उद्धव ठाकरे: महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर कितपत यशस्वी झाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना शिवसेना किंवा महाविकास आघाडीचे धोरणात्मक निर्णय घेण्यास फारसा वेळ मिळालेला नाही.
कोरोना साथीच्या काळामध्ये प्रशासन सांभाळत कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रमुख ध्येय सरकारला ठेवावे लागलं आहे. महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमधील सरकारांना आपल्या कामाचा सुकाणू केवळ या दिशेनेच ठेवावा लागला आहे आणि पुढचा बराच काळ ठेवावा लागेल.
गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यातही त्यांनी सरकारचे स्थैर्य आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती यावर भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये तिन्ही पक्षांच्या या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पण त्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना अजित पवार यांनी एक जुना फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत अजित पवार गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे बसल्याचं दिसतं. त्यामुळे नक्की सरकार कोण चालवतंय याबाबत संदिग्धता तयार झाल्याचं बोललं जातं आहे.
असं असलं तरी अजित पवार यांनी लोकमतमध्ये एक विशेष लेख लिहून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्यात ते म्हणतात, "महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची धोरणं, विचारधारा वेगवेगळ्या आहेत. परंतु ध्येय एकच आहे. ते म्हणजे, राष्ट्राचा सर्वांगिण सर्वसमावेशक विकास करणं'. उद्धव ठाकरे यांचा सहकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचंही त्यांनी या लेखात म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या मुख्यमंत्रिपदावरील कार्यशैली आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामकाजाबाबत बाळ ठाकरे अँड राइज ऑफ शिवसेना पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार वैभव पुरंदरे यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
वैभव पुरंदरे म्हणाले, "एखाद्या राजकीय पक्षाचं अध्यक्षपद सांभाळणं आणि मुख्यमंत्रिपद सांभाळणं या दोन्ही वेगवेगळ्या भूमिका आहेत. पण सध्या सरकारमध्ये केवळ एकाच पक्षाचं आणि एकाच कुटुंबाचं चालतं अशी भावना लोकांच्या मनामध्ये तयार होताना दिसते. हे चांगलं लक्षण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठराविकच मंत्री कार्यरत असणं, काँग्रेस या आघाडीचा भाग आहे की नाही इतकी शंका येण्याइतपत त्या पक्षाचा सरकारपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न आहे असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतात."

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मुंबईपाठापोठ मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे त्याबद्दल सरकारच्या कामाबाबत बोलताना पुरंदरे म्हणाले, कोरोनाची साथ मुंबईत पसरल्यावर इतर क्षेत्रांमध्ये ती पसरणार नाही याची काळजी घेणं आवश्यक होतं. मुंबईकरांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम खरेच गांभिर्याने पाळले आहेत इतकेच नव्हे तर दाट लोकसंख्येच्या भागामध्येही त्यांनी हे नियम पाळले आहेत. त्यामुळे लोक अत्यंत जबाबदारीने वागले असं म्हणता येईल.
पण आता एमएमआरमध्ये मुंबईसारखीच रुग्णसंख्या दिसून येत आहे. किंवा या प्रदेशात किमान सामान्य उपचारांच्या मदतीची तयारी करणं आवश्यक होतं. आता ते होताना दिसत नाही. तसेच चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण दिसत नव्हते, आता तेथेही रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. ग्रामीण भागामध्ये प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती. ही तयारी का केली नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत."
'तीव्र मतभेद दिसलेले नाहीत'
आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्यात आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांना यश आल्याचं दिसतंय असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. मध्यंतरी त्यांचा विधानपरिषदेत प्रवेश करण्याविषयी झालेला गोंधळ सोडता टोकाची कोणतीही घटना अजून घडलेली नाही, तीव्र मतभेदही एखाद्या विषयावर दिसलेले नाहीत त्यामुळे इतक्यात त्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करणे योग्य नाही असं देसाई म्हणतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे थोडे प्रशासनावर जास्त अवलंबून आहेत असं दिसतं. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय, नेमणूका याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करायला हवी. खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्यासारखे काही निर्णय त्यांनी लवकर घ्यायला हवे होते असं वाटतं. शिवसेना हा मुळचा मुंबईतला पक्ष असल्यामुळे त्यांचं मुंबईवर जास्त लक्ष असणं साहजिकच आहे पण म्हणून इतर प्रदेशाकडे दुर्लक्ष व्हायला नको.'
