कोरोना व्हायरस पुणे : अजून कोव्हिड-19 चा पीक नाही, लॉकडाऊन अत्यंत योग्यच – डॉ. तात्याराव लहाने

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांहून अधिक झालीये, तर आतापर्यंत 12,276 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज जवळपास 8 हजार रुग्णांची भर पडते आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना. दुसरीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात मात्र संख्या वाढतेय.

महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे का? राज्यातली पहिली लाट संपली? पुन्हा एक स्पाईक येईल? कोव्हिड-19 विरोधातील लस कधीपर्यंत येऊ शकेल यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवर बीबीसी मराठीसाठी मयांक भागवत यांनी महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली.

राज्यात दररोज 8 हजारपेक्षा जास्त कोरोनारुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या तब्बल 9 हजारापर्यंत पोहोचली. या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहाता?

कोव्हिड-19 एक संसर्गजन्य आजार आहे. महाराष्ट्रात रोज 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचा एकमेकांना संसर्ग होणारच. या संसर्गातून लोकांना ही लागण होत आहे. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे. लोकसंख्येच्या मानाने ही लागण खूप कमी प्रमाणात आहे.

लॉकडाऊनचा फायदा झाला. त्यामुळे सद्य स्थितीत आपल्याला 8 हजारावर रुग्ण सापडत आहेत. नाहीतर ही संख्या खूप मोठी असती. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा मुंबईतील दर ५२ दिवस आहे. याचा अर्थ आपण मुंबईत प्लॅटूवर येत आहोत. केसेस खूप वाढत नाहीत. बाकी ठिकाणी केसेस खूप वाढतायत.

एकीकडे मुंबईत केसे प्रचंड वाढल्या. आता त्या कमी होताना दिसतेय. दुसरीकडे पुण्यासारखं शहर आहे. ज्याठिकाणी केसेस वाढतायत. मुंबईत आपण नियंत्रणात आणू शकलो. मात्र पुण्यात परिस्थिती हाताबाहेर जाते का?

पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव आणि मुंबई लगतच्या शहरात केसेसची संख्या नक्कीच जास्त आहे. पुण्यात सुरुवातीला रुग्ण आढळले. पण, एमएमआर (MMR) भागातील शहरात मुंबईनंतर एक महिन्यानंतर रुग्ण दिसू लागले. त्यामुळे त्याठिकाणी जास्त प्रमाणात केसेस आढळून येत आहेत. पुण्यात अजूनही कोव्हिड-19 चा पीक आलेला नाही.

मुंबईत ज्या पद्धतीने फास्ट केसेसे वाढल्या. तशा पुण्यात वाढल्या नाहीत. त्यामुळे पुण्यात हळूहळू केसेस वाढत आहेत. त्याठिकाणी देखील पीक येईल त्यानंतर प्लॅटू ( रुग्ण वाढीची संख्या स्थिरावणे) होईल. त्यामुळे पुणे, ठाणे या परिसरात करण्यात आलेलं लॉकडाऊन अत्यंत योग्य आहे. यामुळे आजार पसरण्यावर नियंत्रण येईल.

मुंबई लगतच्या शहरात साथ उशीराने पसरल्याने त्या ठिकाणी थोडं उशीरा नियंत्रण मिळेल. जळगाव, औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही साथ उशीरा सुरू झाल्याने नियंत्रणात येण्यासाठी थोडा वेळ लागेल. याला एक महिना लागू शकेल.

प्रत्येक संसर्गजन्य आजाराला स्पाईक (रुग्णसंख्या वाढणे) येत असतो. तज्ज्ञांचं मत आहे की, एकदा स्पाईक आल्यानंतर पुन्हा एक स्पाईक येईल. तशी परिस्थिती तुम्हाला वाटते? कारण सद्य स्थितीत आपण लॉकडाऊनमध्ये आहोत.

सद्य स्थितीत राज्यात प्रायमरी (पहिला) स्पाईक सुरू आहे. साथीच्या आजारांमध्ये दुसरा स्पाईक येतो असं म्हटलं जातं. सद्य स्थितीत दुसऱ्यांदा स्पाईक आलेला नाही. राज्यात पहिला स्पाईकच सुरू आहे. पहिला स्पाईक जेव्हा खाली जातो तेव्हा दुसरा स्पाईक येत असतो. तो येत नाही असं निश्चित नाही.

काही विषाणू थंडीत पसरतात. पण कोरोना थंड आणि उष्ण तापमानात सारख्या प्रमाणात पसरतो. आपण चीनमध्ये पाहिलं वुहानमध्ये पुन्हा स्पाईक आला पण फार छोटा होता. जर तसं झालं तरी पुन्हा छोटा स्पाईक येईल मोठा येणार नाही. पण, सद्यस्थिती पाहता जर कोरोनाविरोधात लस किंवा औषध तयार झालं तर स्पाईक येणार नाही.

