You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: चला हवा येऊ द्या, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांचं शूटिंग कसं सुरू आहे?
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रिपीट्स बंद, ओरिजिनल सुरू असं म्हणत 13 जुलैपासून वेगवेगळ्या चॅनेल्सवर मालिकांचे नवीन भाग दाखवणं सुरू झालं. प्रत्येक चॅनेलचा प्रोमो ही सुरूवात कशी खास आहे, हे सांगणारा होता.
स्वाभाविक होतं...एक नाही, दोन नाही जवळपास शंभर दिवसांच्या गॅपनंतर या मालिका सुरू झाल्या होत्या. कोरोनामुळे 19 मार्चपासून शूटिंग थांबले होते. बँक एपिसोड संपल्यानंतर हिंदी-मराठी चॅनेलवर जुन्याच मालिका पुन्हा दिसायला लागल्या. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन वाढत गेला, तसतसं शूटिंग कधी सुरू होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
एकीकडे लांबलेला लॉकडाऊन आणि दुसरीकडे मनोरंजन विश्वाचं केंद्र असलेल्या मुंबईतच कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या यामध्ये या इंडस्ट्रीचं आर्थिक गणित कसं सांभाळायचं, हा प्रश्न होता. पण 'मिशन बिगीन अगेन' म्हणत उद्धव ठाकरे सरकारनं लॉकडाऊन संदर्भातले काही नियम शिथील करायला सुरुवात केली. मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगलाही परवानगी देण्यात आली...पण काही नियम आणि अटींसह.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मालिकांचं शूटिंग सुरू झालं. पण आता आपल्याला कोरोनासोबत बराच काळ राहायचंय म्हणजे काय हे सध्या टीव्ही इंडस्ट्री अनुभवत आहे.
कोरोनामुळे पडद्यामागचं चित्र नेमकं कसं बदललं आहे? अनेक माणसांनी गजबजलेल्या सेटवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी घेतली जात आहे? मनोरंजन विश्वातलं हे न्यू नॉर्मल नेमकं आहे कसं? त्यातून निर्माण झालेल्या संधी आणि आव्हानं काय आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोरोनाला दूर ठेवणं हे सध्याच्या घडीला सर्वांत मोठं आव्हान असल्याचं शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसातच लक्षात आलं. स्टार प्लसवर सुरू असलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा लीड अॅक्टर पार्थ समान्था हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या मालिकेची निर्मिती ही बालाजी टेलिफिल्म्सची आहे.
बालाजीनं कलाकारांची सुरक्षा लक्षात घेत मालिकेचं शूटिंग तीन दिवस थांबवलं. आधीच इतके दिवस थांबलेलं शूट पार्थ पूर्णपणे बरा होऊन येईपर्यंत पुन्हा थांबवून ठेवणं शक्य नसल्यानं मग कथानकातच थोडे बदल करून मालिकेचं शूटिंग सुरू करण्यात आलं.
'भाभीजी घर पर है' मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडन यांच्या हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन होण्यासाठी प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं.
नियम असले, काळजी घेतली तरी बाहेर पडल्यानंतर, दररोज किमान 25 ते 30 लोकांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काम केल्यानंतर संसर्गाचा धोका निश्चितच वाढू शकतो. त्यामुळे कलाकारांचं आरोग्य हे प्रत्येक प्रॉडक्शन हाऊससमोरचं प्राधान्य असेल.
याबद्दल बोलताना लेखक आणि निर्माते सुबोध खानोलकर यांनी म्हटलं, की सरकारचे सगळे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून जे कम्युनिकेशन होत आहे, त्यानुसारच आम्ही शूटिंग करत आहोत. सेटवर कमीत कमी लोक आहेत. मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर हे पीपीई कीट घालूनच कलाकारांना तयार करत आहेत. बाकी क्रू मेंबर्स मास्क, फेसशिल्ड घालून काम करत आहेत. हे चॅलेंजिंग आहे, पण सुरक्षेसाठी आवश्यक आहेत.
