IPL 2020: मुंबई, चेन्नई बाजी मारणार का दिल्ली, पंजाब, बेंगळुरू ट्रॉफीवर नाव कोरणार?

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामाचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. एकेक करून सगळ्या टीम्स युएईत दाखल होऊ लागल्या आहेत. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला.

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदाचा आयपीएल हंगाम भारतात आयोजित करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला आयपीएलच्या आयोजनासाठी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांची नावं चर्चेत होती. मात्र टेलिव्हिजन प्रसारणाच्या दृष्टीने न्यूझीलंड किंवा वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस आयोजित करणं सोयीचं नसल्याने ही नावं मागे पडली.

सख्खे शेजारी श्रीलंकेचा पर्यायही समोर आला होता. मात्र कोरोनाचा मर्यादित संसर्ग, बायोबबलची व्यवस्था, सगळया टीम्सची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी हॉटेल्स, एकमेकांच्या टप्प्यात असणारी हॉटेल्स, जाण्यायेण्याची व्यवस्था यामुळे युएईला प्राधान्य देण्यात आलं.

19 सप्टेंबरला 13व्या हंगामातील पहिली मॅच खेळवण्यात येईल तर 10 नोव्हेंबरला अंतिम लढत खेळवण्यात येईल.

सार्वत्रिक निवडणुकांमुळे 2009 मध्ये आयपीएलचा अख्खा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. 2014मध्येही सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा अर्धा हंगाम युएईतच आयोजित करण्यात आला होता.

युएईतली शारजा, अबूधाबी आणि दुबई इथे मॅचेस खेळवल्या जातील. स्पर्धेत आठ संघ असतील. लिलावानंतर प्रत्येक संघाची संरचना बदलली आहे.

चेन्नई सुपर किंग्स (2010, 2011, 2018)

टीम इंडियाचा कॅप्टन कुल माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वातंत्र्यदिनी अनपेक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ट्वेन्टी-20 वर्ल्डकप, 50ओव्हर वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान, आयपीएलची जेतेपदं या सगळ्यात धोनीचं नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरलं.

वनडे क्रिकेटमधील सार्वकालीन फिनिशर्समध्ये धोनीचं नाव घेतलं जातं. चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी यांचं अतिशय घट्ट नातं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेल्या धोनीचं संपूर्ण लक्ष्य चेन्नईला जेतेपद मिळवून देण्याकडे असेल.

धोनीच्या बरोबरीने शैलीदार फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अव्वल तिघांमध्ये रैनाचं नाव आहे. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण चांगल्या खेळासाठी रैना प्रसिद्ध आहे.

टीम इंडियात पुनरागमनाचं उद्दिष्ट नसल्यामुळे रैना आता सगळी ऊर्जा चेन्नई सुपर किंग्ससाठी व्यतीत करू शकतो. चेन्नईच्या टीमचं सरासरी वय 32 आहे. त्यामुळे या टीमला डॅडी आर्मी म्हटलं जातं.

ट्वेन्टी-20 सारख्या वेगवान प्रकारात पस्तिशीकडे झुकलेले खेळाडू टिकू शकतील का असा प्रश्न विचारला जात होता. डॅडी आर्मीने आपल्या दमदार कामगिरीतून याचं उत्तर दिलं आहे. ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर हे चेन्नईचे विश्वासू शिलेदार आहेत.

यंदाच्या लिलावात चेन्नईने अष्टपैलू सॅम करन, फास्ट बॉलर जोश हेझलवूड, स्पिनर पीयुष चावला यांना ताफ्यात समाविष्ट केलं आहे. युएईत फिरकीला पोषक खेळपट्यांवर चेन्नईचं फिरकीबहुल आक्रमण निर्णायक ठरू शकतं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

U19 विश्वचषक विजयी संघाचा कर्णधार ते जगातली सर्वोत्कृष्ट बॅट्समन असा विराट कोहलीचा प्रवास झाला आहे. या 12 वर्षात विराट बेंगळुरू संघासाठीच खेळला आहे.

मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली असूनही विराटला एकदाही संघाला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. विराट आणि एबी डीव्हिलियर्स हे बेंगळुरूचे आधारस्तंभ आहेत. कोरोना ब्रेकमुळे दोघेही ताजेतवाने आहेत पण जेतेपदासाठी बेंगळुरूला संघ म्हणून एकत्रित चांगली कामगिरी करावी लागेल.

बेंगळुरूने यंदा आरोन फिंच, केन रिचर्डसन, ख्रिस मॉरिस यांना संघात घेतलं आहे. उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या भारतीय त्रिकुटाकडे लक्ष असेल. युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी युएईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. संघ म्हणून एकत्रित चांगली कामगिरी करण्यात बेंगळुरूला सातत्याने अपयश आलं आहे. विराट आणि एबीच्या बरोबरीने बाकीच्यांना कामगिरी करावी लागेल.

किंग्ज इलेव्हन पंजाब

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलवर यंदा कॅप्टन,कीपर, ओपनर अशी तिहेरी जबाबदारी आहे. तो तिहेरी भूमिकेला कसा न्याय देतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेल पंजाबकडे आहेत. अवघ्या काही ओव्हर्समध्ये ते मॅचची दिशा पालटवू शकतात. सगळे हंगाम खेळणाऱ्या पंजाबने यंदा जेमी नीशाम, शेल्डॉन कॉट्रेल, ख्रिस जॉर्डन यांना समाविष्ट केलं आहे.

