You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिल्हा परिषद निकाल: नागपूर, अकोला, धुळे, वाशीम, नंदुरबार, पालघरमध्ये भाजप, काँग्रेस आणि भारिपची कामगिरी
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नागपुरात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे.
तर धुळ्यात भाजपने सत्ता मिळवली तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.
एक नजर निकालांवर
नागपूरचा भाजप गड ध्वस्त
नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 58 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 30 जागा पटकावत धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 तर शिवसेनेने एका जागेवर विजय मिळवला. भाजपला 15 जागांवर समाधान मानावे लागले.
पाच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकांवेळी अटीतटीची झुंज पाहायला मिळाली होती. भाजपने 22 तर काँग्रेसने 19 जागा जिंकल्या आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला यंदा पराभवाला सामोरं जावं लागलं.
विधानसभा निवडणुकांपासून नव्याने कामाला लागलेल्या काँग्रेसने 30 जागांवर सरशी साधत भाजपला चीतपट केलं.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या काही वर्षांपासून उदयास आलेल्या नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे.
गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव गावातही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसाठी आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हे मेटपांजरा गटातून विजयी झाले आहे. सलील देशमुख पहिल्यांदा निवडणूक लढवत होते.
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दररोज पाच ते सहा अशा तीन ते चार दिवस प्रचार सभा घेतल्या.
तर भाजपची भिस्त माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होती तर काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मुकुल वासनिक नागपूर जिल्हयात तळ ठोकून होते.
त्यासोबतच सावनेरचे आमदार सुनील केदार, किशोर गजभिये, राजेंद्र मुळक, नाना गावंडे आणि ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली.
वाशीममध्ये बहुमत नाही, इथेही महाविकास आघाडी होणार?
वाशिममध्ये 52 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त 7 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा, काँग्रेसने 9 तर शिवसेनेने 7 जागा जिंकल्या. अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी 19 जागा जिंकल्या.
त्यामुळे इथे राज्याप्रमाणे महाविकास आघाडी होणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धुळ्यात भाजपचं वर्चस्व
धुळ्यात 56 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 36 जागा जिंकत वर्चस्व गाजवलं. याठिकाणी काँग्रेसला 7, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर समाधान मानावं लागलं.
अकोल्यात भारिप अव्वल मात्र बहुमत नाही
अकोला जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही. 53 जागांपैकी 23 जागा भारिप अर्थात भारतीय बहुजन महासंघाने जिंकल्या. भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
शिवसेनेने 11 जागा जिंकत दुसरा क्रमांक राखला. भाजपने 7, काँग्रेसने 5, अपक्षांनी 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर समाधान मानावं लागलं.
पालघरमध्ये सेनेची सरशी
पालघरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं. 57 पैकी सेनेने 18 जागांवर सरशी साधली. राष्ट्रवादी काँग्रेसने 14 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 6 तर बहुजन विकास आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला.
नंदुरबारमध्ये त्रिशंकू
नंदुरबारमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना प्रत्येकी 23 जागा मिळाल्या. शिवसेनेने 7 तर राष्ट्रवादीला 3 जागांवर समाधान मानावे लागले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)