"अनेक क्रू मेंबर्सची राहण्याची सोय आम्ही शूटिंगच्या ठिकाणाच्या जवळच केली आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत रोजचा प्रवास करणं हे धोका पत्करण्यासारखं आहे. आम्हाला बाहेर शूट करायची फार परवानगी नाहीये. अशावेळी आम्ही 'माझा होशील ना' या मालिकेत एक नवीन प्रयोग करून पाहिला. VFX च्या माध्यमातून आम्ही ठाण्याचं दर्शन घडवलं," असं सुबोध खानोलकर यांनी म्हटलं.
प्रेक्षकांविना कसे असतील रिअॅलिटी शो?
डेली सोप म्हटलं की, भरजरी कपड्यांमधल्या बायका, मोठ्ठाली घरं, त्यात सतत होणारे सण-समारंभ, पार्टी, लग्नं हे चित्रच समोर येतं. मराठी मालिकांमध्ये हे चित्र अपवादानं दिसत असलं, तरी हिंदी सीरिअल्सचा ढाचा बराचसा तसाच आहे. पण आता असे सीक्वेन्स पहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शूटिंगच्या नवीन नियमांनुसार सध्या सेटवर 33 टक्के क्रू मेंबर्सनाच परवानगी आहे. त्यामुळे मुख्य कलाकार, तंत्रज्ञांची टीम यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. 33 टक्क्यांच्या या नियमामुळे शूटिंगचा वेग नेहमीपेक्षा काही प्रमाणात कमी झाला आहे.
दुसरं म्हणजे मालिकांच्या सेटवर 33 टक्क्यांचा हा नियम पाळता येईल. पण रिअॅलिटी शो, नॉन फिक्शन शोचं काय? अशा कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक हा कार्यक्रमाचा प्रमुख घटक असतो. पण आता हे शो वेगळ्या रुपात पहायला मिळू शकतात.
'इंडियन आयडॉल'सारख्या शोचं उदाहरण घेऊया. या किंवा अशा शोच्या ऑडिशन या देशातील वेगवगेळ्या शहरात होतात. आपली गुणवत्ता दाखवायला उत्सुक असे हजारो लोक या ऑडिशनला हजेरी लावतात. पण आता या ऑडिशन्स ऑनलाइन होऊ शकतात, त्यातून मोजक्याच 30 स्पर्धकांना मुंबईत येण्याची संधी मिळेल. 'कौन बनेगा करोडपती'सारख्या कार्यक्रमातही कदाचित प्रेक्षकांची उपस्थिती दिसणार नाही. अशावेळी ऑडिअन्स पोलसारखी लाइफलाइन बदलली जाऊ शकते.
ज्यामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती महत्त्वाची आहे, असा मराठीमधला एक लोकप्रिय शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या कार्यक्रमाचे लेखक, सादरकर्ते डॉ. नीलेश साबळे यांना या बदलेल्या नियमांबद्दल आम्ही विचारलं. त्यांनी म्हटलं, की कार्यक्रमाला प्रेक्षक नसतील आणि आम्ही कार्यक्रमासाठी गेस्टही बोलवू शकणार नाहीये. आमच्या कार्यक्रमाचं स्वरुप पाहता हे थोडंसं विचित्र वाटतंय. कारण प्रेक्षकांची दाद मिळाल्याशिवाय मजा नसते.
"अर्थात, आम्ही हा कार्यक्रम टीव्हीसाठी करतो. त्यामुळे शेवटी तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर पोहोचणारच आहे. राहता राहिला प्रश्न गेस्टचा, तर सध्या आम्ही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गेस्ट बोलवत आहोत. शिवाय त्या पाहुण्यांना त्यांच्या घरातच आमचे स्कीट पाहता यावेत, अशी सोयही आम्ही करत आहोत. तसे आमचे दोन एपिसोड ऑन एअर गेले आहेत. सध्या तरी हाच एक मार्ग आहे."
