पुण्यातील मराठी बाईने बांधलेली जुन्या दिल्लीतील ही मशीद माहिती आहे का?

    • Author, अमृता कदम आणि नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पुण्यातून एक ब्राह्मण महिला दिल्लीला येते काय... दिल्लीतल्या सर्वांत शक्तीशाली गोऱ्या अधिकाऱ्याची ती 'बेगम' होते काय... तिच्या नावाने दिल्लीत मशीद काय बांधली जाते... हे सगळं थोडंसं विचित्र वाटत असलं तरी असंच घडलं आहे. जुलै 2020मध्ये दिल्लीमध्ये एका मशिदीचा घुमट पडला आणि हा इतिहास खरवडला गेला.

19 जुलै 2020ला पहाटे दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. या पावसानं जुन्या दिल्लीतील एका मशिदीचा घुमट कोसळला. पावसात अनेकदा जुन्या इमारतींचं नुकसान होतं.

जुन्या दिल्लीतील चावडी बाजार परिसरातल्या अरुंद गल्ल्यांमध्ये, हौज काझी चौक परिसरात लाल विटांनी बांधलेली ही मशीद...19 व्या शतकातली ही मशीद 'रंडी की मशीद' म्हणून ओळखली जायची. आजही या परिसरात बरेचजण या नावानेच ओळखतात.

शिवराळ भाषेत वापरल्या जाणाऱ्या या शब्दाचा अर्थ वेश्या असा होतो. वेश्येच्या नावानं मशीद कशी, म्हणून अनेकांच्या भुवयाही उंचावू शकतात. पण या जुन्या काळात ही मशीद 'रंडी की मशीद' म्हणूनच प्रसिद्ध असली तरी तिचं मूळ नाव 'मुबारक बेगम की मशीद' असं होतं.

1823 साली बांधण्यात आलेली ही मशीद मुबारक बेगमनं बांधली की तिच्या स्मरणार्थ बांधण्यात आली, हे स्पष्ट नाहीये. मात्र, मशिदीच्या मौलवींनी बीबीसी मराठीशी बोलताना दावा केला की, "ही मशीद मुबारक बेगम यांनीच बांधलीय. त्या अत्यंत भल्या महिला होत्या."

मशीद नेमकी कुणी बांधील, याबाबत दुमत असलं तरी, एक मात्र खरं की, ज्या काळात बादशाह, त्यांच्या पत्नी किंवा अमीर-उमराव हेच केवळ मशिदींची उभारणी करायचे, त्याकाळात एका गणिकेनं मशीद बांधणं किंवा तिच्यासाठी मशीद बांधून घेणं दोन्ही गोष्टी विशेषच होत्या.

त्यामुळेच मुबारक बेगम हे त्याकाळी प्रस्थ असणार हे उघड होतं... त्यांचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. पण जो आहे, त्यातून त्यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी समोर येतात. त्यांपैकीच एक म्हणजे नाव मुबारक आणि वास्तव्य दिल्लीतलं असलं तरी या बाई मूळच्या हिंदू होत्या. मराठी होत्या...आणि त्यातही त्या मूळच्या पुण्याच्या होत्या.

काही ठिकाणी त्यांचं नाव चंपा असल्याचं म्हटलं आहे. पण त्याबद्दलही फारशी माहिती उपलब्ध नाही. मग ही चंपा किंवा जे काही नाव असेल, ती मुबारक बेगम झाली कशी? पुण्याहून या मुलीने थेट दिल्ली कधी गाठली आणि ज्या जुन्या दिल्लीत मुघल संस्कृतीच्या खुणा पावलोपावली आढळतात तिथे त्यांच्या नावे मशीद कशी उभी राहिली?

