You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधींच्या सोनेरी काड्यांच्या चष्म्याच्या लिलावाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
महात्मा गांधी यांचा सोनेरी काड्या असलेल्या चष्म्याचा ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये लिलाव झाला. या ऐतिहासिक चष्म्याला 2 कोटी 55 लाख रुपये इतकी किंमत मिळाली होती.
इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरातील 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स' या लिलाव कंपनीने हा लिलाव आयोजित केला होता. अमेरिकेच्या संग्रहकाने हा चष्मा खरेदी केला आहे.
"या चष्म्याला 14 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळू शकेल आणि कंपनीच्या इतिहासात हा सर्वात मोठा लिलाव असेल," असं 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स' या कंपनीचे अधिकारी अँड्य्रू स्टो यांनी लिलावापूर्वी म्हटलं होतं.
या चष्म्याचे मालक ब्रिस्टलच्या मॅनगॉट्सफील्ड भागात राहत. त्यांनी एका अत्यंत साध्या पाकिटात (लिफाफा) हा चष्मा कंपनीला लिलावासाठी पाठवला होता. कंपनीला तो 3 ऑगस्टला मिळाला. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महात्मा गांधींनी हा चष्मा 1910 ते 1930 दरम्यान त्यांच्या काकांना दिल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत कार्यरत होते.
बीबीसी प्रतिनिधी गगन सभरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चष्म्याचा लिलाव करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी अँड्र्यू स्ट्रो म्हणाले, "जवळपास 50 वर्षे हा चष्मा असाच एका कपाटात पडून होता. याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे हा चष्मा फेकून द्यावा वाटतो, असं याच्या मालकाने एकदा मला म्हटलं होतं. पण याच चष्म्याने त्यांना इतकी मोठी रक्कम मिळवून दिली आहे. यामुळे त्यांचं आयुष्यच बदलणार आहे."
चष्म्याचे मालक अत्यंत वयस्कर आहेत. या लिलावातून मिळालेली रक्कम ती आपल्या मुलीला देणार असल्याचं ते सांगतात.
स्टो यांच्या मते, "त्यांना गेल्या काही काळात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. या परिस्थितीत मिळालेल्या पैशाने त्यांची खूप मदत होणार आहे."
"गांधीजींच्या चष्म्याला एक नवं ठिकाण मिळालं, या कामात आमची मदत झाली, याचा आम्हाला आनंद वाटतो. हा लिलाव आमच्यासाठी एक नवा विक्रम तर आहेच, पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याला एक वेगळं महत्त्व आहे," असंही स्टो यांनी म्हटलं.
लेटर बॉक्समध्ये पोहोचला चष्मा
"कुणीतरी एके रात्री हा चष्मा कंपनीच्या लेटर बॉक्समध्ये टाकला होता. सोमवारपर्यंत हा चष्मा या लेटर बॉक्समध्येच होता," असं स्टो सांगतात.
"एका लिफाफ्यासारख्या पाकिटात हा चष्मा ठेवलेला होता. आमच्या कर्मचाऱ्यांनी मला हा चष्मा दिला. यामध्ये हा गांधीजींचा चष्मा असल्याची माहिती देण्यात आली होती. चष्मा मिळताच स्टो यांनी त्याच्या मालकाशी संपर्क साधला. त्यांनी मालकाला चष्म्याचं महत्त्वं सांगितलं. त्यावेळी मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता," असं स्टो म्हणाले.
चष्म्याची विक्री केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याने 1920 च्या दशकात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात महात्मा गांधींची भेट घेतली होती. तेव्हापासून हा चष्मा त्यांच्याकडे आहे, असं चष्म्याच्या मालकांनी सांगितलं.
"लिलाव कंपनीने चष्म्याच्या इतिहासाबाबत संशोधन केलं. यामध्ये सर्व तारखा, गांधीजींचा हा चष्मा वापरल्याचा कालावधी या सर्व गोष्टी जुळत होत्या. हा गांधीजींनी वापरलेला पहिला चष्मा असल्याचंही सांगण्यात येतं," अशी माहिती स्टो यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)