You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाड दुर्घटना : 'मेरे बच्चे के लिए दुआ करो...' हरवलेल्या मुलासाठी आईचं आर्जव
"मला वाटलं होतं, माझा मुलगाही माझ्यासोबत पळत आलाय. पण पाहिलं तर तो नव्हता. धुळीमुळे काहीच दिसत नव्हतं. मला माहीत नाही आता मुलगा कुठे आहे. मेरे बच्चे के लिए दुआ करो..." फौजिया मुकादम सांगत होत्या.
बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यासमोर कोसळलेल्या घराची वेदना आणि मुलगा कुठे, कसा असेल याची काळजी फौजिया यांच्या कापणाऱ्या आवाजातून व्यक्त होत होती.
सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी रायगडच्या महाड तालुक्यात हापूस तलावाजवळ असलेली तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली.
फौजिया याच इमारतीत गेल्या पाच वर्षांपासून राहत होत्या.
नेमकं काय घडलं याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना फौजिया यांनी सांगितलं, "आम्ही ए विंगमध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो. सहा वाजून पंचवीस मिनिटांनी बिल्डिंग हालायला लागली. आम्ही वरून पाहिलं आणि काय होतंय हे लक्षात आल्यावर पळायला लागलो.
जसं आम्ही बाहेर आलो, तसा मोठा आवाज झाला. पाहिलं, तर बिल्डिंग कोसळली. आम्ही गेटमधून पळत आलो."
फौजिया यांना दोन मुलं आहेत. थोरला मुलगा बारावीत आहे, तर धाकटा आठवीत. लॉकडाऊनमुळे दोन्ही मुलं घरीच होती.
"मला वाटलं माझा मुलगाही माझ्यासोबत आहे. पण तो नव्हता. सगळी धूळ उडाली होती, काहीच दिसत नव्हतं. आम्ही जिन्यावरून उतरत होतो...माझा थोरला मुलगा मागेच होता आणि धाकटा मुलगा माझ्यासोबत होता," फौजिया सांगत होत्या.
17 जण अजूनही बेपत्ता
NDRF ची पथकं बचावकार्य करत आहेत. पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र, अशाही स्थितीत बचावकार्य वेगानं सुरू ठेवण्यासाठी यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न झाले.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, या इमारतीत 41 फ्लॅट आहेत. त्यातील रहिवाशांची आम्ही यादी तयार केली आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. त्यानंतर 17 जण अजूनही बेपत्ता असल्याचं आमच्या लक्षात आलं. NDRF चे प्रयत्न सुरू आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)