विषाणू नसते तर माणसानं बाळाला जन्म देण्याऐवजी अंडं दिलं असतं?

    • Author, रॅचेल नुव्हर
    • Role, बीबीसी फ्युचर

आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. याला कारणीभूत ठरला आहे एक अतिसूक्ष्म विषाणू. या विषाणूला नवीन कोरोना विषाणू Sarc CoV-2 असं नाव देण्यात आलं आहे.

मात्र, मानवतेसमोर संकट म्हणून उभा असलेला हा पहिला विषाणू नाही. यापूर्वीही अनेकदा विषाणूंनी मनुष्यावर हल्ला चढवला आहे. 1918 साली आलेल्या इन्फ्लुएंझा विषाणूमुळे 5 ते 10 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

तर विसाव्या शतकात कांजिण्यांच्या विषाणूने कमीत कमी 20 कोटी लोकांचा जीव घेतला.

हे वाचल्यावर असं वाटू शकतं की विषाणू माणसासाठी मोठा धोका आहे आणि पृथ्वीवरून सर्व विषाणू नष्ट व्हायला हवेत.

मात्र, पृथ्वीवरून विषाणू नष्ट व्हायला हवेत, असा विचार करण्यापूर्वी जरा थांबा. कारण विषाणू नष्ट झाले तर आपणही वाचणार नाही. विषाणू नसेल तर केवळ मनुष्यप्राण्याचं नाही तर पृथ्वीतलावरच्या संपूर्ण सजीवसृष्टीचंच अस्तित्व नष्ट होईल.

अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन मेडिसिन युनिव्हर्सिटीतले साथरोगतज्ज्ञ टोनी गोल्डबर्ग म्हणतात, "पृथ्वीवरून अचानक सर्व विषाणू नष्ट झाले तर पृथ्वीतलावरचे सर्व सजीव एक ते दीड दिवसात संपतील. विषाणू या पृथ्वीवर जीवन सुरू ठेवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणूनच त्यांच्यातल्या फक्त वाईट गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायला हवं."

जगात किती प्रकारचे विषाणू आहेत, हे अजून ठाऊक नाही. सध्यातरी आपल्याला केवळ एवढंच माहिती आहे की यातले बहुतांश विषाणू माणसामध्ये कुठलाच आजार संक्रमित करत नाहीत. हजारो विषाणू या पृथ्वीचं इकोसिस्टिम सुरू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मग ते कीटक असो, गाई-म्हशी किंवा मग मनुष्य. मॅक्सिकोतल्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमध्ये विषाणूतज्ज्ञ असलेल्या सुसाना लोपेज शॅरेटन म्हणतात, "या पृथ्वीवर विषाणू आणि इतर सजीव पूर्णपणे समतोल साधून जगत असतात. विषाणू नसतील तर आपलं अस्तित्वही टिकणार नाही."

बहुतांश लोकांना हे माहितीच नाही, की या पृथ्वीवर जीवसृष्टीचा गाडा चालू ठेवण्यासाठी विषाणू किती महत्त्वाचे आहेत. याचं एक कारण म्हणजे आपण केवळ त्याच विषाणूचा अभ्यास करतो जे आजार पसरवतात. असं असलं तरी आता मात्र काही शास्त्रज्ञ विषाणूच्या अनोळखी जगाच्या शोधात निघाले आहेत.

आतापर्यंत माणसाने काही हजार विषाणू शोधले आहेत. मात्र, अजूनही कोट्यवधी विषाणू असे आहेत, ज्यांची काहीच माहिती नाही. पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या मॅरेलिन रुसिंक सांगतात, "विज्ञान केवळ आजार पसरवणाऱ्या जंतूंचा अभ्यास करतं. हे वाईट आहे. पण, हेच वास्तव आहे."

बहुतांश विषाणूंची आपल्याला माहितीच नाही. त्यामुळे किती विषाणू माणसांसाठी घातक आहेत, हेही आपल्याला माहिती नाही. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीतले विषाणू शास्त्रज्ञ कर्टिस सटल म्हणतात, "विषाणूंच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या एकूण संख्येच्या तुलनेत बघितलं तर माणसांसाठी घातक असलेल्या विषाणूंची संख्या शून्याच्या जवळपास असेल."