'अनपेक्षित मुख्यमंत्री'
उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री होईल हे अनपेक्षित होतं. त्याला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे.
2019 साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांनी सर्वच राजकीय विश्लेषकांचे, नेत्यांचेच नाही तर शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपाचे आजवरचे सर्व आडाखे चुकवले.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचं काय होईल? शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय आणि आजवर कधीच महाराष्ट्रात झाला नव्हता इतका सेनेपेक्षा नव्हे तर सर्वच पक्षांपेक्षा शक्तिमान होईल का?
शिवसेनेची युती निवडणुकीआधी आणि एकत्र लढून निवडणुकीनंतरही तुटू शकते का? आता युतीमध्ये भाजप युतीमध्ये मोठा भाऊ असताना शिवसेना वेगळा विचार करेल का? याबाबत सर्वांची काही गृहितकं होती. या सर्व गृहितकांना या निवडणुकीनं चुकवलं.
'अफ्टर नेहरू, हू?' हा जसा प्रश्न राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसच्या बाबतीत विचारला जायचा तशी स्थिती शिवसेनेची नसली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचं स्वरूप कसं असेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना कशी असेल याबाबत विचार आणि प्रसंगी शंकाही आधीपासूनच मांडल्या जात होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरीही उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्या वेगळ्या स्वभावानुसार शिवसेना पक्ष चालवण्याची आणि आता तर सत्तेत येऊन दाखवण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.
फोटोग्राफर ते राजकारणी
राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे व्यावसायिक फोटोग्राफर होते. राजकारणात आल्यावरही त्यांनी आपली आवड जोपासत फोटोग्राफी सुरू ठेवली. त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्येही लागल्याचं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज्यभर फिरून गडकिल्ल्यांचे टिपलेले फोटो आणि वारीवरील फोटोंवर पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. 2003 ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याआधी उद्धव ठाकरे हे राजकारणात फारसे दिसले नव्हते.

फोटो स्रोत, Twitter
2003 साली झालेलं महाबळेश्वर अधिवेशन
शिवसेना या पक्षाकडे पाहिलं तर इथे इतर पक्षांपेक्षा थोडी रचना वेगळी दिसून येते. वर्षानुवर्षे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते अशी दोन पदांमध्ये विभागणी झाली होती. परंतु 2003 साली या दोन्ही पदांमध्ये कार्यप्रमुख म्हणजेच कार्याध्यक्ष हे पद तयार करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे सभागृहात आगमन झाले. त्यांनी प्रतिनिधीसभेत 'उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना, तुमच्यावर जबरदस्ती तर होत नाही?' असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर उपस्थितांनी 'नाही, नाही' असे उतर दिले. ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र ठाकूर यांनी लिहिलेल्या 'शिवसेना समज-गैरसमज' पुस्तकात याचे वर्णन केले आहे.
या निवडीनंतर बोलताना "काही पक्षात माणसं लादली जातात, पण मला घराणेशाही मान्य नाही. तुम्ही उद्धवला निवडून दिलं हे ठीक आहे. पण ही शिवशाही आहे," असं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्याला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेतली वाटचाल
शिवसेनेच्या पक्षांतर्गत घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आपल्या निवडीआधीच काही वर्षे सक्रिय झाले होते. नेतृत्वाची सूत्रं भविष्यात त्यांच्याकडेच येतील हे स्पष्ट होऊ लागल्यावर पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे नेते त्यांच्या पक्षातच होते. यामध्ये सर्वात जास्त संघर्ष नारायण राणे यांच्याबरोबर झाल्याचं दिसतं.
नारायण राणे यांनी आपल्या 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) पुस्तकात त्यांची बाजू मांडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सत्ता स्थापनेपासून युती लांब राहाण्यात उद्धव ठाकरे यांचा वाटा जास्त आहे, हे सांगताना राणे लिहितात. "ज्या 15 जणांची नावं उद्धव यांनी यादीतून काढली होती, त्या उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या 15 जणांपैकी 11 उमेदवार विजयी झाले होते. हे 11 आमदार शिवसेनेत असते तर सेना-भाजपा युतीचे अपक्षांच्या मदतीने सहज सरकार स्थापन झालं असतं."उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यापासून त्या दोघांमधील दरी वाढत गेल्याचं दिसून येतं. ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे', हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रकाश अकोलकर यांनी याचे संकेत 2002च्या डिसेंबर महिन्यापासूनच दिसत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ते ठाकरे कुटुंबातील अंतर्गत संघर्षामध्येही उद्धव ठाकरे- नारायण राणे यांच्यातील बेबनावाची बिजं असल्याचं सांगतात.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची पाठराखण असताना नारायण राणे, स्मिता ठाकरे, राज ठाकरे यांचा वेगळा गट तयार झाल्याचं दिसत होतं असं अकोलकर लिहितात.
