You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील: निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या चौकशीचे आदेश
निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चौकशी करावी, असे आदेश पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करावी, असंही न्यायालयाने म्हटलं.
माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप अभिषेक हरिदास यांनी केला होता. तसंच याबाबत तक्रार करत त्यांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पण सदर तक्रार आपल्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
"आपल्याकडे न्यायालयीन आदेशाची प्रत अद्याप आलेली नसून आत्ताच त्याविषयी काही भाष्य करता येणार नाही," असंही पाटील म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
2. शिवरायांच्या आशीर्वादामुळे राम मंदिराचा प्रश्न मार्गी आणि मी मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न शिवरायांच्या आशीर्वादामुळेच मार्गी लागला. तसंच यामुळेच मी मुख्यमंत्री बनलो, हा चमत्कार मी अनुभवला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण तसंच मंचर ग्रामपंचायतीच्या व्हेंटीलेटरसह अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (21 ऑगस्ट) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी ते बोलत होते.
राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावायचा या जिद्दीनेच नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्या गाठली होती, त्यानंतर लगेच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आणि राम मंदिराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं, असं ठाकरे म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
3. राजीव कुमार देशाचे नवे निवडणूक आयुक्त
राजीव कुमार यांची देशाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यमान निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली. राजीव कुमार 1 सप्टेंबरपासून या पदावर रुजू होतील.
अशोक लवासा यांची आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष (ADB) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदाचा कार्यभार ते लवकरच स्वीकारणार आहेत.
तर राजीव कुमार हे यांनी 1984 बॅचचे झारखंड केडरचे IAS अधिकारी आहेत. ते केंद्रात अर्थ सचिव म्हणूनही कार्यरत होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात याच पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना शासनाच्या विविध समित्यांवर पाठवण्यात आलं होतं. याबाबतची बातमी पुढारीने दिली आहे.
4. राष्ट्रीय स्तरावर मोठी राजकीय पोकळी - अरविंद केजरीवाल
देशातील प्रमुख विरोधी काँग्रेस पक्ष निष्क्रीय झाला असून भाजपला ठोस पर्याय उरलेला नाही. जनता या दोन्ही पक्षांच्या कामावर समाधानी नाही, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल बोलत होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा पर्याय म्हणून ही पोकळी आम आदमी पक्ष भरून काढेल का, हे काळच ठरवेल, आप हा पक्ष तुलनेने तरूण असून भारतभर त्याचा विस्तार होण्यास वेळ लागू शकतो, असं केजरीवाल म्हणाले.
5. 'पद्मश्री पुरस्कार काढून घ्या, असं सांगायला तू राष्ट्रपती आहेस का?'
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना रानौत सातत्याने बॉलीवुडमधील कलाकारांच्या विरोधात वक्तव्य करत आहे. यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर टीका केली आहे.
दिग्दर्शक करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी कंगना रानौतने केंद्र सरकारकडे केली होती.
यावर कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या, असं सांगायला तू राष्ट्रपती आहेस का? अशा शब्दांत नसीरुद्दीन शाह यांनी कंगनावर टीका केली आहे.
बॉलीवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शाह बोलत होते. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)