सेटवर घेण्यात येणाऱ्या खबरदारीबद्दल बोलताना डॉ. नीलेश साबळे यांनी म्हटलं, की 33 टक्के क्रू मेंबर्सच्या नियमामुळे टेक्निकल टीम कमी झाली आहे. आमची कलाकारांची टीम मोठी आहे. पण सध्या दोनच मेकअपमन आणि दोनच हेअर ड्रेसर आहेत. त्यामुळे आम्हाला कामाची जबाबदारी विभागून घ्यावी लागत आहे. त्यातही आमचे सगळ्यांचे मेक अपचे सेट पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहेत. शिवाय आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं आहे. सीरिअलप्रमाणे आमच्या कार्यक्रमात फिजिकली जवळ येण्याचे प्रसंग फार क्वचित असतात.
अर्थात, आता आम्हाला पूर्वीसारखं एकमेकांसोबत एकत्र बसून गप्पा मारता येत नाहीत, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
कसं सांभाळणार आर्थिक गणित?
इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिलचे अध्यक्ष जमनादास मजेठिया यांनी गेल्या तीन महिन्यात टीव्ही इंडस्ट्रीला चारशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती दिली होती.
गेले तीन महिने शूटिंग बंद होतं. त्यामुळे झालेलं नुकसान एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला शूट सुरू झाल्यानंतर स्टुडिओच्या भाड्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंत होणारा खर्च आहे. शिवाय सरकारी गाइडलाइन्सनुसार सेटवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, कर्मचाऱ्यांच्या राहण्याचीही व्यवस्थाही शूटिंगच्या ठिकाणाच्या जवळ करायची आहे.
टीव्ही सीरिअल्सचं शूटिंग सुरू झाल्यानंतर सेटवर रोजंदारीवर काम करणारे अनेक स्थलांतरित मजूर परतले आहेत. पण त्यांना कमी पगारावर काम करावं लागत आहे.
"हे लोक दिवसातले 12 तास काम करत आहेत आणि त्यांच्या मजुरीमध्ये जवळपास 33 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यांना दिवसाला हजार ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान मजुरी मिळत आहे," अशी माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली आहे.
अनेक कलाकारांनाही पे कट तसंच मानधनाबद्दल चिंता वाटत आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये 90 दिवसांच्या चक्राप्रमाणे पैसे मिळतात. त्यामुळे आता शूटिंग सुरू झालं असलं तरी या नियमाप्रमाणे नेमके पैसे मिळणार कधी हा प्रश्नही कलाकारांना पडला आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक फेसबुक पोस्टही लिहिली होती.
मात्र कोरोनाच्या काळात कलाकारांना 90 दिवसांच्या ऐवजी 30 दिवसांनंतर म्हणजे महिन्यानंतर मानधन दिलं जाईल, असा निर्णय निर्मात्यांच्या संघटनांच्या बैठकीत घेतला गेला होता. कोरोनाकाळात किमान तीन महिने तरी असंच मानधन दिलं जावं, असा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्र सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्मात्यांच्या संघटनांनी विमा संरक्षणाच्या मागणीवरही विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं. कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये भरपाई आणि रुग्णालयात उपचारांसाठी 2 लाख रुपयांचा विमा असा हा प्रस्ताव होता.
लॉकडाऊनचे नियम पाळताना अर्थचक्राला गती देणंही आवश्यक आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय नियमांचं पालन करून सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत शो मस्ट गो ऑन हेच ज्या इंडस्ट्रीचं तत्त्व आहे, ती कशी थांबून राहू शकते? कोरोनानंतरच्या काळात पुन्हा या मालिका पहिल्यासारख्याच शूट होतील की हे नवीन नियमच इंडस्ट्रीमधला पायंडा बनतील एवढाच प्रश्न आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)