अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादच्या सर्किट हाऊसमधून बाहेरही न पडता जिंकली होती निवडणूक

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमिताभ बच्चन यांचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील पदार्पण, बॉलिवूडमधल्या यश-अपयशापासून त्यांच्या राजकारणातील प्रवासापर्यंतचा आढावा घेणारा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

अमिताभ बच्चन सिनेक्षेत्रात आले, तेव्हा बांगलादेश पूर्व पाकिस्तान होता. बीटल्समध्ये फूट पडलेली नव्हती, हॉकी हा भारतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं विभाजन झालेलं नव्हतं, राजधानी एक्स्प्रेस धावायला लागल्याला वर्षही पूर्ण व्हायचं होतं आणि मानवाने तोपर्यंत चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं नव्हतं...

त्या दिवसांमध्ये ख्वाजा अहमद अब्बास त्यांच्या 'सात हिंदुस्तानी' या सिनेमासाठी अभिनेत्यांच्या शोधात होते.

कोणीतरी एक दिवस त्यांच्याकडे एका उंच तरुणाचा फोटो घेऊन आलं. अब्बास म्हणाले, "माझी याच्यासोबत भेट घालून द्या."

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला एक व्यक्ती त्यांच्या खोलीत हजर झाली. चुडीदार पायजमा आणि नेहरू जॅकेट घातलेला हा तरूण जरा जास्तीच उंच वाटत होता.

हरिवंशराय बच्चन यांची परवानगी

हा संपूर्ण प्रसंग ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्यांच्या 'आय अॅम नॉट अॅन आयलंड' या आत्मचरित्रात लिहिला आहे.

"बसा. आपलं नाव?"

"अमिताभ" (बच्चन नाही)

"शिक्षण?"

"दिल्ली विदयापीठातून बीए"

"तुम्ही यापूर्वी कधी सिनेमांमध्ये काम केलंय का?"

"अजून मला कोणी फिल्ममध्ये घेतलं नाही."

"याचं काय कारण असावं?"

"त्यांच्या हिरोईन्ससाठी मी जरा जास्तच उंच असल्याचं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे."

"आमच्याकडे ही अडचण येणार नाही, कारण आमच्या सिनेमात हिरोईनच नाही. आणि असती तरीही मी तुला फिल्ममध्ये घेतलं असतं."

"तुम्ही मला तुमच्या फिल्ममध्ये घेताय का? तेदेखील कोणतीही टेस्ट न घेता?"

"ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आधी मी तुला कथा ऐकवीन. मग तुझा रोल सांगेन. जर तुला तो आवडला तर मग मी तुला किती पैसे देऊ शकतो, ते सांगेन."

या सिनेमाचे आपण फक्त पाच हजार रुपये देऊ शकत असल्याचं अब्बास यांनी नंतर सांगितलं. तो तरूण थोडासा विचारात पडल्याचं पाहून अब्बास यांनी विचारलं, "तू यापेक्षा जास्त कमावतोयस का?"

तो तरूण उत्तरला, "हो. कलकत्त्याच्या एका फर्ममध्ये मला सोळाशे रुपये मिळत होते. मी तिथून राजीनामा देऊन इथे आलोय."

अब्बास यांना धक्काच बसला. "तुला म्हणायचंय की, ही फिल्म मिळेल या आशेने तू तुझी दरमहा सोळाशे रुपये पगाराची नोकरी सोडून इथे आलायस? समजा मी तुला हा रोल दिला नाही तर?"

यावर या उंच तरुणाने उत्तर दिलं, "आयुष्यात असा 'चान्स' घ्यावाच लागतो."

अब्बास यांनी ती भूमिका त्या तरुणाला दिली आणि आपले सचिव अब्दुल रहमान यांना बोलून 'कॉन्ट्रॅक्ट डिटेक्ट' करू लागले. यावेळी त्यांनी या तरुणाला त्याचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारला.

"अमिताभ"

थोडं थांबून त्याने सांगितलं, "अमिताभ बच्चन, डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा."