इकोसिस्टिम चालवतात विषाणू

आपल्यासाठी जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियाला संक्रमित करणारे विषाणू सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. यांना फेगस म्हणतात. फेगस म्हणजे गिळून टाकणारा.

टोनी गोल्डबर्ग सांगतात की समुद्रात जीवाणूंची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी फेगस विषाणूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. फेगस विषाणू नष्ट झाले तर समुद्राचा समतोल अचानक ढासळेल.

समुद्रातले 90 टक्के जीव मायक्रोब म्हणजेच एकपेशीय आहेत. हे एकपेशीय जीव पृथ्वीवर असलेल्या ऑक्सिजनपैकी निम्म्या ऑक्सिजनची निर्मिती करतात आणि विषाणू नसतील तर हे काम होऊच शकत नाही. समुद्रात आढळणारे विषाणू तिथले निम्मे जीवाणू आणि 20 टक्के मायक्रोब्ज्स दर दिवशी नष्ट करतात.

यातून समुद्रातील शेवाळ, प्रवाळ आणि इतर अनेक वनस्पतींना अन्न मिळतं. या माध्यमातून ते फोटोसिन्थेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण करून सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऑक्सिजन तयार करतात आणि याच ऑक्सिजनमुळे जमिनीवर जीवसृष्टी शाबूत आहे. विषाणू नसतील तर समुद्रात एवढ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती होणार नाही. परिणामी जमिनीवरच्या जीवसृष्टीवरही त्याचा परिणाम होईल.

कर्टिस सटल म्हणतात, "मृत्यूशिवाय जीवन शक्य नाही. कारण जीवन पृथ्वीवर असलेल्या तत्त्वांच्या रिसायकलिंगवर अवलंबून असतं आणि रिसायकलिंगचं हे काम विषाणू करतात."

पृथ्वीवरच्या सजीवांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील विषाणू गरजेचे आहेत. जेव्हा-जेव्हा एखाद्या जीवाची संख्या वाढते विषाणू त्यांच्यावर हल्ला करून त्यांची संख्या आटोक्यात आणतात. उदाहरणार्थ साथ आल्याने माणसाची संख्या नियंत्रणात येते. विषाणू नसतील तर पृथ्वीवर सजीवांची संख्या आउट ऑफ कंट्रोल होईल. एकच जीव वरचढ ठरला तर जैवविविधता संपुष्टात येईल.

काही सजीवांचं अस्तित्व तर थेट विषाणूंवर अवलंबून असतं. उदारणार्थ गाई आणि रवंथ करणारे इतर प्राणी. विषाणू या प्राण्यांना गवतातल्या सेल्युलोजपासून शुगर तयार करायला मदत करतात आणि त्यापासूनच या प्राण्यांच्या शरिरावर मांस तयार होतं आणि त्यांना दूध येतं.

मनुष्यप्राणी आणि इतर प्राण्यांच्या शरीरात असलेल्या जीवाणूंना कंट्रोल करण्यातही विषाणूंची भूमिका महत्त्वाची असते.

प्रचंड गर्मीतही अमेरिकेतल्या प्रसिद्ध यलोस्टोन नॅशनल पार्कमधलं गवत तग धरू शकतं. यालाही विषाणूच कारणीभूत आहेत. रुंसिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध केलं आहे.

हलापेनोच्या बियाण्यात आढळणारे विषाणू या गवताला रस शोषणाऱ्या किड्यांपासून वाचवतं. रुंसिक यांच्या टिमला त्यांच्या संशोधनात असं आढळून आलं की काही वनस्पती आणि बुरशी आपलं सुरक्षाचक्र कायम रहावं, यासाठी विषाणू एका पीढीकडून दुसऱ्या पीढीकडे सोपवतात. विषाणूचे फायदे नसते तर वनस्पतींनी असं का केलं असतं?

