You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे : कोरोना व्हायरसची 3 जम्बो हॉस्पिटल्स अशी असतील
मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोविडच्या रुग्णांसाठी मोठ्या मैदानांवर जम्बो हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी तीन जागांची निश्चिती करण्यात आली आहे.
यापैकी दोन हॉस्पिटल्सचं काम सुरू झालं असून तिसऱ्याचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत या हॉस्पिटल्ससाठी 25 ऑगस्टची डेडलाईन दिली होती.
पुणे शहर आणि परिसराची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. दिवसभराची बाधितांची संख्या आता मुंबईच्याही पुढे जाते आहे. पण वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेमध्ये आवश्यक बेड्स आणि व्हेटिंलेटरची कमतरता पुण्यात भासते आहे. त्यामुळे मुंबईत जशी उभारली तशी तीन जम्बो हॉस्पिटल्स युद्धपातळीवर उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
यातल्या २ हॉस्पिटल्सचं काम सुरू झालं असून 19 ऑगस्टपर्यंत ती पूर्णपणे कार्यरत होतील असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
पुणे शहरातल्या कोव्हिडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यानुसार निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (30 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यात रुग्णांचा आकडा 80 हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तयार करण्यात येण्याऱ्या सुविधा जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातली दोन महानगरपालिका क्षेत्रं अशा मिळून तयार होणार आहेत.
या तीनही जम्बो हॉस्पिटल्ससाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच 'पीएमारडीए' मिळून करणार आहेत.
सध्या या तीन हॉस्पिटल्सपैकी एका हॉस्पिटलसाठी पुण्यातील सीओईपी कॉलेजचं मैदान आणि तर दुसऱ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
"या दोन्ही ठिकाणी इथे 800 बेड्सचं हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहे, ज्यात 200 व्हेंटिलेटरसहित बेड्स असतील आणि बाकी बेड्सना ओक्सिजन पुरवठ्याची सोय असेल. कंत्राटदारांना काम देण्यात आलं आहे आणि काम युद्धपातळीवर सुरुही झालं आहे," असं 'बीबीसी मराठी'शी बोलतांना पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं.
या दोन व्यतिरिक्त तिसऱ्या हॉस्पिटलची जागा म्हणून पुण्याच्याच 'एसएसपीएमएस' कॉलेजचं मैदान निश्चित करण्या आलं आहे.
"पण अगोदर पहिल्या दोन हॉस्पिटल्सचं काम कसं होतं आहे आणि सोबतच पुण्यातल्या संसर्गाची स्थिती पुढच्या काही दिवसांत कशी असेल यावर इथलं काम कधी सुरू करायचं याचा निर्णय घेतला जाईल," असं राव म्हणाले.
पुणे शहरालगतच्या बालेवाडीच्या क्रीडासंकुलात हॉस्पिटल उभारण्याचा निर्णयही विचाराधीन होता. पण पाण्याची उपलब्धता आणि इतर आवश्यक बाबी पाहता तीनही हॉस्पिटल्स शहरी वस्तीत उभारण्याचा निर्णय घेतला गेला.
मुख्यमंत्र्यांनी ही तीनही हॉस्पिटल्स उभारण्यासाठी 25 ऑगस्टची डेडलाईल प्रशासनाला दिली आहे आणि त्यातलं पहिलं हॉस्पिटल 20 ऑगस्टपर्यंत तयार होणं अपेक्षित आहे.
गेल्या काही दिवसांत पुण्यातून बेड्सअभावी कोरोनाबाधित रुग्णांची परवड झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. जोपर्यंत नवीन हॉस्पिटल्स तयार होत नाहीत तोपर्यंत खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्स, वैद्यकीय महाविद्यालयं यांनी बेड्सची आवश्यकता असणाऱ्या प्रत्येकाला ते मिळेल याची जबाबदारी घ्यावी, असं उद्धव ठाकरे यांनी पुण्यातल्या बैठकीत सांगितलं.
राज्य सरकारनं ही घोषणा केलेली असतांनाच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र ही जम्बो हॉस्पिटल्स उभारेपर्यंतची व्यवस्था अपुरी आहे असं म्हटलं आहे.
त्यांनी ट्विटरद्वारे मागणी करतांना असं म्हटलं आहे की, '15 ऑगस्टपर्यंत पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख तर 31 ऑगस्टपर्यंत ती 2 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे बेड्सची, ऑक्सिजनची, व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणावर गरज लागेल. त्यामुळे जम्बो सेंटर्स उभारेपर्यंत आवश्यक सोयी तातडीनं कराव्या.'
अर्थात, एकीकडे मुंबईमध्ये रुग्णसंख्या आणि बेड्स यांचं प्रमाण व्यस्त झाल्यानंतर उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होईपर्यंत परिस्थिती गेली होती. पण त्यानंतर मुंबईत युद्धपातळीवर अशी हॉस्पिटल्स उभारली गेली. मुंबईच्या या अनुभवाकडे पाहून पुण्यात यापूर्वीच अशी मोठी हॉस्पिटल्स का उभारली गेली नाही, हा प्रश्न विचारला जातो आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)