2002 साली सत्यविजय भिसे यांची हत्या झाल्यानंतर राणे यांचा कणकवलीतला बंगला उद्धवस्त करण्यात आला. त्यावेळेस त्यांच्या समाचाराला, सांत्वनाला शिवसेनेचा कोणीही बडा नेता गेला नाही याकडे अकोलकर लक्ष वेधतात आणि राणे तेव्हापासून एकाकी तर पडले नाहीत ना असं तयार होऊ लागल्याचं ते सांगतात.
2004 साली झालेल्या निवडणुकानंतर ही फूट वाढत गेली आणि 2005 साली नारायण राणे यांनी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर आज ते भाजपमध्ये आहेत तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे.
त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे पक्ष स्थापन केला. त्यामुळे 2009 साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्याची झळ पक्षाला बसलीच.
शिवसेनाप्रमुखांनंतरची शिवसेना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना कशी असेल अशीही चर्चा असायची. त्यावर उद्धव यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये उत्तर दिल्याचं दिसतं.
पक्षाची संपूर्ण सूत्रं हातात आल्यावर शिवसेननं काही धाडसी निर्णय घेतल्याचंही दिसून येतं. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणं, युती तोडून पालिकेची निवडणूक लढणं, युतीमध्ये निवडणूक लढवून नंतर वेगळं होणं, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं असे अनेक निर्णय गेल्या सहा वर्षांमध्ये घेतल्याचं दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये न उतरण्याचा ठाकरे यांचा निर्णयही 2019 साली बदलला गेला. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तसेच त्यामुळे ते विधानपरिषदेतही गेले. रिमोट कंट्रोल होण्याऐवजी स्वतः पद स्वीकारण्याची भूमिका पक्षाच्या आजवरच्या कार्यशैलीपेक्षा वेगळी असल्याची जाणवली.
या सहा वर्षांमध्ये भाजपप्रमाणे पक्षरचनेच्याबाबतीत शिवसेनेतही काही बदल झाल्याचं दिसतं. मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत घेतलेली भूमिका आणि काही वक्तव्यं केल्यानंतर ते बाजूला पडल्याचे दिसते.
शिवसेनेच्या जाहीर सभेतून मनोहर जोशी यांना निघून जावे लागल्यावरही उद्धव ठाकरे यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. आज ज्येष्ठ नेते दसरा मेळावा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये दिसत असले तरी नेत्यांची एक नवी पिढी पक्षामध्ये कार्यरत झालेली दिसून येते. हा एक मोठा बदल झाल्याचे दिसते.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बोलताना पत्रकार आणि 'द कझिन्स, ठाकरे' पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी म्हणतात, "उद्धव ठाकरे कदाचित समांतर शक्तिस्थळ तयार होणार नाहीत यासाठी प्रयत्न करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील संघटनेतले केवळ सुभाष देसाई आज त्यांच्यासोबत कार्यरत आहेत. त्याचबरोबर आता नंतर आलेल्या, बाहेरुन आलेल्या लोकांना पक्षात संधी मिळते याबद्दल नाराजी असल्याचेही दिसून येते. या सर्व स्थितीकडे पाहिले तर त्यामुळे पक्षाला भविष्यात हादरेही बसू शकतात."
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकत्र सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर पहिला थोडा काळ जाताच कोरोनाच्या साथीचं संकट सर्वांवर आलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांशी संवाद साधणारे संयमी, संयत नेते अशी प्रतिमा उद्धव यांच्या फेसबूक लाईव्हमधून तयार झाली. परंतु आता तशी टीकाही होऊ लागली आहे.
तिन्ही पक्षांमध्ये वाढती कुरबूर, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांनी सतत नाराजी व्यक्त करणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा घटनांमुळे सरकार निर्णयांकडे, उद्धव यांच्या प्रशासनाकडे माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष असेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








