You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूर कोरोना व्हायरस : शहरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपूर शहरात 25 आणि 26 जुलै रोजी जनता कर्फ्यू लावला जाणार आहे.
शहराच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना पेशंटच्या संख्येमुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
नागपूर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहिर केलाय. या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.
कोरानाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर कर्फ्यूसह लॉकडाऊन असे १५ दिवस ठेवावे लागेल असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आधी दिला होता.
शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील असं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.
"या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे. या काळात संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. लोकांनी सहकार्य करावं," असं नागपूरचे पोलीस सहआयुक्त निलेश भरणे यांनी म्हटलं आहे.
"लोकांनी आपल्या वागण्यात बदल करावा, तो केला तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असं नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय. लोकांच्या वागण्यात बदल व्हावा, तसंच आपण वागण्यात बदल केला नाही तर मोठा लाकडाऊन लागू शकतो हे लक्षात आणून देण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे," असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलंय.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
नागरिकांना का वाटतं?
नागपुरात सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन हाच एक पर्याय दिसतोय अशी प्रतिक्रिया गौरी पाटील यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, "नागपूरच्या रविनगर, रामनगर, शंकरनगर या चौकांमध्ये तरुण मंडळी तासनतास कुठलेही काम नसताना बसले असतात. रविनगर चौकात तर पंधरा ते वीस तरुणांचा घोळका पोलीस येईपर्यंत रात्री दहापर्यंत तिथंच असतो. नागपुरच्या भाजी बाजारात तर परिसथिती आणखीन बिकट आहे. गोकुळपेठ मार्केट परिसरात दोन कोरोनाबाधित सापडले असताना लोक तिथंच गर्दी करताहेत.
"सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे ये योग्य पद्धतीने लोक करत नाही. मास्क लोक गळ्यावर लावतात आता पोलिसांनी मास्क असून उपयोग नाही, तर लावला नाही तर कारवाई केली पाहिजे. अनेक भागातील महाविद्यालयीन तरुण ट्रिपल सिट बाईकवरुन जाताहेत. कॉलेजच बंद आहेत त्यामुळे हे तरुण विनाकारण फिरताहेत, पण पोलिस कारवाई करत नाहीत. अशी परिस्थिती पाहता सध्याचा जमना कर्फ्यूच नाही तर लॉकडाऊन हे कर्फ्यूसह लावावे अशी मागणी गौरी पाटील यांनी व्यक्त केली आहे."
सततच्या या लॉकडाऊनमुळे काहीही फायदा होणार नाही, तर गरीब आणि सर्वसाधारण माणसाचे फक्त मरणच यातून साध्य होईल अशी प्रतिक्रिया नागपुरचे नागरिक अनित बुटले यांनी दिली आहे.
ते म्हणाले, "जनता कर्फ्यूनंतर कर्फ्यूसह सामान्य माणसांनी जगायचे कसे असा प्रश्न आहे. गेल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांनाही काही मर्यादा आहेत. तीन-तीन महिने लोकांना मदत केल्यावर पुन्हा कोणी गरिबांना मदत करेल असे नाही. त्यामुळे आयुक्त साहेबांनी लॉकडाऊन न करता सकाळी दहा ते पाच याच काळात व्यवहार सुरु ठेवावे, असं काही तरी करावं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)