केरळने मान्य केलं की, राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं. केंद्र सरकार म्हणतं की, लोकल ट्रान्समिशन झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं असेल?

हॉटस्पॉटमध्ये लोकल लेवलला ट्रान्समिशन असू शकतं. कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये ज्या ठिकाणी एकही व्यक्ती नाही. त्याठिकाणी कोणी गेलं तरी त्याला इंन्फेक्शन होतं. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. स्थानिक भागात झालेलं ट्रान्समिशन हे त्याच भागात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन झालंय.

तुम्हाला काय वाटतं कधी पर्यंत भारतात कोव्हिड-19 विरोधात लस बाजारात येईल? तोपर्यंत केसेस वाढत राहतील?

ऑक्सफर्डच्या लसीमध्ये पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट सहभागी आहे. भारतामध्ये ती लस सुरू होणार आहे. कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे याविरोधात लस येण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर उजाडेल. त्यापूर्वी याविरोधात लस तयार होईल असं वाटत नाही. याचे सर्व ट्रायल करावे लागतील. दिवाळी किंवा दिवाळी नंतर लस येण्याची शक्यता आहे.

मुंबईत प्लॅटू झालाय. म्हणजे साथ नियंत्रणात आली आहे का? सामान्यांचा प्रश्न आहे की लोकल ट्रेन सुरू करणार का नाही?

साथ नियंत्रणात आली असं आजतरी निश्चित म्हणता येत नाही. मुंबईतील केसेस प्लॅटू (वाढ स्थिरावली) झाल्या आहेत. त्यामुळे साथ नियंत्रणात येत आहे असं निश्चित म्हणता येईल.

आपण पहातोय मुंबईत लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आलाय. मात्र ट्रेनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हे सुरू झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण, किती काळ आपण असं बंद ठेवणार. व्यवहार सुरू करणं सरकारला क्रमप्राप्त आहे. आता ते 15 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्टला सुरू होतात हे सांगता येत नाही. पण ते सुरू करावे लागतील.

भारतात लोकांना हक्काची जाणीव आहे. पण कर्तव्याची नाही. केरळमध्ये सर्वांना सांगितलं घरात रहा, लोकं घरात राहीले. आपल्याकडे लोकांना सांगितलं मास्क लावा. तर लोकं म्हणतात मला काहीच होणार नाही.

हा लॉकडाऊन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी होता. जर लोकांनी शिस्त पाळली तर ट्रेन आणि बस सुरू करून काहीच फरक पडणार नाही. पण, लोक एकमेंकावर तुटून पडले. तर निश्चित नुकसान होईल.

हा व्हायरस असेपर्यंत सोशल डिस्टंसिंग पाळलं, मास्क वापरला तर या सर्व गोष्टी सुरू होतील.

मुंबईच्या लोकलमध्ये सोशल डिस्टंसिंग शक्य नाही. मग असा विचार कसा करावा?

सद्यस्थितीत ट्रेनमध्ये लोकांची संख्या नियंत्रणात करण्यात आली आहे. लोकांनी स्वयंशिक्त पाळावी. काठी घेवून शिक्त लावायची गरज नाही. आता हा आजार तरूणांनाही होतोय. आता ट्रेनमध्ये शिस्त पाळली जात आहे. अशीच शिस्त पुढे पाळली तर अडचण होणार नाही.

कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात केसेस वाढतायत. या भागात पुरेशी आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे असं झालं?

रुग्ण वाढणं आणि आरोग्य व्यवस्थेचा थेट संबंध नाही. हा आजार लोकांमुळे वाढला. प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर राज्यभर पसरला. जिल्ह्या-जिल्ह्यात गेला. या भागात पहिली लाट उशीरा आली. या भागात सोयी-सुविधा आहेत. पण, स्पेशल सुविधा नाहीत. मुंबईजवळ असल्याने त्या ठिकाणच्या लोकांनी मोठ्या सुविधा निर्माण केल्या नसाव्यात. आयसीयू कमी पडतायत. ते हळूहळू निर्माण होतील. मुंबईतही आयसीयू कमी पडले ते आपण तयार केले.

तुम्ही म्हणाला होतात आता ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आत्तापर्यंत या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष दिलं गेलं नव्हतं. हेच कारण आहे की कोव्हिड-19 सारखा आजार पाहता ग्रामीण आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल?

प्राथमिक आणि सेंकंडरी केअर ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने झाली तर शहरातील टर्शरी केअरवर दबाव येणार नाही. म्हणूनच प्राथमिक आरोग्यसेवा ग्रामीण भागात बळकट करावी लागेल. ही आरोग्यव्यवस्था बळकट केल्याशिवाय आपल्याला शहरातील आरोग्यसुविधेवर पडणारा भार कमी करता येणार नाही. आपण एका महामारीतून जातोय. याला तोंड देण्यासाठी आपल्याला आरोग्यव्यवस्था गावापासून शहराकडे तयार करावी लागेल.

