कोरोना लॉकडाऊन: एसटी महामंडळाची 2019 ची सरळसेवा स्थगित, अनेकांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. एस.टी. महामंडळाकडून अनेकांची सेवा स्थगित

कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका एस.टी. महामंडळाला बसलाय. यामुळेच महामंडळाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात येणार आहे. 'न्यूज 18 लोकमत'ने याविषयीची बातमी दिली आहे.

एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यालयातून याविषयीचं पत्र विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलंय. यानुसार 2019च्या भरतीमधली सेवा स्थगित करण्यात आलेली आहे. या काळात भरती झालेल्या चालक - वाहकांची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात यावी आणि पुढे गरज लागल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार सेवेत घ्यावं असं या पत्रकात म्हटलंय. याशिवाय विविध पदांवर ज्यांचं प्रशिक्षण सुरू आहे, ते देखील थांबवण्यात आलेलं आहे.

जाहिरातीप्रमाणे कर्मचाऱ्यांची 8022 संख्या. प्रत्यक्षात मात्र 4500 कर्मचारी भरती प्रक्रियेद्वारे भरती झालेत. त्यामध्ये 3200 प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्यक्षात 1300 चालक तथा वाहक कर्तव्यावर आहेत. त्याचबरोबर राज्य संवर्ग - 150 आणि अधिकारी 82 कामावर रुजू झाले आहेत असं झी 24 तासने सांगितलं आहे.

पगार व्यवस्थित होतील, यासाठी प्रयत्न सुरू - परब

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की, "एसटी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला 292 कोटी रूपये लागतात. मात्र, आता उत्पन्न थांबल्यानं सरकारकडे मदत मागितली आहे. एसटी सेवा सुरळीत होईपर्यंत महामंडळाला मदत करून कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

"सरकारची आर्थिक बाजू ठप्प आहे. इतर ठिकाणहून येणारा महसूलही थांबलाय. त्यामुळे एसटी महामंडळाला कशी मदत करता येईल, याबाबत अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय," असं परब म्हणाले.

एप्रिलपर्यंत एसटी महामंडळाचे 1000 कोटींचे नुकसान होते. गेल्या तीन महिन्यातील नुकसान दोन हजार कोटींच्या आसपास झालंय, अशीही माहिती अनिल परब यांनी दिली.

2. अभिनेत्री ऐश्वर्या राय -बच्चन नानावटीमध्ये

अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन आणि तिची मुलगी या दोघींनाही शुक्रवारी (17 जुलै) नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अमिताभ आणि अभिषेक बच्चन 12 जुलैपासून नानावटी रुग्णालयामध्ये कोव्हिड 19 वर उपचार घेत आहेत. ऐश्वर्याला ताप आल्याने तिला आणि मुलीली खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं 'लोकसत्ता'ने म्हटलंय.

बच्चन कुटुंबातल्या चौघांची कोव्हिड टेस्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. पण ऐश्वर्या आणि आराध्याला आतापर्यंत घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. पण ऐश्वर्याला ताप आल्याने तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ट्वीट ANI या वृत्तसंस्थेने केलंय.

3. महाराष्ट्रात आम्ही असे पर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही- संजय राऊत

शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाली. राजस्थानच्या राजकीय पार्श्वभूमवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. 'एबीपी माझा'ने याविषयीची माहिती दिली आहे.

राज्यात सरकारला कोणताही धोका नसून या भेटीचा संबंध फडणवीसांच्या दिल्ली भेटीशी नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, त्यासाठी आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

खासदारांच्या मतदारसंघातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचं सांगण्यात आलंय.

4. भाजपचे आमदार फुटू नयेत भाजप म्हणत आहेत सत्तेत परत येणार - छगन भुजबळ

राज्यातले भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलिपॉप दाखवलं जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. 'झी न्यूज'ने याविषयीची बातमी दिलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याविषयी बोलताना भुजबळ यांनी ही टीका केली आहे. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षं चालणार आहे, याकाळात भाजप आमदारांनी इथेतिथे पाहू नये म्हणून त्यांना असं लॉलिपॉप दाखवण्यात येत असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

5. सोनू सूदने पोलिसांना दिल्या 25,000 फेस शिल्ड्स

बॉलिवुड अभिनेता सोनू सूदने महाराष्ट्रातल्या पोलिसांना 25,000 फेस शिल्ड्स दिल्या आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयीचं ट्वीट केलंय. आमच्या पोलिसांना 25,000 फेस शिल्ड्स दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार असं म्हणत अनिल देशमुख यांनी फोटो ट्वीट केल्याची बातमी 'न्यूज 18' ने दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या अनिवासी मजुरांची त्यांच्या घरी जाण्याची सोय केल्याबद्दल सोनू सूद चर्चेत होता. गेल्या साडेतीन महिन्याच्या काळातल्या या अनुभवाबद्दल आता सोनू सूद एक पुस्तक लिहीणार असल्याचंही या बातमीत म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)