"थांब," अब्बास ओरडले.

"मला तुझ्या वडिलांची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत या कॉन्ट्रॅक्टवर सह्या होऊ शकत नाहीत. ते मला ओळखतात आणि सोव्हिएत लँड नेहरू अवॉर्ड कमिटीत माझे सहकारी आहेेत."

ख्वाजा अहमद अब्बास यांनी डॉ. बच्चन यांना एक टेलिग्राम पाठवून विचारलं, "मुलाला अभिनेता करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?"

दोन दिवसांनी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचं उत्तर आलं, "माझा काहीही आक्षेप नाही. तुम्ही पुढची कारवाई करू शकता."

पुढे जे झालं, त्याने इतिहास घडवला.

'आनंद'मुळे मिळाली ओळख

'सात हिंदुस्तानी' सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर हृषिकेश मुखर्जींनी त्यांना 'आनंद'मधली भूमिका दिली. याच सिनेमामुळे सगळ्या भारताचं लक्ष पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाकडे गेलं आणि 1972मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

राजेश खन्नांचं चरित्र - 'अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार' लिहिणारे य़ासिर उस्मान सांगतात, "शेवटच्या सीनच्या शूटिंगच्या आधी तो नेमका कसा शूट करायचा याचा विचार अमिताभ बच्चन करत होते. त्यांच्याकडे तोपर्यंत अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता. राजेश खन्ना 'हिस्ट्रीयॉनिक्स'चे बादशाह होते. अमिताभ त्यांचा मित्र महमूद यांच्याकडे गेले. त्यांनी अमिताभना फक्त एकच गोष्ट सांगितली - कल्पना कर की, राजेश खन्नांचा खरंच मृत्यू झालाय. याशिवाय इतर कोणताही विचार करण्याची गरज नाही. सीन आपोआप होईल."

यात अमिताभ यांचा एक डायलॉग होता, 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं.' य़ानंतर अमिताभ यांची गणना भारतातल्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली.

16 सिनेमांनंतर पहिला हिट सिनेमा

पण सिनेमांमध्ये व्यावसायिक यश मिळण्यासाठी अमिताभना आणखी 16 फिल्म्स वाट पहावी लागली. हे यश त्यांना दिलं - 'जंजीर'ने. रोमँटिक फिल्म्स यशस्वी होत असतानाच्या काळात हा सिनेमा आला.

'अमिताभ बच्चन अ कॅलिडोस्कोप' हे चरित्र लिहीणारे प्रदीप चंद्रा सांगतात, "जर तुम्हाला 16 सिनेमांचं काम मिळत राहतं याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी स्वतःचं अस्तित्त्वं निर्माण केलेलं आहे. असं नसतं तर 3 सिनेमांनंतर कोणी विचारलंही नसतं. कधी कधी काळ तुम्हाला साथ देतो. 'जंजीर' सिनेमात रोमँटिक अँगल वा गाणं नसल्याचं म्हणत देवानंद यांनी हा सिनेमा नाकारला. राजकुमार आणि अगदी धर्मेंद्रनेही सिनेमा रिजेक्ट केला. पण याच फिल्मद्वारे आपल्याला बाजी पलटवता येईल हे बच्चनच्या लक्षात आलं आणि ते बरोबर ठरले."

राजीव गांधींच्या हाती दिली सायनिंग अमाउंट

फिल्म्समध्ये काम मिळवण्यासाठी अमिताभ स्ट्रगल करत असतानाच कॉमेडियन महमूद यांनी त्यांना पंखांखाली घेतलं. महमूद यांचं चरित्र लिहिणाऱ्या हनीफ झवेरींनी याविषयी 'महमूद - अ मॅन ऑफ मेनी मूड'मध्ये याविषयी लिहिलंय.

