सुशांत सिंह राजपूत : पार्थ पवार यांचं शरद पवारांना पुन्हा आव्हान?

    • Author, प्राजक्त पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गेले अनेक दिवस भाजपकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती.

बुधवारी (19 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रं सीबीआयकडे सूपूर्त करून सीबीआयला सहकार्य करावं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

या निर्णयानंतर भाजपकडून 'हा सत्याचा विजय' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

'हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय आहे. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा!' अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एकीकडे भाजप महाराष्ट्र सरकारवर टीका करत सुशांत सिंहची केस सीबीआयकडे सोपवल्याबद्दल समाधान व्यक्त करत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 'सत्यमेव जयते..! हे ट्वीट केलय.

हे ट्वीट करून पार्थ यांनी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेऊन आजोबा शरद पवार यांना आव्हान दिलं आहे का?

पार्थ भूमिकेवर ठाम?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास सीबीआयकडे देणं म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. पण विरोधी पक्षाकडून सातत्याने हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती.

याच दरम्यान पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. राजकीयदृष्टय़ा पार्थ पवारांची ही भूमिका सरकारविरोधात होती.

त्यानंतर पार्थ पवार यांचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललंय अशी चर्चा सुरू झाली. याला कारण होतं पार्थ पवारांनी 5 ऑगस्टला राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्रीराम'चा जयघोष करणारं ट्वीट केलं.

दोन मुद्दयांवर थेट विरोधी भूमिका घेतल्यानंतर माध्यमांनी जेव्हा शरद पवारांना पार्थ यांच्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी म्हटलं, की तो अपरिपक्व आहे मी त्याला कवडीचीही किंमत देत नाही.

या वक्तव्यावरून पवार कुटुंबीयांमधला राजकीय वाद सर्वांसमोर आल्याचं बोललं जाऊ लागलं. पवार कुटुंबीयांमध्ये अनेक बैठका झाल्या. पार्थ यांना शरद पवार यांनी समज दिल्याच्या बातम्या आल्या. यानंतर हा वाद निवळला असं वाटत असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्वीट केलं.

हे ट्वीट करून पार्थ पवार हे त्यांच्या भूमिकेवर आजही ठाम असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन?

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं, "आम्हाला कोर्टाची ऑर्डर कॉपी मिळाल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ."

पण जेव्हा त्यांना पार्थ पवार यांच्या ट्वीटबद्दल विचारण्यात तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि ते निघून गेले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पार्थ यांचे चुलतभाऊ रोहित पवार यांना पार्थ पवारांच्या भूमिकेबद्दल विचारलं असता त्यांनी म्हटलं, "पार्थने काय ट्वीट केलं हे मला माहिती नाही. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला मुंबई पोलिसांचा कायम अभिमान आहे. पार्थ यांच्या ट्विटचा प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या विचाराने काय तो अर्थ काढावा. मला त्यावर काही बोलायचं नाही"

राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पार्थ यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला.

पार्थचं विरूद्ध दिशेचं राजकारण?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी असो किंवा राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर 'जय श्रीराम'चा नारा देणारं पत्र असो या दोन्ही प्रकरणात पार्थ पवार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. शरद पवारांनी कानउघाडणी करूनही पार्थ पवारांचं पक्षाविरुद्ध राजकारण थांबलेलं नाही, असं आजच्या ट्विटवरून स्पष्ट होतय.

याचा काय अर्थ काढायचा याबाबत बोलताना 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात, "शरद पवारांच्या नाराजीनंतरही पार्थ पवार हे सातत्याने पक्षाविरुद्ध भूमिका घेत आहेत. पवार कुटुंबियांपैकी काहींचा पाठिंबा असल्याशिवाय ते इतकं साहस करणार नाहीत, असं वाटतं.

"पार्थ यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी केलेला विरोध, त्यानंतर पार्थ यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माढामधून घेतलेली माघार आणि पार्थ यांचं अपयश या सगळ्यामध्ये पार्थ यांची नकारात्मक प्रतिमा झाली आहे. त्यांच्या वयाचे रोहित पवार हे आमदार आणि राष्ट्रवादीतलं नवं नेतृत्व म्हणून उदयाला येत असताना पार्थ यांना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नाही याचं शल्य पार्थ पवारांच्या मनात असू शकतं," प्रधान सांगतात.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शरद पवार यांनीही तपास सीबीआयकडे द्यायला हरकत नाही, पण मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं. पार्थ पवार यांनी आधी केलेल्या सीबीआय तपासाच्या मागणी संदर्भात त्यांच्या या ट्वीटकडे पाहता येईल. पण जर यापुढेही पार्थ यांच्या भूमिका अशाच पक्षाविरुद्ध राहील्या तर मात्र राजकीयदृष्टय़ा ही फूट असल्याचं मान्य करता येईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)