प्रशांत भूषणः भारतातले 'जनहित याचिका वकील नंबर 1' की वादग्रस्त व्यक्तिमत्व ?

    • Author, फैसल मोहम्मद अली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी दिल्ली

ही गोष्ट थोडी जुनी आहे. साधारणतः 40/41 वर्षांपुर्वीची. अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात 23 वर्षांचा एक तरुण सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पृथ्वीशिवाय ब्रह्मांडात आणखीसुद्धा जग आहे असं काहीसं कथानक असलेली ती कादंबरी प्रकाशित होऊ शकली नाही.

अर्थात, त्या मुलानं नंतर अनेक पुस्तंक लिहिली. तो मुलगा म्हणजेच प्रशांत भूषण. ते एक लेखक म्हणून नव्हे तर वकील म्हणून ओळखले जातात. त्यांनी 500 हून अधिक खटले लढवले आहेत.

यातले बहुतांश खटले पर्यावरण, मानवाधिकार आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचे होते. बहुतेक खटले त्यांनी फी न घेता लढवले आहेत. इंडिया टुडेनं त्यांना एका लेखात भारतातीय 'जनहित याचिका वकील नंबर 1' म्हटलं होतं.

प्रशांत भूषण ही सर्व कामं चर्चेत येण्यासाठी करतात, असं काही लोक म्हणतात. काही लोक त्यांना कसलेले कलाकार म्हणतात, तर काही लोक त्यांना अराजकतावादी म्हणतात.

सर्वोच्च न्यालयानं त्यांना न्यायालयाच्या अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. परंतु ही काही पहिलीच वेळ नाही.

63 वर्षीय प्रशांत भूषण यांची दुसरी ओळखही आहे. ते एक राजकारणी आणि कलासंग्राहकही आहेत.

त्यांचे वडील शांती भूषण हे वकील असूनही प्रशांत यांची याच क्षेत्रात यायची इच्छा नसावी. किमान सुरुवातीच्या काळात तरी नसावी.

विज्ञानाच्या पुस्तकांची आवड

प्रशांत पहिल्यांदा इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मद्रासला गेले. पण त्यांच्या दोन वर्षांच्या बहिणीची आठवण येऊ लागल्यामुळे त्यांनी एका सेमिस्टरमध्येच मद्रास सोडलं. मग अलाहाबाद विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घ्यायला गेले. त्यानंतर प्रिन्स्टनमध्ये सायन्स ऑफ फिलॉसॉफीचा कोर्स केला.

इंदिरा गांधी यांनी निवडणुकीत फसवणूक केल्याचा खटला शांती भूषण यांनी लढवला होता. हा खटला इंदिरा गांधी हरल्या होत्या. त्यानंतर देशात 21 महिने आणीबाणी होती.

आणीबाणीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या सरकारमध्ये शांती भूषण कायदामंत्री होते.

इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद न्यायालयात राजनारायण यांनी खटला दाखल केला होता. दोन वर्षं चाललेल्या या खटल्तील सुनावणीसाठी प्रशांतही उपस्थित होते. त्यांनी त्या खटल्यावर 'द केस दॅट शुक इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर बोफोर्स कथित घोटाळ्यावर 'बोफोर्स, द सेलिंग ऑफ नेशन' नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं.

प्रशांत यांना विज्ञानावर आधारित पुस्तकांची आवड असल्याचं प्रिन्स्टनमधील सहकारी हरजिंदर सिंह सांगतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी रसायनाच्या परीक्षणासंदर्भात एका पुस्तकाची चौकशी केली होती असं ते सांगतात.

जनहितासंबंधी प्रकरणं

काँग्रेसचे ओ मध्ये असणारे शांती भूषण यांनी आपल्या 'कोर्टिंग डेस्टिनीः ए मेमॉयर'मध्ये 1976 साली मुंबईतल्या जयप्रकाश नारायण यांच्या बैठकीची माहिती दिली आहे. काँग्रेसला हरवायचं असेल तर काँग्रेस ओ, जनसंघ, सोशालिस्ट पार्टी, भारतीय लोकदल यांना एकत्र यावंच लागेल, असं ते म्हणाले होते.

शांतीभूषण भारतीय जनता पार्टीच्या संस्थांपकांपैकी एक होते आणि 1986 पर्यंत या पार्टीचे कोषाध्यक्ष होते.

शांती भूषण आणि प्रशांत भूषण लोकपाल विधेयकाच्या संयुक्त मसुदा समितीतही होते.