'बॉम्बे टू गोवा रिलीज होण्यापूर्वी अमिताभ एका अतिशय स्मार्ट व्यक्तीला सोबत घेऊन मुंबईला आले. 'कॉम्पोज'ची गोळी घेतल्यानंतर महमूद काहीसे नशेत होते. त्यांचा भाऊ अन्वरने त्या व्यक्तीची महमूद यांच्याशी ओळख करून देण्याचा प्रय्तन केला पण नशेतल्या महमूद यांच्या लक्षात काही आलं नाही.

त्यांनी खिशातून 5000 रुपये काढले आणि अमिताभसोबतच्या त्या व्यक्तीच्या हातात ठेवले. असं करण्याचं कारण विचारल्यावर महमूद यांनी सांगितलं ही की, व्यक्ती अमिताभपेक्षा स्मार्ट दिसते आणि इंटरनॅशनल स्टार होऊ शकते. हे पैसे त्यांना त्यांच्या पुढच्या फिल्ममध्ये घेण्यासाठीची सायनिंग अमाऊंट आहे."

झवेरी पुढे लिहितात, "हे इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी आहेत असं म्हणत अन्वरनी मेहमूदना त्या व्यक्तीची पुन्हा ओळख करून दिली. हे ऐकताच महमूदनी राजीव गांधींना दिलेले पैसे परत घेतले. अमिताभ आणि राजीव जोरजोरात हसू लागले. महमूद यांची भविष्यवाणी योग्य होती, असं नंतर अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध पत्रकार राशीद किडवई यांच्याशी बोलताना म्हटलं होतं. राजीव खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्टार झाले, पण अभिनयात नाही, तर राजकारणात."

अमिताभनी सोनियांना घडवलं दिल्ली दर्शन

राजीव गांधींसोबत लग्न करण्यासाठी 13 जानेवारी 1968ला सोनिया दिल्लीत दाखल झाल्या. पण त्यांची सोय स्वतःच्या घरी वा हॉटेलमध्ये न करता इंदिरा गांधींनी त्यांना हरिवंशराय बच्चन यांच्या घरी मुक्कामी ठेवलं.

राशीद किडवईंनी सोनिया गांधींचं चरित्र लिहिलंय. ते सांगतात, "इंदिरा गांधींना भारतीय संस्कृतीची काळजी होती. सोनिया इथे आल्या तेव्हा त्यांचे वडील सोबत आले नाहीत. कारण ते या नात्यावर खुश नव्हते. लग्नाआधी मुलीचं मुलाच्या घरी राहणं योग्य समजलं जात नसे. म्हणूनच त्यांनी त्यांचे जुने स्नेही हरिवंशराय बच्चन यांच्या घरी सोनियांची सोय केली."

या सगळ्या प्रसंगाविषयी अमिताभ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "आम्हाला हे कळल्याबरोबर बाबांनी सगळ्या घराला रंग लावून घेतला. एक अधिकचा गिझर मागवून घेतला. सोनियांचं विमान पहाटे साडेतीन वाजता येणार होतं. राजीवनी मला रात्रीच माझ्या घरी येऊन झोप, असं सांगितलं होतं."

"आम्ही वेळेआधी, मध्यरात्रीच विमानतळावर पोहोचलो. पहाट होण्याआधीच सोनियांचं विमान उतरलं. राजीव म्हणाले, घरी जायच्या आधी दिल्ली दाखवूयात. मग आम्ही तीन-चार तास दिल्लीच्या रस्त्यांवरून गाडीतून फिरत राहिलो आणि 9 वाजताच्या सुमारास घरी पोहोचलो. घरी माझ्या आई बाबांना पहाटे उठावं लागू नये म्हणून राजीवने असं केल्याचं नंतर कळलं. 13 विलिंग्टन क्रिसेंटमधल्या आमच्या घरीच राजीव आणि सोनियांच्या मेंदीचा कार्यक्रम झाला. फुलांच्या अलंकारांनी सजलेली, घाघरा परिधान केलेली सोनिया अतिशय सुंदर दिसत होती. मग फेब्रुवारीत एका साध्या सोहळ्यात 1 सफदरजंग रोडवर सोनिया आणि राजीवचं लग्न झालं. सोनियांची पाठवणी आमच्याच घरून करण्यात आली."

