उद्धव ठाकरे मुलाखतः 'ज्यांना सरकार पाडायचंय, त्यांनी आजच पाडा, मग बघतो मी'

फोटो स्रोत, Twitter/@rautsanjay61
"ज्या कुणाला सरकार पाडायचंय, त्यांनी ते आजच पाडावं. आत्ता ही मुलाखत सुरू असातनाच पाडा. मग बघतो मी," अशा आव्हानाच्या भाषेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (26 जुलै) आज प्रसिद्ध झाला आहे. 'अनलॉक मुलाखत' असं या मुलाखतीला नाव देण्यात आलंय.
आजच्या म्हणजे दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. राज्यातील सरकारचं स्थैर्य, भारत-चीन मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा, राजस्थानमधील घडामोडी इत्यादी मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे.

फोटो स्रोत, SAAMANA SCREENGRAB
मुलाखतीच्या कालच्या भागातील मुद्दे तुम्ही याच बातमीत खाली वाचू शकता. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आज काय म्हणाले, हे मुद्देनिहाय जाणून घेऊया.
'तीन चाकं तर तीन चाकं, एका दिशेनं चालतायेत ना, मग पोटात का दुखतं?'
महाविकास आघाडी काय म्हणतेय, या प्रश्नावर उद्धव ठाकरे अगदी दोन शब्दात उत्तर देत म्हणाले, "व्यवस्थित आहे." मात्र, त्यांनी पुढील प्रश्नावर याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
हे सरकार रिक्षासारखं तीनचाकी आहे असं म्हणतात, असं संजय राऊत म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं, "हो ना, पण हे गरिबाचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरिबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही."
"तीन चाकं तर तीन चाकं... ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्यावेळी एनडीएच्या मिटिंगला गेलो होतो, तेव्हा 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला झुकतं माप?
गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी राज्य सरकारबद्दल नाराजी वर्तवली होती.
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "काँग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. शेवटी असं आहे की, सगळेच निवडणुका लढवून निवडून येत असतात.
जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात. म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, अशं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची ती चूक आहे अशातला भाग नाहीय. तशा अपेक्षा व्यक्त करणं गुन्हा नाहीय."

फोटो स्रोत, Getty Images
पवारसाहेबांशीही चांगाला संवाद आहे, अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
'फेव्हिकॉल लावून बसलो नाहीय, पाडायचं तर पाडा सरकार'
सरकार पाडण्याचा आमचा इरादा नाही, असं देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आले असताना म्हटले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, "मी तर इथे बसलेलोच आहे. त्यांचा इरादा असेल नसेल... काही जण सांगतात की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. माझं म्हणणं, वाट कसली बघताय आता पाडा. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा.
मी काय फेव्हिकॉल लावून बसलेलो नाही. पाडायचं तर पाडा, जरूर पाडा. तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद मिळतोय ना. काही जणांना घडवण्यात आनंद मिळतो. बिघडवायचं असेल तर बिघडवा, मला नाही पर्वा, पाडा सरकार."
काल (26 जुलै) याच मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता. कालच्या भागातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही इथून खाली वाचू शकता. 'अनलॉक मुलाखत' च्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भातील प्रश्नांवर अधिक भर दिला आहे.
आपण सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवडल्यानं विरोधकांना पोटदुखी झाल्याचा टोमणा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून लगावला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत आहे.
त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय,"

फोटो स्रोत, Getty Images
"मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि मुख्य म्हणज ताबडतोब निर्णय घेतोय," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच, "फिरणं आवश्यक आहे. मी नाही म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात. तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्ष दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील अपडेट देतात, हे कितपत योग्य आहे? या संजय राऊत यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांनी जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करताहेत."
यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना पोटदुखी झाल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "कदाचित त्यांची (विरोधकांची) पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत अनेक टोले लगावले आहेत. आधीच्या सरकारमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यावरून विरोधक अनेकदा टोले लगावत असत. तोच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनावर इतका खोलवर अभ्यास करणारे आपण एकमेव मुख्यमंत्री मला दिसताय, असं संजय राऊत म्हणाल्यानंतर उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, "मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा."
कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून सध्या वारंवार केली जातेय. त्या टीकेचीही उद्धव ठाकरेंच्या उत्तरला पार्श्वभूमी आहे.
'मंत्रालयात कमी वेळा गेला, या आरोपात दम नाही'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात कमीवेळा गेल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं होतेय. यासंदर्भातील संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, "मंत्रालय आता बंद आहे हे लक्षात घ्या. मंत्रालयात कमीत कमी गेलो असा जो आरोप होतोय, त्यात काही दम नाही."

फोटो स्रोत, Getty Images
'राजकीय आव्हानांची मला चिंता नाही'
सरकारचा सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला, या काळाकडे तुम्ही कसं पाहताय? या संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, फार विचित्र पद्धतीने गेला.
ते पुढे म्हणाले, "जे सहा महिने गेले ते विविध आव्हानं घेऊन आले होते. ही आव्हानं अजून संपलेली नाहीत. राजकीय आव्हानं ठीक आहेत. त्याची मला चिंता नाही. मी तुम्हाला सांगितलंच आहे की, जनतेचं बळ माझ्यासोबत आहे, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मी या आव्हानाची पर्वा करत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