1983 साली प्रशांत यांनी डून व्हॅलीमधील चुनखडकाच्या खाणकामामुळे पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाची केस लढवली. डेहराडूनच्या पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा सांगतात, एका खटल्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अमिकस क्यूरी नेमलं होतं. परंतु पर्यावरणासंबंधी काही गोष्टी त्यांच्या लक्षात येत नव्हत्या. तेव्हा प्रशांत यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं होतं.

त्या खटल्यात न्यायालयाने जीवन आणि खासगी स्वातंत्र्य (कलम21) अंतर्गत निर्णय दिला होता. तो ऐतिहासिक होता, असं वंदना शिवा सांगतात.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय खत कंपनी मोन्सेटो, 1984 ची शिखविरोधी दंगल, भोपाळ गॅस प्रकरण, नर्मदा प्रकल्प अशी अनेक जनहित प्रकरणं येत गेली आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते त्या भोवऱ्यात ओढले गेले.

भूषण यांच्यावर हल्ला

भूषण नोएडामध्ये राहातात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घराजवळ काही लोकांनी गोंधळ घातला होता. त्यांच्या घरावर रंग फेकला होता. भूषण यांनी एका ट्वीटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोमिओ स्कॉडवर टिप्पणी केली होती. त्यात त्यांनी कृष्णाचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या अशा बातम्या येत होत्या.

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होतं, की प्रशांत भूषण यांनी भगवान कृष्णाविषयी ज्या शब्दांचा वापर केला आहे, त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहे. तुमच्या मानसिकतेनुसारच तुम्हाला देवाची प्रतिमा दिसून येते.

यावर प्रशांत भूषण यांनी आपल्या विधानाची मोडतोड करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं.

ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील कार्यालयातच हल्ला झाला होता. हल्ला करणारे एक-दोघे जण 'जय श्रीराम'च्या घोषणा देत होते. त्यांनी प्रशांत भूषण यांना थप्पड लगावली आणि धक्का मारुन खाली पाडलं होतं.

तेव्हा केंद्रात आणि दिल्लीत काँग्रेसचं सरकार होतं. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता.

हल्लेखोरांमध्ये तेजिंदर सिंह बग्गा होते. ते स्वतःला भगत सिंह क्रांती सेनेचे सदस्य म्हणवत. नंतर ते भाजपाचे प्रवक्ते म्हणून नेमले गेले.

काश्मीरमध्ये जनमत चाचणी घ्यावी याचं समर्थन प्रशांत भूषण यांनी केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला, असं सांगितलं जातं.

इंडिया अगेन्स्ट करप्शनची सुरूवात

काश्मीर भारतात सामील व्हावं की त्यांनी स्वतंत्र राहावं यासाठी तिथल्या लोकांची जनमत चाचणी घ्यावी असा एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात दाखल झाला होता.

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अमिताभ सिन्हा म्हणतात, "काश्मीरच्या बाबतीत तुम्ही असं विधान करता याचा अर्थ तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहात. ही देश तोडण्याची भाषा आहे. देश वाचला नाही तर कोणीच वाचणार नाही." अमिताभ सिन्हा भाजपचे सदस्य आहेत.

त्यांच्यावर हल्ला होऊनही वकीलांच्या संघटनांनी फारसा विरोध केला नाही. याला उत्तर देताना प्रशांत भूषण यांनी 'इंडिया टुडे' शी बोलताना म्हटलं, "मी बराचसा एकाकी आहे. कायदाक्षेत्रात माझे थोडेच चांगले मित्र आहेत. मी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोकांचे बिंग फोडले आहे. कार्पोरेट जगतही माझ्याविरोधात आहे."

पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रशांत यांनी निरा राडिया टेप प्रकरण, कोळसा आणि 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासारखी प्रकरणं लावून धरली. त्यामुळे दूरसंचार मंत्र्यांना राजीनामा देऊन जेलमध्ये जावं लागलं होतं.

सर्वोच्च न्यायालयानं स्पेक्ट्रम आणि कोळसा वाटप रद्द करण्यात आलं होतं. सीबीआय तपासाचा आदेश दिला गेला. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांचं भरपूर नुकसान झालं होतं.

गोव्यात लोहखनिजाच्या खाणकामाविरोधात याचिका दाखल झाल्यावर खाणकाम बंद करण्यात आलं होतं.

त्याच काळात तयार झालेल्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' मोहिमेची सुरुवात झाली. त्यातून आम आदमी पार्टी तयार झाली. प्रशांत भूषण त्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

परंतु केजरीवालांशी मतभेद झाल्यानंतर भूषण यांनी योगेंद्र यादव यांच्याबरोबर स्वराज इंडिया पार्टी तयार केली.

