You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विन्स्टन चर्चिल यांचा भारतीय लोक तिरस्कार का करतात?
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मी शाळकरी वयात विन्स्टन चर्चिल यांच्याबाबत पहिल्यांदा वाचलं होतं. एनिड ब्लायटन यांचं पुस्तक मी त्यावेळी वाचत होते. या पुस्तकातील एक पात्राने चर्चिल यांचा फोटो घराच्या दर्शनी भागात लावलेला असतो. या पात्राची चर्चिल यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते.
मोठी होत गेले, तशी भारतातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती मिळू लागली. माझी इतरांशी याबाबत चर्चा होऊ लागली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश पंतप्रधान असलेल्या चर्चिल यांच्याबाबत भारतातील लोकांचा दृष्टिकोन प्रचंड वेगळा असल्याचं मला जाणवलं. ब्रिटीश साम्राज्याबाबतही अनेक मतमतांतरं होती.
काहींच्या मते, ब्रिटिशांनी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी भारतात रेल्वे आणली. पोस्ट यंत्रणा उभारली. काहींच्या मते मात्र हे सगळं ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी केलं. त्यातून त्यांनी पैसे लुटले आणि भारताला गरिबीत ढकललं.
माझे आजोबासुद्धा याबाबत खूप उत्साहाने चर्चा करायचे. 'क्रूर ब्रिटिशां'विरोधातल्या लढ्यात आपण कसे सहभागी झालो होतो, हे ते उत्साहाने सांगायचे.
पण स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत आता भारतात खूप काही बदललं आहे. भारतीयांची एक नवी पिढी आता आली आहे. जगातील आपल्या स्थानाबाबत या पिढीला आत्मविश्वास आहे.
ब्रिटीश साम्राज्याच्या इतिहासातील काळ्या आठवणींबाबत व्यापक ज्ञान आणि माहिती आपल्याला का नाही, याबाबत ही पिढी प्रश्न विचारत आहे.
बंगालमधील दुष्काळाचं विस्मरण का?
पश्चिम बंगालमध्ये 1943 साली पडलेला भीषण दुष्काळ हे त्याचंच एक उदाहरण.
या दरम्यान सुमारे तीस लाख लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. हा आकडा दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटीश सैनिकांच्या जीवितहानीपेक्षा सहा पटीने मोठा आहे.
परंतु, दरवर्षी युद्धाचे आणि त्यातील विजय-पराजयांचे स्मरण होत असताना, त्याच काळात ब्रिटीशशासित बंगालमध्ये आलेल्या या आपत्तीला आपण पूर्णपणे विसरलो आहोत.
पण ते काळेकुट्ट दिवस पाहिलेल्या लोकांना आजही त्या आठवणी छळताना दिसतात. नदी किनाऱ्यावर, शेतांमध्ये पडलेले मृतदेह रानटी कुत्रे आणि इतर जनावरांकडून खाल्ले जायचे. इतक्या मोठ्या संख्येने येत असलेल्या मृतदेहांचा अंत्यविधी करायलाही कुणी नसल्याचं लोकांनी पाहिलं आहे.
या दुष्काळातून वाचलेल्या लोकांनी अन्नाच्या शोधात गावातून बाहेर पडून शहर गाठलं होतं.
"प्रत्येक जण हाडाच्या सापळ्यासारखा बनला होता. अंगावरची कातडी फक्त नावालाच उरली होती," ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांना ते दिवस अजूनही ठळकपणे आठवतात. त्यावेळी ते आठ वर्षांचे होते.
ते सांगतात, "लोक ओक्साबोक्शी रडायचे. ते लोकांना तांदूळ धुतलेलं पाणी मागत फिरायचे. कारण आपल्याला तांदूळ मिळणार नाही, हे सर्वांनाच माहीत होतं. ज्याने लोकांचं ते रडणं-ओरडणं पाहिलंय, तो ते दृश्य कधीच विसरू शकत नाही."
1942 मध्ये वादळ आणि त्यानंतर आलेल्या पुरानंतर बंगालमध्ये दुष्काळ आणि उपासमारीचं साम्राज्य पसरलं. पण या संकट काळात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेली भूमिका परिस्थिती आणखी बिकट बनवण्यास कारणीभूत ठरल्याचे आरोप करण्यात येतात.
युद्धकाळात भारताला धान्य निर्यात करण्यास नकार
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील इतिहास तज्ज्ञ यास्मीन खान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. म्यानमारपासून जपानी आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे अंमलात आणलेल्या 'नकार धोरणा'चा (Denial Policy) त्या उल्लेख करतात.
"या धोरणामागची कल्पना अशी होती की, पिकांसह गरजेच्या सर्व गोष्टी नष्ट करायच्या. त्यामध्ये धान्याच्या बोटींचाही समावेश होता. जेणेकरून जेव्हा जपानी सैन्य बंगालमध्ये प्रवेश करेल, तेव्हा त्यांना पुढे आक्रमण करण्यासाठी पुरेशी संसाधनं उपलब्ध होणार नाहीत. या धोरणामुळे बंगालच्या हालाखीत भर पडली."
