कैलास गोरंट्याल : उद्धव ठाकरे सरकारवर नाराज असलेले काँग्रेसचे आमदार कोण आहेत?

फोटो स्रोत, FACEBOOK
महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने केली जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे तब्बल 11 आमदार ठाकरे सरकारवर नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय.
नगर विकास खात्याकडून जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
नगर विकास खात्याच्या निधीवाटपावरुन आपल्या एकट्याच्या नव्हे तर 11 काँग्रेस आमदारांच्या तक्रारी असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.


या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही तर 11 आमदार उपोषणाला बसतील असा इशारा सुद्धा गोरंट्याल यांनी दिला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत.
गोरंट्याल यांचा आरोप नेमका काय आहे?
मार्चमध्ये जालन्यातील चार नगरपालिकांसाठी नगर विकास खात्याकडून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात आला. पण काही दिवसांतच हा निधी रद्द करण्यात आला.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

जालन्यात चार पैकी तीन नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
"ज्या नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, जिथे काँग्रेसचे आमदार आहेत, तिथेच त्यांना निधी देण्यापासून डावललं जात आहे," असा थेट आरोप कैलास गोरंट्याल यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, "नगर विकास खात्याकडे वारंवार निधीसाठी मागणी करूनही निधी दिला जात नाही. मी आमदार असून मला 1 रुपयाही निधी दिला गेला नाही."
"निवडणुकीत ज्यांना पराभूत केले, त्या विरोधकांना निधी मिळतोय, " नाव न घेता गोरंट्याल यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा पराभव केला होता.
याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे आमदारांनी तक्रार केली असल्याची माहिती गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याविषयीची सर्व कल्पना असल्याचं गोरंट्याल सांगतात.
कोण आहेत कैलास गोरंट्याल ?
कैलास गोरंट्याल हे जालना जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आहेत.
2019 विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे गोरंट्याल आणि शिवसेनेचे खोतकर यांच्यात कायम अटीतटीची लढत पहायला मिळते.
2014 मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना उमेदवारी अर्ज उशिरा दाखल केल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर खोतकरांची आमदारकी रद्द झाली होती.

फोटो स्रोत, Facebook
गोरंट्याल हे जालना जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव मोठे नेते आहेत. जालन्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जायचे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोरंट्याल हे आपल्या पक्षावरही नाराज होते. आमदारकीची तिसरी टर्म असूनही मंत्रिपद न मिळाल्याने अपेक्षाभंग झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं, तसंच राजीनामा देण्याचा इशाराही त्यावेळी त्यांनी दिला होता.
लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक चक्रधर दळवी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "जालना जिल्ह्यात विकास कामांसाठी निधी रखडला आहे ही बाब खरी आहे. यासाठी केवळ गोरंट्याल हे एकमेव नाराज आमदार नाहीत, तर राज्यातल्या विविध भागांमध्ये नगर विकास खात्याकडून निधी रखडला आहे. याची वेगवेगळी कारणं असू शकतात."
गोरंट्याल यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं, "गोरंट्याल हे कट्टर काँग्रेसी नेता आहेत. त्यांच्या घरात पूर्वीपासूनच सर्वजण काँग्रेस समर्थक राहिलेले आहेत."
गोरंट्याल कुटुंब हे विडी उत्पादक आणि हॉटेल व्यवसायिक म्हणूनही ओळखले जातात.
गोरंट्याल नाराज काँग्रेस आमदारांचे नेतृत्त्व करत आहेत का ?
महाविकास आघाडीत काँग्रेसकडून विविध मुद्यांवर यापूर्वीही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पण आता गोरंट्याल यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने आणि आपल्यासोबत 11 आमदार नाराज असल्याचं सांगितल्याने त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इतर पक्षातील आमदारांना निधी मिळतो मग काँग्रेसच्या आमदारांना का नाही? अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. नाराज असलेले इतर 11 आमदार कोण आहेत याबाबत मात्र त्यांनी खुलासा करण्याचे टाळले आहे.
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीलाही ते अनुपस्थित राहिल्याचे समजते.
याविषयी बोलताना लोकसत्ताचे स्थानिक पत्रकार लक्ष्मण राऊत सांगतात, "नगर विकासासाठी निधी मिळत नसल्याची ही नाराजी आहे. त्यामुळे निधी न पोहोचलेले इतर काँग्रेसचे नेतेही नाराज आहेतच. कामे रखडत असल्याने त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतली असावी."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