तुम्ही आयुष समितीवर आहात. आयुर्वेदाची औषध घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते का? कारण या औषधांनी कोव्हिड बरा होत नाही.

कोव्हिड-19 या विषाणूवर एकही औषध नाही. आयुर्वेदीक औषध घेतल्याने ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यांना आजार झाला तरी सौम्य स्वरूपाचा होतो. सायटोकाईन स्टॉर्ममुळे होणारे मृत्यू होत नाहीत.

आपण हळद घालून दुध पितो. तुळशीचा काढा किंवा आर्सेनिक अल्बम सारखी होमियोपॅथी औषधं आपल्या देशात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी म्हणून वापरली जात होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आजार झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असेल. पडसं, खोकल्यासारखा झाला तर नुकसान होणार नाही. त्यामुळे ही औषधं निश्चित उपयोगी आहेत.

या औषधांमुळे प्रतिकारशक्ती निर्माण होईल. पण एक दिवसात नाही. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या, ग्रिन-टी घ्या, घसा स्वच्छ ठेवावा. ज्यामुळे पुढच्या अडचणी येणार नाही. ही औषधं इम्युनिटी बूस्टर आहेत.

सरकार रुग्णांची संख्या लपवतंय. टेस्ट कमी प्रमाणात करण्यात येत आहेत, असा आरोप होतोय. याबाबत तुमचं मत काय?

महाराष्ट्राएवढं पारदर्षक सरकार कोणतंही नाही. आपल्याकडे आयसीएमआरच्या प्रत्येक मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यात करण्यात आल्या. रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रश्न नाही. टेस्ट केलेल्यांपैकी 70 टक्के रुग्ण निगेटिव्ह येत आहेत. मृत्यूचे आकडे लपवण्यात आले नाहीत. मध्यंतरी मृत्यूंमध्ये अचानक वाढ झाली. याचं कारण म्हणजे काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आकडे भरले नाहीत.

आपण आयसीएमआरचे आकडे मानतो. आपली माणसं डाटा भरायला उशीर करतात. त्यामुळे आकडे भरले नव्हते. ते लपवले कधीच नव्हते. मुख्यमंत्री सर्व गोष्टी पारदर्शक ठेवण्याची सूचना वेळोवेळी देतात.

याच्या पुढे आणखी गोष्टी अनलॉक करायच्या असतील तर काय करावं लागेल?

आपल्याला अनलॉक करत जावं लागेल. किती दिवस घरी बसणार. प्रत्येक जण आता कंटाळला आहे.

औरंगाबादला इंडस्ट्री सुरू केल्यानंतर चिखलठाणा परिसरात मोठ्या प्रमाणावर लागण झाली. फॅक्ट्रीत राहणारे लोकं असतील तर सुरू करा असं सांगण्यात आलं होतं. पण, तसं झालं नाही.

सरकारने कायदा सांगितला आणि लोकांनी पाळला नाही तर धोका सर्वांना आहे. केसेस वाढल्या तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल. आपले लोक काळजी घेत नाहीत. खोटा आत्मविश्वास आहे, मला काही होणार नाही. असा आत्मविश्वास नडतो.

त्यामुळे केसेस वाढत आहेत का नाही हे पाहून हळूहळू लॉकडाऊन उघडणं शक्य आहे. तो एकदाच उघडणं कठीण जाणार आहे. मुंबईत काही गोष्टी सुरू केल्या. मात्र संख्या वाढली नाही. असं पाहून एक-एक गोष्ट सुरू केली जाईल.

तज्ज्ञांच मत आहे की, हर्ड इम्युनिटी किंवा लस हा एकच पर्याय आहे. तुम्हाला काय वाटतं?

लस आल्यानंतर हा आजार जाईल. पण, लस आली नाही तर हर्ड इम्युनिटी हा एक पर्याय आहे. काही तज्ज्ञ म्हणतात 100 टक्के जनतेला याची लागण झाली पाहिजे. काहींच मत 80, तर काही 60 टक्के म्हणतात.

अशा स्वरूपाचा आजार आपल्याकडे पहिल्यांदाच आल्याने किती लोकांना याची लागण झाली तर हर्ड इम्युनिटी येईल हे आता माहिती नाही. पण, हर्ड इम्युनिटी आल्यानंतर हा आजार साध्या फ्लूसारखा राहून जाईल. त्यामुळे होणारे मृत्यू होणार नाहीत.

सध्या आपला मृत्यूदर 3 टक्के आहे. तो कमी झाला पाहिजे. आजाराची भीती मृत्यूमुळे आहे. त्यामुळे मृत्यूदर शून्यावर आणण्याचं लक्ष्य असलं पाहिजे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)