You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामदास आठवले : दलितांची राजकीय शक्ती खरंच क्षीण होत चालली आहे?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'रिपब्लिकन पक्षाला आता भवितव्य नाही,' असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं आणि ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच रिपब्लिकन पक्षाला भवितव्य आहे की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
आठवले यांनी काय म्हटले?
"बदललेल्या राजकीय परिस्थितीत रिपब्लिकन ऐक्य हा विषयही मागे पडला आहे. आता कार्यकर्तेही इतर पक्षांमध्ये जाऊ लागले आहेत, त्यामुळे यापुढे एकाकी लढण्यापेक्षा मोठ्या पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागेल," असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले. "प्रदीर्घ काळ सत्तेचे राजकारण करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वाढवता आला नाही, गटबाजीने ग्रासलेल्या पक्षाला आता भवितव्य उरलेले नाही," असे ते म्हणाले.
लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मधु कांबळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीबद्दल विचारले असता मधु कांबळे यांनी बीबीसीला सांगितलं की "रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. त्यांचं हे विधान सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि गटबाजीबाबतचं आहे. त्या परिस्थितीचं निरपेक्षपणे मूल्यमापन त्यांनी केलं आहे."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
"रामदास आठवले हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत आणि अजूनही त्यांचा जनसंपर्क आहे. राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू अशा राज्यातही रिपब्लिकनच्या शाखा आहेत. या राज्यातील कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रेझेन्स आहे ही बाब दुर्लक्षून चालणार नाही," असं कांबळे सांगतात.
रामदास आठवले यांची भवितव्यातली दिशा काय असू शकते असं विचारल्यावर कांबळे सांगतात, "सध्या तरी ते भाजपसोबत आहेत आणि त्यांच्यासोबतच ते पुढील काळात दिसतील. पण राजकारणात फार पुढचं सांगता येऊ शकत नाही."
रिपब्लिकन पक्षाची सध्याची स्थिती कशी आहे?
रिपब्लिकन पक्षाची भारतीय जनता पक्षासोबत युती आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार विधिमंडळात नाहीये. रिपाइंचे एकमेव खासदार आहेत रामदास आठवले आणि ते राज्यसभेवर आहेत. या व्यतिरिक्त विधिमंडळातील दोन्ही सभागृहात त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य नाही.
रिपब्लिकन पार्टीचे सध्या प्रमुख चार गट आहेत. एक आहे आठवले गट, दुसरा जोगेंद्र कवाडे यांचा गट. कवाडे हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख आहेत. तिसरा आहे गवई गट, याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र गवई आणि चौथा गट आहे तो प्रकाश आंबेडकर यांचा. त्यांच्या पक्षाचं नाव भारिप बहुजन महासंघ आहे.
पण 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची मोट बांधून निवडणूक लढवली होती. त्याला वंचित बहुजन आघाडी असं नाव त्यांनी दिलं होतं.
डॉ. आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. त्यातूनच पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उदयास आली.
दादासाहेब गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. दादासाहेब 1957 ते 1962 या काळात लोकसभेचे नाशिक येथून खासदार होते. काही काळ ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. पुढे बी. सी. कांबळे, बी. डी. खोब्रागडे, रा. सु. गवई यांनी या पक्षाचे नेतृत्व केले.
70 च्या दशकात दलित राजा ढाले यांनी दलित पॅंथरची स्थापना केली. नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्य हाती घेतले. दलित पॅंथरमधील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आले. त्यापैकी एक रामदास आठवले.
'सुरुवातीपासूनच कुणाच्या तरी सोबत'
रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाबाबत असे वक्तव्य का केले असावे असे विचारले असता ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात की "सुरुवातीपासूनच रिपब्लिकन ऑफ इंडिया हा पक्ष कुणाचा तरी सहयोगी पक्ष म्हणून लढला आहे. दादासाहेब गायकवाड आणि यशवंतराव चव्हाण यांचे घनिष्ट संबंध होते. तेव्हा रिपाइं हा काँग्रेसचा सहयोगी पक्ष होता."
आसबे सांगतात, "दादासाहेब गायकवाड यांच्यावेळी एखादा मुद्दा घेऊन राजकारण होत असे. जसे दलितांसाठी हक्काच्या जमिनीसाठी लढा देणे, कसत असलेल्या शेत जमिनीची मालकी मिळणे अशा मुद्द्यांवर गायकवाड आंदोलन करत असत. त्यांच्यानंतर काही वर्षांनी फक्त अस्मितेचं राजकारणच होताना दिसू लागले.
"आठवले, गवई, खोब्रागडे असे रिपब्लिकनमध्ये गट पडले. त्यांनी कुणाशी ना कुणाशी हातमिळवणी केली. रामदास आठवले हे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरही होते. ते लोकसभेवर पण निवडून गेले नंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली आणि शिवशक्ती-भीमशक्ती असा प्रयोग करत ते शिवसेनेबरोबर गेले," असं आसबे सांगतात.
"खरं तर रामदास आठवले यांनी तेच सांगितलं आहे जे गेल्या तीस वर्षांपासून दिसत आहे," असं आसबे सांगतात.
रिपब्लिकन पक्षाला भवितव्य आहे का?
रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटते असा प्रश्न आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विचारवंत ज. वि. पवार यांना विचारला असता ते म्हणाले "रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाचं भवितव्य हे उज्ज्वलच आहे. पण जर कुणाला स्वतःच्या डोळ्यासमोर काळोख दिसत असेल तर त्या व्यक्तीला भवितव्य नसू शकतं."
"डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे तरुणांना आकर्षण आहे आणि त्यामुळे नेहमीच हे तरुण या प्रवाहात येतील. पोटार्थी नेत्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता असू शकते म्हणून बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पक्षाच्या भवितव्याची चिंता त्यांनी करू नये," असं पवार यांनी म्हटलं.
रामदास आठवलेंनी फक्त त्यांच्या गटापुरतेच बोलावे - कवाडे
रामदास आठवले यांच्या विधानाशी आंबेडकरी चळवळीतील नेते सहमत नाहीयेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे सांगतात की रामदास आठवले यांनी त्यांच्या गटापुरतेच बोलावे. "महाराष्ट्रातील जनता ही फुले-शाहू-आंबेडकर-शिवरायांच्या विचारधारेला मानणारी आहे. आज ना उद्या ते लोक याच विचारांची कास धरतील.
पुढे ते म्हणतात, "राजकारणात पडझड होतच असते. पण त्याचा अर्थ असा नाही की रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही. हे लोक एकत्र येऊन सांप्रदायिक शक्तींचा मुकाबला करताना आपल्याला नजीकच्या भविष्यात दिसतीलच. आंबेडकरी विचारांमध्ये ती ताकद आहे. त्यामुळे कृपा करून त्यांनी त्यांच्याच गटापुरते बोलावे."
कवाडे आंबेडकरी चळवळीबद्दल सांगतात, "आंबेडकरी चळवळीसमोर अनेक आव्हानं आली आहेत. त्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत आजवरचा प्रवास झाला आहे आणि पुढे देखील होईलच."
रामदास आठवले यांचे काय म्हणणे आहे?
रामदास आठवले यांना संपर्क साधण्याचा बीबीसी मराठीने अनेकवेळा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची बाजू याच बातमीत देण्यात येईल.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवक्ते अविनाश महातेकर यांना रामदास आठवले यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की "या वक्तव्याचा खुलासा रामदास आठवले यांनी केल्यावरच आपल्याला याबाबत बोलता येईल. तो पर्यंत काहीही भाष्य करणे उचित ठरणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)