You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : ऐश्वर्या राय बच्चनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, अमिताभ आणि अभिषेक बच्चनवर उपचार सुरूच
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
बीग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मात्र अजूनही उपचार सुरूच आहेत.
अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली होती. अभिषेक बच्चन यांनासुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
या दोघांना याची लागण झाल्यानंतर ऐश्वर्या रॉय बच्चनची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
ऐश्वर्याला कोरोनाची लागण झाल्याचं अभिषेक बच्चनने सांगितलं होतं. पण आधी ऐश्वर्याला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता.
नानावटी हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाचे डायरेक्टर जनरल डॉ. अब्दुल अन्सारी यांनी अमिताभ आणि अभिषेक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
शनिवारी (11 जुलै) रात्री मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांना दाखल करण्यात आलं.
"माझी कोव्हिड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. हॉस्पिटलकडून प्रशासनाला याबाबत माहिती दिली जात आहे. कुटुंबातील इतर सदस्य आणि कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल येणं अजून बाकी आहेत," अशी माहिती अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती.
त्याचसोबत, जे कुणी गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करावी, अशी विनंतीही अमिताभ बच्चन यांनी केली .
अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही कोरोनाची माइल्ड लक्षणं आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बीबीसी मराठीला दिली. नानावटी रुग्णालयाला दोघांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी हेल्थ बुलेटीन जारी करण्याचे आदेश दिल्याचंही टोपे यांनी बीबीसीला सांगितलं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अमिताभ बच्चन यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमिताभ बच्चन यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमिताभ बच्चन यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
सचिन तेंडुलकरनं ट्विटरवर म्हटलंय, "काळजी घ्या, अमितजी!"
बॉलिवूडमधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा
अभिनेते रितेश देखमुख यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, अभिषेक लवकर बरे व्हा. मी तुमच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो.
अभिनेते मनोज वाजपेयी, परिणती चोप्रा, चिरंजीवी, अमिषा पटेल यांच्यासहित अनेकांनी अभिताभ यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
अभिनेत्री अमिषा पटेल यांनी लिहिलं आहे की, ही सगळ्यात वाईट बातमी आहे. अमिताभ यांनी लवकर बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करते.
बॉलिवूडमधील पार्श्वगायक अदनान सामी यांनी म्हटलंय, "अमिताभजी, तुम्ही लढाऊ आहात. प्रत्येक संकटातून बाहेर आला आहात. माझी प्रार्थना तुमच्यासोबत आहे."
अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "अमिताभ यांना कोरोना झाल्याचं ऐकल्यामुळे दु:ख झालं. ते कोरोनावर यशस्वी मात करतील, असा मला विश्वास आहे."
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे की, महानायक अमिताभ बच्चन हे कोरोनावर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील. 'शहेनशाह' कोरोनाची 'दीवार' तोडून 'अग्निपथावर' मात करुन आपल्याला 'आनंद' देतील हीच सदिच्छा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)