मनुष्यप्राण्याचं सुरक्षाचक्रही विषाणूचं तयार करतात

अनेक विषाणू असे आहेत जे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित ठेवतात. ज्या विषाणूमुळे डेंगी होतो त्या विषाणूचा दूरचा नातेवाईक असलेला GB व्हायरस C हादेखील त्यातलाच. या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये एड्स फार वेगाने पसरत नाही. तसंच हा विषाणू एखाद्याच्या शरीरात असेल तर त्याचा इबोलामुळे मृत्यू होण्याचा धोकाही खूप कमी होतो.

हर्पीज विषाणू आपल्याला प्लेग आणि लिस्टेरिया यासारख्या भयंकर आजारांपासून सुरक्षित ठेवतात.

विषाणू अनेक आजारांवर औषधंही ठरू शकतात. 1920 च्या दशकात सोव्हिएत संघात या दिशेने बरंच संशोधन झालं. आताही जगात अनेक शास्त्रज्ञ पुन्हा एकदा व्हायरस थेरपीवर संशोधन करत आहेत. जिवाणू अँटी बायोटिक्सला इम्यून होत आहेत. म्हणजेच त्यांच्यावर अँटी बायोटिक्सचा परिणाम होत नाही.

हे बघता लवकरात लवकर अँटीबायोटिक्सचा पर्याय शोधावाच लागणार आहे. विषाणू हे काम करू शकतात. आजार पसरवणारे जिवाणू किंवा कँसर पेशी नष्ट करण्यात विषाणू मदत करू शकतात.

कर्टिस सटल म्हणतात, "या आजारांचा सामना करण्यासाठी विषाणूंचा एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे वापर होऊ शकतो. विषाणू थेट लक्ष्यावर म्हणजेच शरीरासाठी घातक असलेल्या रोगजंतुंवर काम करतील. जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया किंवा कँसर पेशींचा नाश करतील. विषाणूंच्या माध्यमातून आपण सर्व आजारांवरच्या उपचारांसाठी नव्या जनरेशनची औषधं तयार करू शकतो."

विषाणू कायम बदलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जेनेटिक डेटाची खाण असते. ते इतर पेशींमध्ये जाऊन जनुकं कॉपी करण्याची यंत्रणा ताब्यात घेतात. त्यामुळे विषाणूच्या जेनेटिक कोडची त्या जीवाच्या पेशीत कायमस्वरुपी नोंद होते.

मनुष्यातले 8% जिन्ससुद्धा विषाणूंपासूनच आलेले आहेत. 2018 साली शास्त्रज्ञांच्या दोन टिम्सने असा शोध लावला होता की कोट्यवधी वर्षांपूर्वी विषाणूंपासून आपल्याला मिळालेले कोड आपली स्मृती शाबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

आज मनुष्य अंडं देण्याऐवजी थेट बाळ जन्माला घालतो. त्यामागेही विषाणू संसर्गाचाच हात आहे. आजपासून जवळपास 13 कोटी वर्षांपूर्वी मानवाच्या पूर्वजांमध्ये रेट्रोव्हायरसची साथ आली होती. त्या संसर्गामुळे मनुष्याच्या पेशीमध्ये एक नवीन जिन (जनुकं) आला. त्या जिनमुळेच अंड्याऐवजी थेट बाळाला जन्म देण्याचं वैशिष्ट्य माणसात निर्माण झालं.

पृथ्वीवर विषाणू अशाप्रकारे अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यावरच्या संशोधनाची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. विषाणूंची जसजशी अधिकाधिक माहिती मिळले त्यांचा अधिक चांगला उपयोग करता येईल. कदाचित अनेक आजारांचा सामना करण्याचा मार्ग हे विषाणूच आपल्याला दाखवतील. किंवा मग त्यांच्यापासून अशी काही मदत मिळू शकेल ज्यामुळे मानवसृष्टीच नाही तर पृथ्वीतलावरच्या संपूर्ण सजीवसृष्टीचंच भलं होईल आणि म्हणूनच विषाणूचा द्वेष करण्याऐवजी त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सतत करायला हवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)