मुबारक बेगम यांचं आयुष्य

मूळ हिंदू असलेल्या मुबारक यांनी इस्लामचा स्वीकार केला. बीबी महरतून मुबारक-उल-निसा-बेगम असं भारदस्त नाव असलेल्या या बेगम 'जनरल बेगम' या सुटसुटीत नावानंच ओळखल्या जायच्या. त्याचं कारण म्हणजे त्यांनी दिल्लीचा पहिला ब्रिटीश रेसिडन्ट जनरल डेव्हिड ऑख्टरलोनी याच्याशी विवाह केला होता. (काही इतिहासकार त्या डेव्हिडच्या अंगवस्त्र असल्याचंही सांगतात.)

जनरल डेव्हिड हे अकबर शाह दुसरा याच्या काळात दिल्लीमध्ये रेसिडन्ट होते.

नातं काहीही असलं तरी त्यांचं जनरल डेव्हिडच्या आयुष्यातलं स्थान हे अतिशय महत्त्वाचं होतं. मौलवी जफर मसान यांनी 'द हिंदू'मध्ये मुबारक बेगम यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, की मुबारक बेगम या जनरल डेव्हिड यांच्या अतिशय आवडत्या होत्या.

त्यांच्या 13 बायकांपैकी त्या एक होत्या आणि त्यांच्या धाकट्या मुलाची आईही होत्या. त्यांचा विवाह झाला होता. वयानं डेव्हिड यांच्यापेक्षा लहान असल्या तरी नात्यातला त्यांचा अधिकार जास्त असावा. म्हणूनच जनरल डेव्हिडने त्यांच्यापासून झालेल्या आपल्या मुलांना मुस्लिम पद्धतीनं वाढविण्याचा निर्णय घेतला. ती स्वतः लोकांना निझार (भेटवस्तू) आणि खिलत (मानाचे पोशाख) वाटायची.

दिल्ली विद्यापीठातील इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात, "मुबारक बेगमचा ब्रिटीश आणि मुघल दोन्हीही गट तिरस्कार करत.

मुबारक बेगम स्वत: लेडी ऑख्टरलोनी म्हणवून घेत, जे ब्रिटिशांना आवडत नसे आणि त्या स्वत:ला 'कुदासिया बेगम'ही (सम्राटाची आई) म्हणवून घेता, जे मुघलांना आवडत नसे. ऑख्टरलोनी यांनी बांधलेल्या बागेला पुढे जेव्हा मुबारक बाग नाव दिलं गेलं, तेव्हा त्या बागेत मुघल जात नसत."

पण ती आपल्या थाटातच राहिली. 'रंडी' किंवा 'वेश्या' हा शब्द आपल्या आताच्या व्यवस्थेमध्ये मानहानीकारक आहे. पण मुघल काळात या गणिकांना सांस्कृतिक वर्तुळात तितक्या उपेक्षेनं पाहिलं जायचं नाही.

मुबारक बेगमही त्याकाळी या वर्तुळातलं प्रसिद्ध नाव असल्याचं म्हटलं जातं. दिल्लीमधला शेवटचा सर्वांत मोठा मुशायरा हा मुबारक बेगम यांच्या हवेलीत भरला होता. या मुशायऱ्याला 40 शायर उपस्थित होते, त्यामध्ये मिर्झा गालिब यांचाही समावेश होता.

'व्हाईट मुगल' डेव्हिड ऑख्टरलोनी

सर डेव्हिड ऑख्टरलोनी यांचा जन्म 1758 साली बॉस्टन इथं झाला होता. त्यांच्याबद्दल ब्रिटानिका इन्सायक्लोपिडियामध्ये माहिती सापडते.

1777 साली ते भारतात आले होते. लॉर्ड लेक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कोइल, अलिगड आणि दिल्ली इथं लढायांमध्ये भाग घेतला होता. 1803 साली त्यांची दिल्लीमध्ये रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. पुढच्याच वर्षी त्यांना मेजर जनरलपदावरती बढती मिळाली.

होळकरांनी दिल्लीवर हल्ला केला तेव्हा दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. नेपाळशी झालेल्या लढाईमध्ये तसेच इतर अनेक लढायांमध्ये त्यांनी इंग्रजांची बाजू सांभाळली होती. ऑख्टरलोनी यांचा 1825 साली मृत्यू झाला.

