उदयनराजे भोसले - शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर लगेच राजीनामा दिला असता

उदयनराजे भोसले ट्वीट

फोटो स्रोत, SAI SAWANT

राज्यसभेत नुकत्याच निवडून गेलेल्या सदस्यांनी काल शपथ घेतली. यामध्ये भाजपातर्फे उदयनराजे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीनंतर आता नव्या चर्चेला आणि पर्यायाने वादाला सुरुवात झाली आहे.

उदयनराजे यांनी इंग्रजीत शपथ घेतल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र यापूर्वीही त्यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतूनच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही चर्चा काहीशी थंडावली.

परंतु उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाही दिल्याचे कालच्या कामकाजाच्या व्हीडिओत दिसते.

मात्र यावर विरोधी पक्षांच्या बाकांवरुन आक्षेपवजा काही टिप्पणी झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे सभागृह नसून हे माझे चेंबर आहे. शपथ वगळता इतर सर्व कामकाजातून वगळले जाईल असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नव्या सदस्यांनी यापुढे हे लक्षात ठेवावे असेही सांगितले.

हा सर्व कामकाजाचा भाग व्हीडिओतून समोर आल्यावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही घोषणा कामकाजातून काढून टाकणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो उदयनराजे यांनी कसा सहन केला असे प्रश्न विचारले जात आहेत.

त्यानंतर भाजपच्या राज्यसभेतील नव्या सदस्यांची बैठक पंतप्रधान मोदी यांनी घेतली. कोरोनाच्या काळातील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे या बैठकीत सर्व सदस्य एकमेकांपासून अंतर राखून बसल्याचे या फोटोत दिसते. यामध्ये उदयनराजे यांना पंतप्रधानांपासून दूर आणि बाजूला बसवल्याचे दिसत असल्यामुळेही त्यांचा पुन्हा अपमान झाल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली.

कोरोना
लाईन

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनीही ट्वीटरवर टिप्पणी करत प्रश्न विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची घोषणा नाही…. जय भवानी जय शिवाजी… असे ट्वीट केले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट करून, "मी शिवाजी महाराजांचा आदर करतो. तसंच भवानी देवीला मानतो. शपथ घेताना घोषणा देऊ नये या नियमाची आणि परंपरेची आठवण करून दिली," असं म्हटंलय.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या कृतीतून शिवाजी महाराजांचा कुठालाही अपमान झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केली आहे.

याआधी शिवाजी महाराजांच्या नावानं खूप राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणाऱ्यातला नाही, राजीनामा तिथल्या तिथंच देऊन टाकला असता. तसं काही झालेलंल नाही. हा प्रश्न नायडूं ऐवजी आक्षेप घेणाऱ्या सदस्याला विचारावा, असं भोसले यांनी म्हटलंय.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांनासुद्धा टोला हाणला आहे. 'ते महान व्यक्ती आहेत,' असं भोसले यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी गेल्या वर्षी एका प्रकट मुलाखतीत उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील त्याचे पुरावे द्यावेत असेही विधान केले होते. त्यावेळेसही हा मुद्दा गाजला होता.

गेल्यावर्षी नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर सर्वपक्षीय खासदारांनी आपल्या दैवताचा, प्रदेशाचा, पक्षप्रमुखांचा तसेच स्थानिक अस्मितांचा वापर घोषणांमध्ये केला होता.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आणि मंत्रिमंडळविस्तारावेळेसही मंत्र्‍यांनी विविध घोषणा दिल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार सूचना देऊनही हा प्राकार सुरू राहिल्याने शेवटी एका शपथेनंतर संतप्त राज्यपालांनी शपथ पुन्हा घ्यायला लावली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीस विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)