फेसबुक: शशी थरूर यांची IT समितीवरून हकालपट्टी करा, भाजप खासदाराची मागणी

फेसबुकनं भाजप नेत्यांच्या द्वेषयुक्त वक्तव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असताना याप्रकरणी आता राजकीय युद्ध रंगण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता भाजपनं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांच्याकडून संसदेच्या माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं प्रमुखपद काढून घेण्यात यावं, अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी याप्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणीचं तसं पत्र दिलं आहे.

दुबे यांनी ANI ला सांगितलं, "माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीची बैठक बोलावू नका, असं शशी थरूर यांना सांगण्याची विनंती मी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे. तसंच या समितीच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात यावं, अशीही मागणी मी केली आहे."

ते पुढे म्हणाले, "मी कोणत्याही सोशल मीडिया व्यासपीठाच्या बाजूनं बोलत नाहीय. मी स्वत: संसदेत म्हटलं आहे की, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाप्रमाणेच सोशल मीडियावरही नियंत्रणाची गरज आहे."

दरम्यान, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पत्र लिहून शशी थरूर यांच्याविरोधात नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मी कोणत्याही संस्थेच्या प्रतिनिधींना बोलवण्याच्या विरोधात नाही. पण शशी थरूर यांनी समितीत याविषयी चर्चा न करता सोशल मीडियावर टिप्पणी केली आहे.

दुबे यांनी थरूर यांच्यावर घटनात्मक संस्थांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. थरूर आणि दुबे या दोघांनीही एकमेकांविरोधात विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. दुबेसुद्धा संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.

शशी थरूर यांनी संसदेच्या माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीसमोर प्रश्न-उत्तर उपस्थित करण्यासाठी फेसबुकला नोटीस पाठवण्यास सांगितलं होतं. थरूर या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे भाजप नाराज आहे.

भाजपचं म्हणणं आहे की, थरूर यांनी सोशल मीडियावर असं म्हणण्याआधी ही गोष्ट समितीसमोर मांडण्याची गरज होती आणि त्यावर चर्चा करायला हवी होती.

प्रकरण काय आहे?

अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 14 ऑगस्टला एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी, जिच्याकडेच व्हॉट्स अॅपचीही मालकी आहे, त्यांनी भारतात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या लेखात केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी फेसबुकनं भाजपशी संबंधित फेक पेजेस हटवल्याची माहिती अंखी दास यांनी दडवल्याचा दावाही या लेखात करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना अडविल्यामुळे भारतात कंपनीच्या व्यावसायिक हिताला बाधा येऊ शकते, असं म्हणत फेसबुकनं भाजप नेत्यांच्या द्वेष पसरवणाऱ्या भाषणांना कोणतीही आडकाठी केली नसल्याचंही वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या लेखात म्हटलंय.

या रिपोर्टमध्ये तेलंगणमधील भाजप आमदार टी राजा सिंह यांच्या एका पोस्टचा दाखला देण्यात आलाय. या पोस्टमध्ये अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसेचं कथित समर्थन करण्यात आल्याचं म्हटलंय.

या प्रकरणाची माहिती असलेल्या फेसबुकच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्यानं लिहिलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनीच्या धोरणानुसार टी राजा सिंह यांच्यावर बंदी घालण्यात यावी असं फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी निश्चित केलं होतं. मात्र अंखी दास यांनी सत्ताधारी भाजपा नेत्यांवर 'हेट स्पीच' संबंधीचे नियम लागू करायला विरोध केला होता.

वॉल स्ट्रीट जर्नलनं म्हटलं आहे- "कंपनीच्या भारतातील उच्चपदस्थ पब्लिक पॉलिसी अधिकारी अंखी दास यांनी द्वेष पसरवणाऱ्या भाषणासंबंधीचे नियम टी राजा सिंह आणि अन्य तीन हिंदू राष्ट्रवादी व्यक्ती आणि संघटनांवर लागू करण्याचा विरोध केला होता. मात्र यामुळे हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकतं, असं कंपनीतल्या काही लोकांचं म्हणणं होतं."

आपण आजही आपल्या विधानांवर ठाम आहेत. आपली भाषा अयोग्य नव्हती. आपल्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी हा दावा करण्यात आल्याचं आमदार टी राजा सिंह यांनी बीबीसी तेलुगूच्या प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना म्हटलं.

टी राजा सिंह यांनी म्हटलं, "केवळ मलाच लक्ष्य का करण्यात येत आहे? जेव्हा समोरचा अशा भाषेचा वापर करतो, तेव्हा कोणी तरी उत्तर द्यायला हवंच ना...मी तेच करत आहे."

राजकारणाचा मुद्दा

दरम्यान, भारतात या लेखावरून राजकारण सुरू झालं आहे. राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या लेखाचा आधार घेत सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे भाजपचे नेतेही पक्षाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

राहुल गांधी यांनी रविवारी (16 ऑगस्ट) ट्वीट करून म्हटलं की, भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात. अमेरिकन माध्यमांनी फेसबुकचं सत्य उघडकीस आणलं.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं, "पराभूत व्यक्ती आपल्या पक्षातील लोकांवरसुद्धा प्रभाव पाडू शकत नाहीत. ते जगावर भाजप आणि RSS चं नियंत्रण असल्याचं बोलत असतात."

या आरोप-प्रत्यारोपादरम्यान फेसबुकनं स्पष्टीकरण देताना म्हटलं, की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत.

फेसबुकच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना म्हटलं, "आम्ही द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींचा विरोध करतो. जगभरात आमची धोरणं सारखीच आहेत. ती कोणत्याही राजकीय व्यक्ती आणि पक्षासाठी वेगळी नाहीयेत. ही धोरणं राबविण्याच्या दृष्टिनं अजून प्रयत्न करण्याची गरज आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे आणि त्यादिशेनं आम्ही पावलंही उचलत आहोत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)