न्यायालयाचा अवमान

त्यांचे आपमधले जुने सहकारी आशिष खेतान म्हणतात, प्रशांत यांनी माझ्यासाठी आईसारखी भूमिका बजावली होती. पक्षाप्रती त्यांच्या मनात स्नेह आणि भरपूर प्रेम होतं. आशिष खेतानसुद्धा आता आपमधून बाहेर पडून मुंबईत वकिली करत आहेत.

भ्रष्टाचारांच्या प्रकरणांविरोधात एक प्रकारचं वातावरण तयार झालं त्याने 2014 साली भाजपा सत्तेत येण्यात मोठी भूमिका पार पाडली, असं राजकीय तज्ज्ञ मानतात.

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रशांत यांनी रफाल विमानातील कथित घोटाळा,लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या समस्या, पीएम केअर्स फंडमधील पारदर्शकता नसणे अशी प्रकरणं लावून धरली. मात्र या प्रकरणातील न्यायालयाचे निर्णय सरकारच्या बाजूने लागले असं समजलं जातं.

अमिताभ सिन्हा म्हणतात, "जेव्हा आपण सारखी तक्रार करता तेव्हा तुम्ही स्वतःला उपेक्षित समजत असल्यामुळे वारंवार असं करत आहात असं लोकांना वाटतं. प्रशांत यांनी न्यायालय अवमान प्रकरणात तेच केलं आहे." ज्या फांदीवर बसले आहेत तीच फांदी ते कापत आहेत.

सिन्हा म्हणतात, "सत्ताविरोधी होऊन होऊन प्रशांत अराजकवादी झाले आहेत. लोकांचा देशातील ज्या दोन तीन संस्थांवर विश्वास आहे, त्यामध्ये न्यायपालिका आणि सैन्याचा समावेश आहे. हे त्यांनाही बदनाम करत आहेत. त्याला परवानगी मिळता कामा नये."

गँगचे सदस्य

प्रशांत भूषण यांचे काही जवळचे लोक म्हणतात, प्रशांत यांच्या प्रामाणिकपणावर आणि हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. परंतु ते कधीकधी भावनांना आवर घालू शकत नाही. कोणी असहमती व्यक्त केली की ते त्या व्यक्तीच्या विरोधात ते जातात.

काही लोक अवमान प्रकरणानंतर त्यांना गँगचे सदस्य म्हणवत आहेत.

योगेंद्र यादव यांना यामागे विचारपूर्वक रणनीती दिसते. "गेल्या चार दशकांपासून कोणतंही सरकार असलं तरी प्रशांत जनहितासाठी लढत आहेत, त्यांना कोणत्या कप्प्यात बंदिस्त करायचं?" असा प्रश्न ते विचारतात.

16 ऑगस्ट रोजी योगेंद्र त्यांच्याकडे जेवणासाठी गेले होते. तेव्हा प्रशांत आजिबात चिंताग्रस्त नव्हते. उलट पुढच्या आठवड्यात कुठे जेवण करावं लागेल हे माहिती नाही असं ते शांतीभूषण यांना गंमतीत म्हणाले.

नंतर त्यांनी आपली पेंटिंग्जही मला दाखवली आणि त्यावरच आम्ही बोलत राहिलो, असं यादव सांगतात.

प्रशांत यांना वेगवेगळी पेंटिग्ज गोळा करणं आवडतं. त्यांच्याकडे मिनिएचर आणि एका कलाप्रकारची चित्र भरपूर प्रमाणात आहेत.

'ही कॅन अफोर्ट टू डू दॅट'

अवमान प्रकरणात दोषी ठरवल्यावर त्यांच्या एका जुन्या प्रकरणाचे ट्वीट्स रिट्वीट होऊ लागले. जस्टीस कर्नन यांच्या प्रकरणात न्यायालयानं त्यांना दोषमुक्त ठरवलं होतं.

इतकच नाही तर कर्नन दलित होते म्हणून भूषण यांनी असं वर्तन केलं होतं अशाही काही कमेंट्स आल्या.

2017मध्ये या न्यायाधीशांनी सरन्यायाधीश जेएस केहर यांच्यासह सात न्यायाधिशांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेलं होतं.

पण कायदेतज्ज्ञांच्या मते या दोन प्रकऱणात साम्य शोधणं चूक आहे.

याआधीही प्रशांत भूषण यांनी यापूर्वीच्या 16-17 न्यायाधीशांपैकी अर्ध्याहून जास्त भ्रष्ट होते असा आऱोप केला होता.

त्यांचे एक जुने मित्र म्हणतात, 'ही कॅन अफोर्ट टू डू दॅट' कारण त्यांच्याकडे क्षमता आहे.

प्रशांत भूषण यांचे भाऊ जयंत सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. त्यांच्या पत्नी दीपाही पूर्वी वकील होत्या. त्यांच्या तिन्ही मुलांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)