल्हा परिषदेची.

केंद्रातील मोदी सरकारमधील हेवी वेट मंत्री नितिन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मूळ जिल्ह्यांमध्येच हा पराभव झाल्यानं हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

यातच नितिन गडकरी यांचे नागपूर जिल्ह्यातील मूळ गाव धापेवाडा येथे दहा वर्षानंतर काँग्रेसला यश मिळाले, तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना दत्तक घेतलेले चिंचोली सर्कल मधील फेटरी आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव काँग्रेसनं केला आहे.

आता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर जिल्हयात काँग्रेसच पुन्हा मुसंडी मागण्याचे मुख्य कारण म्हणजे पाच वर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास.

जिल्हा परिषद एकूण जागा- 58

काँग्रेस- 30

राष्ट्रवादी - 10

भाजप -15

शिवसेना -01

अपक्ष- 01

शेकाप- 01

यासंदर्भात जेष्ठ पत्रकार आणि 'द हितवाद'चे शहर संपादक राहुल पांडे यांनी सत्तांतर हे प्रमुख कारण भाजपच्या पराभवामागे असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

"गेली साडे सात वर्षं जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. या ना त्या कारणाने निवडणूका घेतल्या जात नव्हत्या आणि सत्तातरानंतर या निवडणूका झाल्याने हे चित्र पाहायला मिळाले," पांडे यांनी सांगितलं.

'महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर बदलली समीकरणं'

राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नितिन राऊत यांना ऊर्जा, सुनील केदार यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध तसेच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली.

तिन्ही मंत्र्यांनी आपापली सर्व शक्ती जिल्हा परिषद निवडणूकीत लावली होती. यात सहकार क्षेत्रातून राजकारणात आलेले सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी बाजी मारली. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यात भाजपला साधे खातेही जिल्हा परिषद निवडणुकीत उघडतां आले नाही.

कळमेश्वर तालुक्यांतील तीन आणि सावनेर तालुक्यांतील सहाही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. केदार यांचा मतदार संघातील संपर्क कुणबी समाजाचा पाठिंबा हेही फॅक्टर यात कामी पडल्याच दिसतंय.

तर ऊर्जा मंत्री नितिन राऊत, काँग्रेस नेते किशोर गजभिये आणि राष्ट्रावादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी दलित मतदारांना काँग्रेस राष्ट्रवादी कडे आकर्षित करण्यात मोलाची कामगिरी पार पाडली. शिवाय अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे जिल्हा परिषद निवडणूकीसाठी नागपुरातच तळ ठोकून असल्याने काँग्रेस मधील सर्व गटतट एकत्र येऊन काम करत असल्याचं दिसले.

दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सुनील केदार यांच्यासोबत फार सौख्य नसलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख, त्यांचा मुलगा आशिष देशमुख, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग यांनी आपापले गट तट सोडून एकत्र प्रचार केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला हे यश मिळालं.

दरम्यान राज्यातील सहाही जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार करणारे आणि नागपूर जिल्ह्यातील जागांसाठी विशेष प्रयत्न करणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या जागा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दुपटीने वाढल्याच सांगितलं आहे. पण हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तर काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकार वर जिल्हा परिषदेतील सरकारनं जो जनतेवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला त्याची परिणीती पराभवात झाल्याचं सांगितलं. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी असे प्रश्न भाजपनं कधी घेतले नाही, त्यामुळे हा पराभव असल्याच देशमुख म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत प्रचाराची व्यस्ततेमुळे मंत्री पदाचा पदभारही स्वीकारला नव्हता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी देशमुख यांनी जिल्हा विशेषता काटोल तालुका पिंजून काढला.

भाजपच्या पराभवाची कारणे

"नागपूर जिल्हा परिषेदेच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नागपूरात तळ ठोकून होते. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नागपूरकडे विशेष लक्ष दिलं. पण राज्यातील सत्तांतरामुळे भाजपच्या कार्यकर्त्यामधील उत्साह कमी झाला होता, असंच चित्र दिसत होतं. त्यातच विधानसभेत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट पक्षानं कापले होते त्याचाही राग भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये होता त्याचाही फटका भाजपला बसला. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे या निवडणुकांमध्ये लढले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र याचाही परिणाम निकालावर झाला असल्याचं दिसतंय. पण शिवसेनेला एकाच जागी यश आले. त्यातच शिवाय गेली अडीच वर्षे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेतल्या जात नव्हत्या, राज्यात तेव्हा सत्तेत असलेल्या भाजप कडून वारंवार जिल्हा परिषद निवडणूका घेतल्या जात नाही असा प्रचार करण्यात आला. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा निता सावरकर यांची निष्क्रिय कारकीर्दच पराभवासाठी जवाबदार आहे," अशी टीका मनसेच्या हेमंत गडकरी यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा निशा सावरकर यांची वाढीव पण पूर्णपणे निष्क्रिय राहिलेली कारकीर्द हीच जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या परिवर्तनाला जवाबदार आहे, त्यांच्यासारख्या निष्क्रिय व काहीही अभ्यास नसलेल्या भगिनीला भाजपनं एवढे दिवस नागपूर ग्रामीणच्या जनतेवर कसे काय लादले याचे आश्चर्य वाटते.

निव्वळ भाजपच्या अतिआत्मविश्वास यामुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी काहीही न केलेले लोक जिल्हा परिषदेच्या सत्तेवर येत आहे , आता तरी ग्रामीण या महत्वपूर्ण भागातील जनतेकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी विशेषतः रुग्णसेवेच्या बाबतीत व इतर महत्वपूर्ण सुविधा काँग्रेस व नव्या सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे चांगली कामे करावीत, नाहीतर जनतेनं या निवडणुकीत फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्यांना जसे पायउतार केले तसा धक्का या निष्क्रिय सत्ताधाऱ्यामुळे ज्यांना पर्याय म्हणून सत्ता मिळाली असं मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी म्हटलं.

या निकालातून भाजपची वाट ही आगामी काळात ग्रामीण भागात बिकट असल्याचं दिसतंय अस मत जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "नागपूरमधील जनतेचा तसंच ज्या 6 ठिकाणी निवडणूका झाल्यात त्या ठिकाणचे लोक हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातल राग व्यक्त केल्याचं सांगितलं. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर जाणवत आहे. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापणे, त्यांना साईडलाईन करने हेही भाजपला महागात पडलं आहे."

टीका

सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावत म्हटलंय की, "भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भाजपचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भाजपाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली, त्याची दखल महाराष्ट्र घेईल," असं त्यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)