You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काँग्रेस बैठक: सोनिया गांधींना पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांचं पत्र
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
गेल्या सहा वर्षांमध्ये पक्षाची सतत पडझड होत असल्याची नोंद घेत 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याची गरज या नेत्यांनी पत्रात व्यक्त केल्याचे केल्याचे सांगण्यात येत आहे.
या 23 नेत्यांमध्ये काँग्रेसचे 5 माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे, असं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
हे पत्र साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले आहे. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, विवेक टंका, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपिंदर सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पी.जे. कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित या नेत्यांच्या सह्या आहेत.
काही दिवसांपुर्वी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घ्यावी असं वक्तव्य काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले होते
इंडिया टुमॉरो या पुस्तकात प्रियंका गांधी यांची मुलाखत छापण्यात आली होती. त्या म्हणाल्या होत्या, "आमच्यापैकी कुणीही पक्षाचा अध्यक्ष होऊ नये. या राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. पक्षाने आपला मार्ग शोधण्याची गरज आहे असं मलाही वाटतं."
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 'गांधी परिवाराच्या बाहेरील' व्यक्ती झाल्यास आपण त्यांच्या सूचनेचे पालन करू असंही प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारावं यासाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही आहेत. शिवाय, राहुलची 'यंग ब्रिगेड' सतत नाराजी व्यक्त करत आहे.
अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीने अध्यक्षपद हाती घ्यावे असे वक्तव्य का केले? याचा नेमका अर्थ काय? काँग्रेसचे अध्यक्षपद आता गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाणार का? यामागे काही काँग्रेसची वेगळी रणनीती आहे का? या प्रश्नांचा वेध घेऊयात.
गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करणार?
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने आता अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असे मत त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
काँग्रेस समितीने राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली.
आता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची 'यंग ब्रिगेड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम केला आणि ते भाजपमध्ये गेले. राहुल गांधींच्या जवळचे असणारे दुसरे नेते सचिन पायलट यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार राजीव सातव यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं.
केंद्रात सत्ताधारी भाजप पक्षाला हरवायचे असेल तर सर्वप्रथम काँग्रेसला सक्षम होणं गरजेचं आहे हे काँग्रेस नेत्यांनाही मान्य आहे. पण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही.
ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातली नाराजी दूर करण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींनीच प्रयत्न केले. तेव्हा आजही काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते."
मात्र तरीही पक्षाला विशिष्ट छत्रछायेखालून बाहेर काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी कधी कधी चाकोरीबाहेरील नेतृत्वाला संधी द्यावी लागते. मग ती नामधारी असली तरी हरकत नाही. याची भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी नामधारी नेतृत्वांची अनेक उदाहरणं देता येतील.
डॉ. मनमोहन सिंह यांना सोनिया गांधींनी पंतप्रधानपदासाठी संधी दिली होती. मात्र प्रत्यक्षात निर्णय सोनिया गांधींचेच असायचे अशी टीका आजही काँग्रेसवर होत असते.
"भारतीय जनता पक्षातही अशी अनेक उदाहरणं देता येतील. आताही अध्यक्षपद जे. पी. नड्डा यांच्याकडे असले तरी पक्षाच्या महत्त्वाचे निर्णयांवर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. येणाऱ्या काळात काँग्रेसचीही अशीच रणनीती असू शकते," असंही विनोद शर्मा म्हणाले.
नेतृत्वहीन काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडू शकत नसल्याची टीकाही केली जातेय. बिहार निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला दिशाहीन राहणे परवडणारे नसल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी व्यक्त केले.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह हा पक्षात नंबर 2 चे स्थान कुणाचे असेल? यासाठीचा आहे. गांधी कुटुंबातील व्यक्तीनेच किंबहूना राहुल गांधींनी नेतृत्व करावं हीच काँग्रेसजनांची इच्छा आहे. नरसिंह राव जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा अर्जुन सिंह यांनी पक्षात आपले स्थान दुसऱ्या क्रमांकचे असल्याचे सिद्ध केले होते. भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणींनंतर नरेंद्र मोदींनी ती जागा घेतली. काँग्रेसमध्येही दुसऱ्या स्थानासाठी संघर्ष सुरू आहे."
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार?
एका बाजूला काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारावे अशी मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असाही काही नेत्यांचा सूर आहे.
