अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रोतून उचलबांगडी, नागपूर महानगर पालिकेची धुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सध्या या ठिकाणी अभिजीत बांगर हे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडून त्वरित पदभार स्वीकारावा असा आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला आहे.

तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहत आहेत.

याआधी तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगर पालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. पुण्याची सिटी बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ते काही काळ संचालकही होते.

गेल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 12 वेळा बदली झाल्याचे इंडिया टुडेनी आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीमुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांची तूर्तास अन्यत्र नियुक्त करण्यात आलेली नाही.

मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून राजीव निवतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. भाजपची सत्ता असताना भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारणीला नागरिकांनी विरोध केला होता. पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला होता. शिवसेना सत्तेत येताच भिडे यांना या पदावरून बाजूला करण्यात आलं आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी के.बी.उमप यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी.टी.वाघमारे यांची महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी पराग जैन असणार आहेत.

एस.एन. गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सौरभ राव यांची साखर आयुक्तपदावर बदली झाली आहे. एस.डुंभरे यांची मेडाच्या महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे.

ओमप्रकाश देशमुख हे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक असणार आहेत तर प्राजक्ता वर्मा मराठी भाषा विभागाच्या सचिव असणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)