डेव्हिड ऑख्टरलोनी यांनी दिल्लीत राहिल्यानंतर मुघलांची इंडो-पर्शियन संस्कृती पूर्णपणे स्वीकारली होती. त्यामुळं ऑख्टरलोनी यांना 'व्हाईट मुघल' म्हणत, असं अनिरुद्ध देशपांडे सांगतात.

अँग्लो-नेपाळी युद्ध, अँग्लो-मराठा युद्धावेळी ऑख्टरलोनी प्रत्यक्ष हजर आणि सहभागी होते, असंही देशपांडे सांगतात.

आपल्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न?

'वुमेन इन मस्जिद' या पुस्तकाचे लेखक झिया उस सलाम यांनी मुबारक बेगमबद्दल थोडी वेगळी माहिती दिली.

"मूळची गणिका असलेली ही मुलगी आपल्या भूतकाळातून बाहेर पडून उच्चभ्रू समाजानं आपल्याला स्वीकारावं यासाठी धडपडत होती. त्यासाठी त्यांनी आधी ब्रिटीश जनरल डेव्हिडसोबत लग्न केलं. त्याचं निधन झाल्यानंतर त्यांनी एका मुस्लिम सरदाराशी लग्न केलं," असं झिया सलाम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"मशीद बांधणं हादेखील आपल्याला उच्चभ्रू समाजानं स्वीकारावं, याच प्रयत्नांचा भाग होता. ती मशीद मुबारक बेगम यांनी बांधून घेतली, असा एक विचारप्रवाह आहे. दुसऱ्या एका मतप्रवाहानुसार जनरल डेव्हिड यांनी मुबारक बेगमच्या नावे ही मशीद बांधून घेतली. पण ही मशीद मुबारक बेगम यांनीच बांधून घेतली आहे. त्यासाठीचा पैसे डेव्हिड यांनी दिले."

मध्ययुगीन भारतात अनेक मशिदींची उभारणी बायकांनी केली आहे. त्यांनी मदरसेही बांधले आहेत. दिल्लीतील फतेहपुरी मशीद ही शाहजहानच्या बायकोनं बनवून घेतली होती. ती बादशाहची बायको होती आणि मुबारक बेगम या गणिका होत्या. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असं झिया यांनी आवर्जून नमूद केलं.

कशी आहे मशिदीची रचना?

'मस्जिद मुबारक बेगम' अशी पाटी आता मशिदीच्या प्रवेशद्वारावार झळकताना दिसते.

मूळ मशीद दुमजली आहे. खालच्या मजल्याला आता चौथऱ्याचं रूप आलंय. या खालच्या मजल्यावर दुकानं आहेत. मशिदीच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी निमुळता रस्ता आहे. तिथून वर गेल्यावर पहिल्या मजल्यावर मशीद आहे. मशिदीत प्रार्थनागृह आणि वर एकूण तीन घुमट आहेत. याच तीनपैकी एक घुमट दिल्लीतल्या रविवारच्या पावसानं कोसळला आहे.

संपूर्ण मशीद लाल वालुकाश्माचा वापर करून बांधण्यात आली आहे. रविवारी कोसळलेल्या घुमटाच्या काही भाग पाहिल्यास आता मातीसुद्धा दिसून येते.

1823 साली मशीद बांधण्यात आल्यानं आता 200 वर्षं पूर्ण होतील. आताची घटना वगळल्यास मशिदीबाबत यापूर्वी कुठली दुर्घटना घडल्याचं दिसून येत नाही. आता घुमटाचा कोसळलेला भाग वगळल्यास मशीद जशीच्या तशी दिसून येते.

प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात त्याप्रमाणे, जुन्या दिल्लीतील हौज काझी भागातील लोक आजही सहजपणे मुबारक बेगम मशिदीला 'रंडी की मस्जिद' म्हणतात. त्यात कुणाला वावगं वाटत नाही. मुबारक बेगम मशिदीला वापरासाठी तो परवलीचाच शब्द बनलाय. ते फार पूर्वीपासून तसं म्हणत आलेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)