अमिताभ - जयाचं लग्न

चार वर्षांनी 3 जून 1973 ला अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचा मुंबईत विवाह झाला. अमिताभना फिल्ममध्ये आणणारे ख्वाजा अहमद अब्बास एका बाजूला बसले होते तर दुसरीकडे गुलाबी फेटा बांधून प्रसिद्ध साहित्यिक भगवती चरण वर्मा आणि नरेंद्र शर्मा बसले होते.

धर्मयुगचे संपादक धर्मवीर भारती यांच्या पत्नी पुष्पा भारती सांगतात, "खरं सांगायचं तर खादीचा पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेल्या, दाढी वाढवलेल्या संजय गांधींवर तो साफा खुलून दिसत होता. अमिताभ जरीचं काम केलेली शेरवानी आणि सिल्कचा सफेद पायजमा घालून लाल फेटा बांधून सेहरा बांधायला आले होते."

"जयांचे वडील, प्रसिद्ध पत्रकार तरुण कुमार भादुरींनी वरपक्षाचं स्वागत केलं. जयाचे फिल्म इन्स्टिट्यूटमधले साथी आणि प्रसिद्ध हास्य कलाकार असरानी फुलांच्या माळांनी वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करत होते."

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अमिताभ - जया हनिमूनसाठी लंडनला रवाना झाले.

अलाहाबादची निवडणूक

1984मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. राजीव यांच्या आग्रहावरूनच अमिताभनी राजकारणात प्रवेश केला आणि अलाहाबादमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्पर्धा होती उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या हेमवतीनंदन बहुगुणांशी.

ही निवडणूक कव्हर करणाऱ्या जेष्ठ पत्रकार कुमकुम चढ्ढा सांगतात, "त्या निवडणुकीसाठी बच्चन आपली भूमिका बदलू शकले नाहीत. आपण फिल्म स्टार असल्याचंच ते शेवटपर्यंत समजत राहिले. सर्किट हाऊसच्या बंद खोलीतून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठीचा त्यांचा प्रचार करण्याची जबाबदारी त्यांचा लहान भाऊ अजिताभकडे होती. पण त्यांचं मुख्य काम होतं लोकांना हाकलून लावणं."

"सर्किट हाऊसचं गेट बंद असायचं. अमिताभच्या खोलीचं दारही बंद असायचं. रोज सकाळी अजिताभ येऊन बाहेर जमलेल्या पत्रकारांना आणि लोकांना पिटाळून लावण्याचं काम करत. याउलट बहुगुणांच्या घरी गेल्यास तुमचं स्वागत होई. प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी अमिताभ घोटलेल्या चार-पाच ओळी बोलत."

"त्यांना निवडणुकीचे बारकावे आणि तंत्र अजिबात समजलं नव्हतं. ते हरणार असं सुरुवातीला वाटत होतं. पण जया प्रचारात उतरल्या आणि वारे उलट्या दिशेने वाहू लागले. 'भाभी, देवर आणि मुंहदिखाई'च्या गोष्टी करत त्यांनी अमिताभ यांच्या बाजूने पारडं झुकवलं. जया जर प्रचारात उतरल्या नसत्या तसं ही निवडणूक जिंकणं अमिताभना कठीण गेलं असतं, असं माझं तेव्हाही म्हणणं होतं आणि आताही आहे."

राजीवसोबत मतभेद

अमिताभ आणि राजीव यांच्या मैत्रीत कटुता आली आणि 1987मध्ये अमिताभनी अलाहाबादच्या आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचं ठरवलं. यामागचं कारण काय, असं मी कुमकुम चढ्ढांना विचारलं.

त्यांनी सांगितलं, "माझ्याकडे याविषयीचे कोणतेही पुरावे नाहीत पण लोकांचं असं म्हणणं आहे की, बोफोर्स घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यानंतर राजीवनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितल्याचं अमिताभना वाईट वाटलं. राजीव वैयक्तिकरित्या भ्र्ष्ट नव्हते, असं मला वाटतं. पण त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल याविषयी सांगता येणार नाही."