त्या काळी भारताचं प्रशासन सांभाळणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी याबाबत काही डायऱ्यांमध्ये लिहिलं आहे. युद्ध काळात ब्रिटनमधील अन्नधान्याचा साठा संपण्याच्या भीतीने चर्चिल सरकारने भारतात धान्य निर्यात करण्याबाबतची मागणी फेटाळून लावल्याचं त्यांनी लिहिलं आहे. भारतातील स्थानिक नेते या समस्येतून मार्ग काढू शकतील, असं त्यावेळी चर्चिल यांना वाटत होतं.
या नोंदींमधून इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांचा भारताबाबतचा दृष्टिकोनही कळून येतो.
दुष्काळ आपत्ती निवारणसंदर्भातील एका बैठकीत भारताचे गृहसचिव लिओपोर्ड अॅमेरी यांनी काही नोंदी केल्या होत्या. "भारतीय लोक एकामागून एक मुलांना जन्म घालतात, त्यामुळे त्यांना आपण पाठवलेली मदत अपुरी पडेल," असं चर्चिल यांनी म्हटल्याची नोंद यामध्ये आहे.
पण दुष्काळ पडण्याचं खापर आपण चर्चिल यांच्यावर फोडू नये, असं खान यांना वाटतं.
त्यांच्या मते, "त्यांच्याकडे क्षमता असूनही त्यांनी पावलं उचलली नाहीत, असं आपण म्हणू शकतो. त्यांनी भारतीयांऐवजी युरोपीयन लोकांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिलं, असाही आरोप केला जाऊ शकतो. पण त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्यात लाखो सैनिकही सेवा बजावत होते, हेही तितकंच खरं."
युकेमधील काहींच्या मते, चर्चिल यांनी भारताबाबत चुकीचं वक्तव्य केलं असेल. पण त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युद्धाच्या परिस्थितीमुळे मदत पुरवण्यात विलंब झाला.
या काळातच उपासमारीने लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.
अर्चिबाल्ड वॅव्हेल त्यावेळी भारतात व्हाईसरॉय म्हणून काम पाहायचे. त्यांनी बंगालच्या दुष्काळाबाबत काही नोंदी केल्या होत्या.
त्यांच्या मते, ब्रिटीश राजवटीतील सर्वात मोठ्या आपत्तीपैकी एक म्हणजे बंगालचा दुष्काळ. त्यामुळे भारताचं झालेलं नुकसान आकड्यांमध्ये मोजता येणार नाही.
त्याकाळी जे काही घडलं त्याबाबत ब्रिटीश सरकारने पुढे येऊन माफी मागावी, अशी सौमित्र चॅटर्जी यांची अजूनही अपेक्षा आहे.
युकेमधील अनेकजण सुद्धा ब्रिटीश साम्राज्य आणि त्यांच्या नेतृत्वाचा वसाहतवादादरम्यानचा वारसा काय, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
ब्लॅक लाइव्हज मॅटर्सदरम्यान चर्चिल यांच्या पुतळ्याची विटंबना
गेल्या महिन्यात ब्लॅक लाइव्हज् मॅटर्स चळवळीदरम्यान एका निदर्शनात चर्चिल यांच्या सेंट्रल लंडनमधील पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
पुतळे उद्ध्वस्त करणं, त्यांची विटंबना करणं, याला माझा पाठिंबा नाही, असं भारतीय इतिहास तज्ज्ञ रुद्रांशू मुखर्जी म्हणतात.
"पण पुतळ्याखालील भागात पूर्ण इतिहास लिहिला जावा. विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धाचे हिरो असले तरी बंगालमध्ये 1943 मध्ये लाखो लोकांच्या मृत्यूसाठी ते कारणीभूत असल्याची माहितीही तिथं लिहिली जावी. याबाबत ब्रिटनने भारताचं प्रचंड नुकसान केलं आहे," असं मुखर्जी यांना वाटतं.
इतिहासातील घटनांकडे वर्तमानाच्या चष्म्यातून पाहिल्यास जगात कुणीच हिरो नसेल.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरसुद्धा कृष्णवर्णीयांबाबत भेदभाव केल्याचे आरोप आहेत. पण त्यांच्या जीवनातील सत्य स्वीकारल्याशिवाय पुढे जाणं आपल्यासाठी कठीण आहे.
माझ्या बालपणी एनिड ब्लायटन मला आदर्श वाटायचे. पण त्यांच्यावरही वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी असल्याबाबत आरोप करण्यात आले आहेत.
एक प्रौढ व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टींकडे मी आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकते. त्यांच्या जुन्या आठवणींवर मला आता माहीत झालेल्या गोष्टींनी काही फरक पडणार नाही.
पण मी माझं मत माझ्या मुलांवरही लादणार नाही. समानतेच्या जगातील कथा आपल्या पद्धतीने वाचण्याचा, आपली मतं बनवण्याचा त्यांना अधिकार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)