सचिन पायलट : बंड शमल्यावर अशोक गेहलोत यांच्याबाबत काय बोलले?

फोटो स्रोत, AFP
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये शांती आणि बंधुता आजही कायम असल्याचं सांगितलंय. तसंच त्यांनी भाजप काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केलाय.
काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी त्यांनी हे विधान केलंय.
ते म्हणाले, "पक्षात शांती आणि बंधुता आजही आहे. तीन सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आलीय. पक्षातील अंतर्गत मतभेद सोडवण्याचं काम ही समिती करेल. भाजपने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी शेवटी सर्व आमदार एका व्यासपीठावर आलो आहे."
पुढील आठवड्यात राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांची जैसलमेरमध्ये बैठक पार पडली.
या बैठकीआधी मुख्यमंत्री गहलोत यांनी अपक्ष आमदार सुरेश टाक, ओम प्रकाश हुड्ला आणि खुशवीर सिंह यांचीही भेट घेतली. मी गहलोत यांच्यासोबत असल्याचं टाक यांनी यावेळी सांगितलंय.
दुसऱ्या बाजूला सचिन पायलट यांनी जयपूरमध्ये पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. कोणत्याही पदाची मागणी केली नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे.
पत्रकारांनी सचिन पायलट यांना विचारले की, अशोक गहलोत तुमच्या विरोधात बरंच काही बोलले होते याविषयी काही स्पष्टीकरण देणार आहेत का? तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे का?

फोटो स्रोत, PTI
यावर उत्तर देताना पायलट म्हणाले, "माझ्यावर माझ्या कुटुंबाचे काही संस्कार आहेत. मी कुणाचा कितीही विरोध केला, ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली किंवा माझी शत्रू जरी असली तरी मी कधीही अशी भाषा वापरलेली नाही."
ते पुढे म्हणाले, "अशोक गहलोत माझ्यापेक्षा वयानेही मोठे आहेत. वैयक्तिकरित्या मी त्यांचा कायम आदर केला आहे. पण काम करण्याच्या पद्धतीत, प्रक्रियेत मला काही समस्या दिसत असल्यास त्याला विरोध करणे हा माझा अधिकार आहे. पण हे प्रकरण हाताळताना जी भाषा वापरली गेली त्याने कुणालाही दु:ख होईल. यावर मी उलट उत्तर दिलं तर ते योग्य नाही."
"सार्वजनिक ठिकाणी बोलताना सभ्यता आणि एक लक्ष्मण रेषा असायला हवी. माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही ती रेषा ओलांडली नाही. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. पण ज्याप्रकारे आरोप करण्यात आले, ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे सत्य सर्वांसमोर आलं आहे," असंही पायलट म्हणाले.
स्पष्ट, उघड आणि निर्णायक चर्चा
राजस्थानमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींसाठी समितीची स्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदारांची ही बैठक बोलवण्यात आलीय.
सचिन पायलट यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण या नाराजीमुळे राजस्थान सरकारवर टांगती तलवार होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सांगितलं, "त्यांच्यामध्ये स्पष्ट, उघड आणि निर्णायक चर्चा झाली आहे. सचिन पायलट यांनी काँग्रेस आणि राजस्थान काँग्रेस सरकारमध्ये काम करण्याची तयारी दाखवलीय."

फोटो स्रोत, Getty Images
समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना पायलट यांनी सांगितलं की ते कोणत्याही पदासाठी भांडत नव्हते. काही मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं.
सचिन पायलट यांनी 'आज तक' न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "मी एका पदावर होतो आणि आता ते पदही सोडलं. तुम्ही एखाद्याला पद द्याल पण त्याला त्या पदाचा सन्मान देणार नसाल तर मला ते पद नको. मला गाडी आणि बंगल्यासाठी पद नको आहे. मी केंद्रात मंत्री असताना मला काम करण्याचं स्वातंत्र्य होतं.
आपण ज्या लोकांच्या आधारे सत्तेत आलो त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं असल्याची मागणी आजही कायम आहे. सरकार आणि पक्षाला भक्कम बनवण्याचं काम करत राहीन. पण भविष्यात काय होईल याबाबत सांगू शकत नाही. आपली बाजू उघडपणे सांगता यावी एवढी जागा तरी असायलाच हवी."
सचिन पायलट यांना 14 जुलैला उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर राजस्थानच्या राजकारणात भूकंप आला होता. जवळपास एक महिना हे नाराजी नाट्य चाललं. नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हे प्रकरण शांत झाल्याचं आता दिसून येतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