"पण हा अमिताभचा ट्रॅक रेकॉर्डच आहे. त्यांची मैत्री फार काळ टिकत नाही. एकेकाळी त्यांचा भाऊ अजिताभ त्यांच्या सगळ्यात जवळ होते. पण एक काळ असा आला की, त्यांच्यातलं बोलणंही थांबलं. सोनिया त्यांना राखी बांधायच्या पण त्यांच्याशीही बोलणं थांबलं. अमर सिंह देखील त्यांचे खास जवळचे होते. त्यांनी आपल्याला अडचणीतून बाहेर काढल्याचं त्यांनी स्वतः म्हटलं होतं. पण आज त्यांच्यात वैर आहे."

सेटवर वेळेपूर्वी पोहोचण्याची सवय

70च्या दशकाच्या मध्यात आणि 80च्या संपूर्ण दशकात अमिताभ लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मे 1980मध्ये वीर संघवींनी 'इंडिया टुडे'तल्या एका लेखात लिहिलं होतं, "दिवसातल्या कोणत्याही वेळी किमान लाखभर लोक सिनेमाच्या पडद्यावर या माणसाला गाताना, नाचताना आणि मारामारी करताना पाहतात. या अभिनेत्याला इतकी मागणी आहे की, 1983च्या आधी कोणतीही डेट देऊ शकत नाही, असं प्रोड्युसर्सना सांगूनही ते या व्यक्तीला साईन करायाला आतुर आहेत. त्यांच्यासाठी अमिताभ फक्त एक 'स्टार' नाही तर एक 'उद्योग' आहेत."

मुंबईतल्या 96 हेअर कटिंग सलून्समध्ये अमिताभ बच्चनचा फोटो रंगवण्यात आला असल्याचं 1979 मध्ये फिल्मफेअर मासिकात लिहिलं होतं.

सत्तरी पार केल्यानंतरही अमिताभ हिंदी सिनेमांचे आधारस्तंभ होते. जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं, त्यांचा अभिनयही मुरत गेला.

अभिनयासाठी त्यांना मिळालेल्या 4 राष्ट्रीय पुरस्कारांपैकी 3 पुरस्कार त्यांना साठी ओलांडल्यानंतर मिळाले, हा काही योगायोग नाही.

बच्चन यांचे फ्लॉप सिनेमेही इतर हिट फिल्म्सपेक्षा जास्त धंदा करायचे, असं म्हटलं जायचं. त्यांचं मानधन हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या किमान दुप्पट तरी असायचं, अशीही चर्चा होती.

प्रदीप चंद्र सांगतात, "बच्चन यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यांचं संपूर्ण दिसणं आदबशीर आहे. त्यांची कपडे घालण्याची आणि बोलण्याची पद्धत, त्यांची भाषाशैली ही फिल्मी दुनियेतल्या इतरांपेक्षा अगदी वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी मी जावेद अख्तर यांच्याशी बोलत होतो. सेटवर वेळेत येणं आणि इतर कलाकारांसोबत चांगलं वागल्याचा त्यांना खूप फायदा झाला."

"त्यांच्याआधीचे अभिनेते 12 वाजता येण्याऐवजी 4 वाजता यायचे. कोणीत नशेत धुंद यायचं तर कोणी सोबत चमच्यांची गर्दी घेऊन येईल. जर 7 वाजताची शिफ्ट असेल तर अमिताभ साडे सहा वाजता त्यांच्या व्हॅनमध्ये बसलेले असायचे. केतन देसाईंनीही मला सांगितलं होतं की, एकदा ते सकाळी 7 वाजता शिफ्टला पोहोचले तेव्हा अमिताभ आधीच आपल्या व्हॅनमध्ये येऊन बसलेले होते. एक सुपरस्टार आपल्या आधी सेटवर आलेला आहे, हे पाहून त्यांना अतिशय ओशाळं झालं होतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)