मोहम्मद शमी पंजाबसाठी ट्रंप कार्ड आहे. मयांक अगरवाल, सर्फराझ खान ही जोडगोळी कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पंजाबसाठी निर्णायक ठरू शकतो कारण युएईत खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे.

U19 वर्ल्डकपमध्ये छाप उमटवणारा रवी बिश्नोईसह अनुभवी जगदीश सुचिथ, मुरुगन अश्विन असे स्पिनर्स त्यांच्याकडे आहेत. अनिल कुंबळे यांच्यासारखे अनुभवी माजी कर्णधार पंजाबला कोच म्हणून लाभले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स

गेल्या हंगामात बदललेल्या नावासह खेळणाऱ्या दिल्लीने बाद फेरी गाठली होती. तोच फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दिल्ली संघाच्या व्यवस्थापनासमोर अंतिम अकरात कोणाला खेळवायचं असा प्रश्न आहे.

शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत असे एकापेक्षा एक भारतीय खेळाडू त्यांच्याकडे आहेत. यांच्याबरोबरीने जेसन रॉय, शिमरोन हेटमेयर हेही आहेत.

बॉलिंगमध्ये कागिसो रबाडाचं स्थान पक्कं आहे. रवीचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा एकत्र खेळताना दिसू शकतात. त्यांच्याबरोबरीने अक्षर पटेल आणि संदीप लमाचीनेही आहेत. इशांत शर्मा, मोहित शर्मा, अवेश खान, हर्षल पटेल या भारतीय फास्ट बॉलर्सवर भिस्त असेल.

कोलकाता नाईट रायडर्स (2012, 2014)

यंदाच्या लिलावात सर्वाधिक बोली मिळालेला वेगवान पॅट कमि्स कोलकाताकडे आहे. अभिनेता शाहरुख खान सहमालक असणाऱ्या या संघाकडे जेतेपद पटकावण्याची पूर्ण क्षमता आहे. सुनील नरिन आणि आंद्रे रसेल हे कॅरेबियन स्टार कोलकातासाठी हुकमी आहेत.

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताकडे यंदा आयोन मॉर्गन आणि टॉम बँटन हेही आहेत. कुलदीप यादव, कमलेश नागरकोट्टी, शिवम मावी, प्रसिध कृष्णा या युवा वेगवान बॉलर्सकडे लक्ष असेल. शुभमन गिलकडून कोलकाताला खूप अपेक्षा आहेत. भन्नाट वेगाने बॉलिंग करणारा लॉकी फर्ग्युसन कोलकाताचं अस्त्र होऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबाद (2016)

स्पर्धेतील सगळ्यात संतुलित संघांपैकी एक. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यमसन ही दमदार बॅट्समनचं त्रिकुट हैदराबादकडे आहे. वॉर्नर-बेअरस्टो या सलामीच्या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणलं होतं. फॅब्युलस फोरमध्ये गणना होणारा केन विल्यमसन आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहे. सनरायझर्सचं नेतृत्व वॉर्नर करणार का विल्यमसन हे पाहणं रंजक ठरेल.

मोहम्मद नबी आणि रशीद यांना युएईत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. बॅट आणि बॉलसह चमक दाखवण्यासाठी दोघेही आतूर आहेत.

भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल यांनी सातत्याने हैदराबादची बॉलिंग आघाडी व्यवस्थितपणे सांभाळली आहे. विजय शंकरला चांगली कामगिरी करत टीम इंडियाच्या निवडसमितीला प्रभावित करण्याची संधी आहे. मनीष पांडेकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

मुंबई इंडियन्स (2013, 2015, 2017, 2019)

स्पर्धेतील बहुचर्चित आणि लोकप्रिय संघ. रोहित शर्मा दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी आतूर आहे. गेले काही वर्षात रोहितचा टीम इंडियासाठी आणि आयपीएलमध्ये खेळतानाही भन्नाट फॉर्मात आहे. तोच फॉर्म कायम राखत जेतेपद पटकावण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.

काही दिवसांपूर्वी बाप झालेल्या हार्दिक पंड्याचे फिटनेसचे व्हीडिओ चर्चेत असतात. हार्दिक आणि कृणाल पंड्या ही भावांची जोडगोळी मुंबईसाठी कळीची आहे.

कायरन पोलार्ड हा मुंबईचा आधारस्तंभ आहे. वडिलांच्या आजारपणामुळे लसिथ मलिंगा काही सामने खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराह, मिचेल मक्लेघान, ट्रेंट बोल्ट,नॅथन कोल्टिअर नील असं तगडं आक्रमण मुंबईकडे आहे. फिरकीपटू राहुल चहरने गेल्या वर्षी सगळ्यांना प्रभावित केलं होतं. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना यंदा मोठ्या खेळी कराव्या लागतील.

राजस्थान रॉयल्स (2008)

प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध संघ. प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या छोट्या खेळाडूंना घेऊन पुढे जाण्याचं राजस्थानचं धोरण असतं. स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर अशी त्रिसुत्री राजस्थानकडे आहे. हे तिघेही मॅचविनर आहे. रायन पराग यंदाही चांगलं खेळण्यासाठी आतूर आहे. जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकत ही दमदार जोडगोळी राजस्थानकडे आहे.

श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, मयांक मार्कंडेय, राहुल टेवाटिया अशी फिरकी चौकडी आहे. रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन यांच्याकडून राजस्थानला मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. अँड्यू टाय, टॉम करन, डेव्हिड मिलर हे तिघेही ट्वेन्टी-20 विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)