You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुकाराम मुंढे यांच्याबाबत सरकारचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांचं मत काय?
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कसं काम केलं किंवा करत आहेत, याबद्दल विविध चर्चा आणि वाद सुरू आहेत.
पण राज्याचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्या मते, "प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे. चर्चेतूनच योग्य मार्ग निघतो."
या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख होण्याचं कारण म्हणजे, तुकाराम मुंढे यानी गुरुवारी(23 जुलै) झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये नागरिकांशी संवाद साधला होता.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
यामध्ये त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. "मिशन बिगिन सुरू झालं, लोकांनी बदल अंगीकारलेले नाहीत. इन्फेक्शन रेट वाढलेला आहे. नियमावली आहे त्याचं पालन झालेलं नाही. 45 दिवसात 2000 पेक्षा जास्त केस. आपण कुठेतरी चुकतोय हे बघायला हवं. नियम परिपूर्ण पद्धतीने पाळले जात नाहीत. लॉकडाऊन लावायचं का कर्फ्यू लावायचं ही वेळ आली आहे," असं मुंढे यांनी म्हटलं होतं.
त्यामुळे तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. नागपूर महापालिकेचा कारभार कुणी पाहावा यावरून चांगलाच वाद आयुक्त आणि राजकीय पक्षांमध्ये रंगलेला दिसून आला.
नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात तर अगदी सुरुवातीपासूनच वाद आहेत. त्यात मुंढे कोणाचेही ऐकत नाही असा आरोप राजकीय नेते सातत्याने करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात जोशींनी म्हटलं, "प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात. महापौरांचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात."
प्रशासनाची जबाबदारी जशी आयुक्त म्हणून आपली आहे, तशीच शहराचा महापौर म्हणून माझीसुद्धा आहे, असे महापौर संदीप जोशी यांचं म्हणणं होतं.
"नागपूरच्या नागरिकांनी ती विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमाच्या कलम 4 मध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत नमूद केलेल्या स्पष्टतेबाबत आपण अवगत आहात, अशी मला अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रशासनाचे दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण कार्य करावे, त्याप्रमाणे आपण वागावे," अशी भावनाही जोशी यांनी व्यक्त केली होती.
फक्त भाजपच नव्हे तर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनीसुद्धा तुकाराम मुंढे यांच्याबाबत तक्रार केली होती.
"मुंढे म्हणजे लोकप्रतिनिधींचे ऐकायचं नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर घरीच डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करायची नाही असा कारभार आहे," असा आरोप विकास ठाकरे यांनी केला होता.
दरम्यान, 20 जून रोजी झालेल्या नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत झालेल्या वादानंतर आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेल्याची घटना घडली होती.
या सगळ्या घडामोडी घडत असताना अजोय मेहता राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव होते.
दरम्यान, बीबीसी मराठीने राज्याचे मेहता यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत मेहता यांना मुंढेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
"तुकाराम मुंढे यांचे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याशी वाद सुरू आहेत. तुम्हाला काय वाटत एकत्रितपणे काम करताना प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना एकमेकांचं समानपणे ऐकलं पाहिजे?" या प्रश्नावर मेहता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
"देशात लोकशाही भक्कम आहे. आपण एकमेकांचे ऐकूनच पुढे जात असतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे. ही परंपरा आहे. मतभेद असावेत ते चांगले असतात. मतभेद म्हणजे मंथन आहे त्यातून अमृतच बाहेर पडतं," असं मत मेहता यांनी मुंढे यांच्याबाबत मांडलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)