राहुल आणि प्रियंका गांधी दोघांनीही आता गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने अध्यक्ष व्हावे अशी भूमिका मांडली आहे. पण तरीही गेल्या वर्षभरात काँग्रेसला अध्यक्षपदासाठी पर्याय मिळू शकलेला नाही हे वास्तव आहे.
खासदार शशी थरुर यांनी राहुल गांधी अध्यक्षपदासाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. पण त्यासाठी ते तयार नसल्यास काँग्रेसने पर्यायी विचार करायला हवा असेही मत मांडले होते. त्यांच्यानंतर हीच भूमिका कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनीही मांडली होती.
ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा सांगतात, "गांधी कुटुंबातील कुणालाच अध्यक्षपदात रस नसल्यास त्यांनी थेट पक्षांतर्गत निवडणूक घेऊन निर्णय घ्यावा. या निवडणुकीत राहुल आणि प्रियंका यांनी सहभाग घेऊ नये.
"पक्षाची निवडणूक घेण्याव्यतिरिक्त गांधी कुटुंबाकडे कोणते पर्याय असू शकतात ? यावर बोलताना विनोद शर्मा सांगतात, "भाजप या पक्षाला मार्गदर्शन करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्याचप्रमाणे गांधी घराण्यानेही आता पक्षाला मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेकडे वळण्यास हरकत नाही," शर्मा सांगतात.
शर्मा पुढे सांगतात, "राजकीय पक्षाला मोठा कौटुंबिक वारसा असल्यास त्याचा फायदा आणि नुकसान दोन्ही असते. काँग्रेस सारख्या पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी, पक्षात बंड आणि फूट टाळण्यासाठी गांधी कुटुंबातील सदस्याच्या नेतृत्वाची गरज आहे. पण अशावेळी घराणेशाहीचा आरोप आणि त्यामुळे होणारे नुकसानही आहे."
काँग्रेसमध्ये यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूका घेण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधींचा 1977 मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक जण काँग्रेस सोडून गेले होते. नरसिंह राव सरकार गेल्यानंतर काँग्रेस 1996 मध्येही नेतृत्वहीन होती.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यावेळी निवडणूक झाली होती. सीताराम केसरी अध्यक्षपदी निवडून आले होते. पण पक्ष एकजूट ठेवण्यासाठी काही काळातच 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. मात्र 2000 मध्ये पुन्हा पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे नेते जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. मात्र सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड झाली.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी नरेंद्र मोदींना पर्याय असू शकतात?
राहुल गांधी गेल्या 16 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. राजकारणातील त्यांच्या कारकिर्दीचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन केल्यास नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधी कसे अयोग्य आहेत याची.
पाच कारणे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या लेखात दिली आहेत. त्यांच्यानुसार, पहिले कारण म्हणजे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात आलेले स्लोगन्स, घोषणा, प्रचाराची रणनीती यामध्ये राजकीय बुद्धिमत्तेचा अभाव होता.
दुसरे कारण - राहुल गांधी हे एक उदासीन वक्ता आहेत. त्यांच्याच वक्तृत्व कौशल्य नाही. विशेषत: भारतात सर्वाधिक व्यापक असलेल्या हिंदी भाषेतून ते उत्तम संवाद साधू शकत नाहीत.
तिसरे कारण - त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही. त्यांनी कधीही नोकरी किंवा एखादा व्यवसाय केलेला नाही. त्यामुळे कामाचा कुठलाही अनुभव त्यांच्या गाठीशी नाही.
चौथे कारण - राहुल गांधींमध्ये क्षमता आणि सहनशीलतेचा अभाव आहे. ते सलग अनेक आठवडे राजकीय जीवनातून गायब होते.
आणि पाचवे कारण - मतदारसंघात ते स्वत:च्या कर्तृत्वावर निवडून आलेले नाहीत. एकविसाव्या शतकात मतदार घराणेशाहीबाबत प्रश्न विचारतात.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या सर्व प्रकरणावर ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, " नेहरु-गांधी कुटुंबाने सत्तेचा त्याग करत पक्षाची सेवा केली आहे. काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते राहुल गांधींनी केलेल्या मेहनतीचे साक्षीदार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही राहुल गांधींनी संघर्ष केला. अशा निडर धाडसामुळेच पक्षालाच नव्हे तर देशालाही राहुल गांधींची गरज आहे."
"प्रियंका गांधींचे ते वक्तव्य जुलै 2019 चे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वर्षभरानंतर माध्यमांनी भाजपच्या सांगण्यावरून यात रस घेतलाय," असा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)